सेलु (प्रतिनिधी) शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पोटच्या मुलाने चक्क बापालाच पेट्रोल टाकून पेटवून देत संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी ही दुर्दैवी घटना सेलू शहरातील लक्कडकोट भागात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, जखमी झालेल्या वडीलांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. अजय शहाणे असे आरोपी मुलाचे नाव असून, बजरंग दत्तात्रय शहाणे जखमी वडिलांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेलू शहरातील अजय शहाणे याने वडील बजरंग दत्तात्रय शहाणे यांच्याकडे दारूसाठी पैशाची मागणी केली होती. परंतु, वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अजयने रागाच्या भरात वडील बजरंग शहाणे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूला राहणाऱ्या काही नागरिकांनी भाजलेल्या जखमी शहाणे यांना सेलू उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे प्रथमोपचार करून नंतर त्यांना परभणी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेमुळे नशेखोर मुलाच्या विरोधात संताप व्यक्तकेला जात आहे.
No comments:
Post a Comment