बीड : (प्रतिनिधी)शेततलावाच्या अस्तरीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कृषी पर्यवेक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सोमवारी सायंकाळी पाच वाजता तालुका कृषी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.संदीप सुभाष देशमुख असे लाच घेताना पकडलेल्या कृषी पर्यवेक्षकाचे नाव आहे.

तालुक्यातील एका शेतकऱ्यास तलावात अस्तरीकरण करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक देशमुख याने १५ हजार रुपयांची मागणी केली होती.

तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. सोमवारी सायंकाळी पाच वाजता कृषी कार्यालयात सापळा लावला. लाचेची रक्कम स्वीकारताच ‘एसीबी’ पथकाने संदीप देशमुखला झडप घालून पकडले. उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.