*डॉक्टरांनी तपासणी करून चिठ्ठीवर लिहून दिलेल्या गोळ्या घेण्यासाठी औषधी भांडारमध्ये गेल्यावर मोजक्याच गोळ्या हातावर टेकवल्या जात आहेत.
बीड :(प्रतिनिधी) १५ ऑगस्ट २०२३ पासून राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सर्व तपासण्या व औषणधी मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परंतू जिल्हा रूग्णालयात सुरूवातीपासूनच औषधींचा तुटवडा आहे. सोमवारीही माहिती घेतली असता तपासणी मोफत केली जात आहे, परंतू औषधींसाठी खासगी मेडिकल्सचा रूग्णांना आधार घ्यावा लागत आहे. यात रूग्णांची आर्थिक लुट होत आहे. या प्रकाराने संताप व्यक्त होत असून मुख्यमंत्र्यांच्या मोफत सुविधेची घोषणा सध्या तरी हवेतच असल्याचे दिसत आहे.
जिल्हा रूग्णालयातील औषधांचा मागील आठवड्यातच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे यांनी आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी सर्व विभागप्रमुख, वॉर्ड इन्चार्ज यांची बैठकही घेतली. जे औषधी उपलब्ध आहेत, तेच रूग्णांना लिहून द्या, अशा स्पष्ट सुचना डॉ.बडे यांनी डॉक्टरांना दिल्या होत्या. परंतू या सुचनांचे कोणीही पालन करत नसल्याचे सोमवारी दिसून आले. जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून चिठ्ठीवर लिहून दिलेल्या गोळ्या घेण्यासाठी औषधी भांडारमध्ये गेल्यावर मोजक्याच गोळ्या हातावर टेकवल्या जात आहेत. इतर गोळ्या बाहेरून घ्या, असा सल्ला फार्मासिस्टकडून दिला जात आहे. या प्रकाराने मात्र, सामान्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी रूग्णांमधून होत आहे.
No comments:
Post a Comment