बीड -( प्रतिनीधी) जप्ती पारगाव (ता. बीड) येथील शेतकऱ्याची दोन हेक्टर ४३ आर. जमिनीवर बनावट दस्ताऐवजाद्वारे कब्जा करुन फसवणूक केल्याच्या आरोपाखाली बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गौतम खटोडसह पाच जणांवर मंगळवारी (दि. २३) गुन्हा नोंद झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील पारगाव (जप्ती) येथील अनंत कडाजी तिपाले (वय ५०) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, पारगाव (जप्ती) येथील गट क्रमांक ६२ मध्ये त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. ता. सात मे १९८५ रोजी त्यांनी चुलत्याकडून १९ एकर पैकी १० एकर चार गुंठे जमीन खरेदी केली. खरेदी खतामध्ये दक्षिणेकडील जमीन खरेदी करत असल्याची नोंद आहे. सातबारा उताऱ्यावर तसे नमूद आहे. दरम्यान, चुलत्यांचा मृत्यू झाल्यानंतर गट क्रमांक ६२ मधील नऊ एकर जमीन चुलतभावाने विक्री केली. त्यानंतर खरेदीदाराने दोन एप्रिल १९९३ रोजी दोन एकर ४३ आर जमीन झुंबरलाल पन्नालाल खटोड यांना विक्री केली.
दरम्यान, झुंबरलाल खटोड यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र गौतम झुंबरलाल खटोड यांनी मूळ खरेदीदारांशी संगनमत करुन बनावट चतु:सीमा व खरेदीखत तयार करुन दुरुस्तीपत्र केले व फसवणूक केली. यासंदर्भात अनंत तिपाले यांच्या फिर्यादवरुन गौतम झुंबरलाल खटोड, रतनलाल पन्नालाल नहार व इतर तिघांवर बीड ग्रामीण ठाण्यात फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला. सहायक निरीक्षक योगेश उबाळे तपास करत आहेत.
दरम्यान, बनावट कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांच्या फिर्यादीवरुन शहर ठाण्यात पाच जणांवर गुन्हा नोंद झाला होता. यातही गौतम खटोडचा समावेश होता. बीड शहर ठाण्यातील दोन आरोपींचा बीड ग्रामीण ठाण्यातील गुन्ह्यातही समावेश आहे. त्यामुळे भूमाफियांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment