Tuesday, November 15, 2022

भक्तीस्थळाबाबत अफवा पसरविणार्‍या विरूद्ध कारवाई करा. डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर तपोनुष्ठान समिती व वीरशैव समाजाची मागणी.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) अहमदपुर जि.लातूर येथे वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांची संजीवन समाधी असून त्याजागेस भक्तीस्थळ म्हणून जाहीर करण्यात आले आहे.परंतू बांधकामास काही मंडळी अडथळा निर्माण करीत असून अस्थी चोरल्याची अफवा समाजात पसरवित आहेत. अस्थी चोरण्याचा कोणताही प्रकार येथे घडलेला नसून समाजात तेढ निर्माण करू पाहणार्‍या व्यक्तींवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रसंत वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर तपोनुष्ठान समिती परळी तसेच वीरशैव समाज बांधव व भक्तांनी केली आहे.
राष्ट्रसंत वसुंधरारत्न  डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधीचे बांधकाम चालू असून या भक्ती स्थळाचे भुमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते 10 सप्टेंबर रोजी करण्यात आले. वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज बंद पेटीत संजीवन समाधीत शिवैक्य असतांना तसेच समाधी बांधकाम त्यांनी सूचविल्याप्रमाणे सर्व भक्तजणांच्या मार्फत सुरू आहे.काही लोक खोडसाळपणाने महाराजांच्या अस्थी चोरल्याचा अफवा पसरवून समाजात तेढ व शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत.अशा सर्व व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी तसेच समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी व सामाजिक एैक्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणार्‍या राष्ट्रसंत वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधीचे बांधकाम एकजुटीने पूर्ण करावे असे आवाहन केले जात आहे. 
या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,तसेच जिल्हाधिकारी बीड, उपविभागीय अधिकारी परळी, तहसीलदार परळी यांना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment