Wednesday, February 22, 2023

मोक्काचा आरोपीत व पोलिसांत झटापट, गोळीबारानंतर पोलीस उपनिरीक्षक शेख माजित हे गंभीर जखमी .


कळमनुरी (प्रतिनिधी) : हिंगोलीच्या कळमनुरी शहरात मोक्का प्रकरणातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत पोलीस उपनिरीक्षक शेख माजित हे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांविरुद्ध कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. आज सकाळी पोलिसांना गेल्या अनेक दिवसांपासून असलेला मोक्काचा आरोपी कळमनुरी शहरातील झोपडपट्टी परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे हे इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आरोपीच्या अटकेसाठी रवाना झाले. 

मात्र पोलीस आल्याचे पाहताच आरोपीने धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपी आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत पोलीस उपनिरीक्षकाला अचानक छातीमध्ये गोळी लागली. मात्र ही गोळी कुणाच्या बंदुकीतून बाहेर पडली याबाबत अद्याप पोलिसांनी स्पष्ट केले नाही.

या घटनेनंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण घटनेची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान जखमी पोलीस अधिकारी माजित यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे, तसेच पोलिसांनी संबंधित आरोपीला देखील ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

No comments:

Post a Comment