*शहरातील नाथ चित्र मंदिर परिसरातील शिवाजीनगर भागातील सानवी शिवदीप चौंडे ही 7 वर्षीय चिमुकली दुर्धर आजाराने त्रस्त असून तिच्यावर शस्त्रक्रियेसाठी तब्बल 25 ते 30 लाख रुपये खर्च येणार आहे.
परळी वैजनाथ,(प्रतिनिधी) शहरातील नाथ चित्र मंदिर परिसरातील शिवाजीनगर भागातील सानवी शिवदीप चौंडे ही 7 वर्षीय चिमुकली दुर्धर आजाराने त्रस्त असून तिच्यावर शस्त्रक्रियेसाठी तब्बल 25 ते 30 लाख रुपये खर्च येणार आहे. सानवीचे वडील शिवदीप चौंडे यांच्या आवाक्याबाहेरचा खर्च असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सोमवार, दि. 27 फेब्रुवारी 2023 रोजी सानवीच्या मदतीसाठी परळी शहरात मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या मदत फेरीत परळी शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. व्यापारी, ग्राहक, ऑटो चालक, कामगार आदींसह नागरिकांनी सढळ हाताने भरभरून आपल्या लेकीच्या उपचारासाठी मदतीचा हात दिला. तसेच अनेक सामाजिक संस्था, शहरातील नामवंत पतसंस्था व्यापारी आदींचाही मदतीचा ओघ सुरूच आहे.
सोमवार दि.27 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मदत फेरीस प्रारंभ करण्यात आला. तदनंतर ही मदत फेरी अण्णाभाऊ साठे चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, एकमिनार चौक, मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, सोनार लाईन मार्गे जावून तेथे मदत फेरीचा समारोप करण्यात आला. दरम्यान या झालेल्या मदत फेरीत परळी शहरातील नागरिकांनी तब्बल 94 हजार 440 रुपयाची मदत जमा केली. या मदत फेरीत चौंडे परिवारासह परळी शहरातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. तसेच मदत फेरीत परळी शहरातील पत्रकार बांधव ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
*मदतीसाठी सरसावले अनेकांचे हात*
आरोग्याच्या साथीला परळीच्या लेकीला हे ब्रीदवाक्य घेऊन काढलेल्या मदत फेरीस शहरातील व्यापारी, नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आपल्या लेकीच्या उपचारार्थ अनेकांनी सढळ हाताने मदत केली. सानवीच्या उपचारार्थ काढलेल्या मदत फेरीत परळी शहरातील नागरिकांनी 94 हजार 440 त्यांची मदत केली.तसेच वडखेल ग्रामस्थांनी 7497 रुपयाचा निधी गावकऱ्यांनी मदत फेरी काढून जमा केला. परळी शहरातील पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी लि. चे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी 15 हजार,वि दा सावरकर पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी 11 हजार रुपयांचा तर अरिहंत जैन सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ.दिनेश लोढा यांनी 11 हजार रुपयांचा निधी सानवीच्या उपचारार्थ प्रशासनाकडे जमा केला आहे. त्याचबरोबर अनेकांकडून जमेल तशी मदत करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment