डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील मोजक्या विद्वानपैकी एक प्रकांड पंडित होते. ज्ञान-विज्ञान आणि शिक्षण हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण आणि चारित्र्य या दोन बाबींना अधिक महत्त्व दिले होते. शिक्षण असून चारित्र्य नसेल तर त्या शिक्षणाची किंमत शून्य होईल,असे त्यांचे मत होते.सर्व प्रकारच्या विषमता दूर करण्यासाठी आणि सामाजिक लोकशाही प्राप्त करून घेण्यासाठी शिक्षण हा राजमार्ग आहे, असे बाबासाहेब नेहमी म्हणत असत.कोणताही समाज हा जर शिक्षणापासून वंचित राहिला तर त्याची सामाजिक,आर्थिक प्रगती होऊ शकत नाही, हे इतिहासाने सिद्ध केले आहे. डॉ.आंबेडकर आत्यंतिक शिक्षणप्रेमी होते. आपले शिक्षणाबद्दलचे विचार त्यांनी वेगवेगळ्या भाषणांमधून व लेखांमधून सातत्याने मांडले आहेत. डॉ.आंबेडकर यांच्या मते, शिक्षण ही पवित्र संस्था असून तिथे व्यक्तीची मने सुसंस्कृत होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे पावित्र्य राखून विद्या अवगत केली पाहिजे.प्रत्येकाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून उच्चशिक्षित झाले पाहिजे तरच तुम्हाला तुमचा,समाजाचा, व देशाचा उद्धार करता येईल. उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस हतबल होऊन अल्पायुषी होतो, तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणाची परिपूर्ण अशी व्याख्या केली आहे ते म्हणतात, शिक्षण म्हणजे व्यक्तीचा मानसिक व बौद्धिक विकास घडवून आणण्याचे व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याचे, आर्थिक विकास साधण्याचे व राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याचे फार मोठे शस्त्र आहे. शिक्षणाचा हेतू केवळ उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त करणे नसून स्वाभिमान व प्रतिष्ठा मिळवून देणे,सन्मानाचे व आदराचे आयुष्य जगण्याची ऊर्मी देणे हा होय.सामाजिक न्यायावर आधारित सम्यक परिवर्तन केवळ शिक्षणातूनच शक्य आहे. शिक्षण हेच सामाजिक क्रांतीचे साधन आहे. शिक्षणापासून मानव वंचित राहणार नाही याची शासनाने जबाबदारी घेतली पाहजे. माणसाला माणूस म्हणून जगण्याची जाणीव शिक्षणातून निर्माण होते. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेतलेच पाहिजे असा आग्रह बाबासाहेब सातत्याने धरतात. आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात विद्या, विनय,शील या तिन्ही बाबींवर लक्ष केंद्रित केलेले दिसून येते. त्यांनी विद्याला प्रथम स्थान दिले होते ते म्हणतात विद्या शिवाय माणसाला शांतता नाही. आणि माणुसकी नाही.ती महासागरासारखीआहे. माणसाला जशी अन्नाची आवश्यकता आहे तशीच विद्येची ही आवश्यकता असते.डॉ. आंबेडकर यांच्या मते,पाश्चात्त्य राष्ट्रांचा विकास शिक्षणामुळे झाला. एवढेच नव्हे तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात पाश्चात्य शिक्षणाचा सिंहाचा वाटा आहे. समाजाचा आणि राष्ट्राचा सर्वांगीण विकास हा शिक्षणामुळेच होतो.शिक्षणामुळे मनुष्य स्वावलंबी,निर्भर आणि स्वाभिमानी बनतो. शिक्षणामुळे व्यक्तीची स्वातंत्र्य उपभोगण्याची व स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची क्षमता विकसित होते. शिक्षणामुळे मनुष्यात अन्यायाविरुद्ध बंड करण्याची वृत्ती वाढते.डॉ. आंबेडकरांना केवळ पुस्तकी साहित्य नको होते. तर व्यक्तीमध्ये नैतिक मूल्यांचा विकास शिक्षणाद्वारे झाला पाहिजे असे त्यांचे मत होते. प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचे भान बाळगले पाहिजे.केवळ शिक्षण घेतले म्हणजे ती योग्यता आपणास येते असे मला वाटत नाही, असे बाबासाहेब म्हणत. मनुष्य विद्वान झाला की तो समाजाला उपयुक्त होतोच असे नाही म्हणून विद्वान व्यक्तीचा हेतू आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणे हा असावयास हवा. डॉ. आंबेडकरांनी शिक्षणासंबंधी आपल्या भाषणातून, लिखाणातून अनेक मौलिक सूचना केल्या आहेत.आजच्या परिस्थितीत त्या अत्यंत उपयुक्त आहेत. शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणे ही सर्वस्वी शासनाची आणि समाजाची जबाबदारी आहे. मागासवर्गीयांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शिष्यवृत्या ,निशुल्क भोजन व निवासाची सोय व त्यांना हव्या असणाऱ्या अनेक सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. उच्च शिक्षणाचा प्रसार समाजातील सर्व वर्गांमध्ये कसा करता येईल याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे.शिक्षणाचे संपूर्ण नियंत्रण आणि नियमन शिक्षण तज्ञाकडून झाले पाहिजे. असे ते म्हणत असत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या सर्व विचारातून संपूर्ण व्यक्तीचा,समाजाचा पर्यायाने देशाच्या उत्क्रांतीचा आणि उन्नतीचा विचार व्यक्त झालेला आपणास दिसून येतो. शिक्षण हे सामाजिक क्रांतीचे सूत्र आहे. त्यामुळे शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांच्या एकंदर विचारांचे सार असलेले आपणास दिसून येते. त्यासाठी शिक्षण संस्था शिक्षणाची पवित्र केंद्र बनली पाहिजे, स्त्रियांनाही पुरुषासोबत समान शिक्षण मिळाले पाहिजे, असे ते म्हणत. लोकप्रतिनिधी मधील नेतृत्व, चारित्र्याचा विकास होण्यासाठी प्रशिक्षणाची गरज त्यांनी ओळखली होती.थोडक्यात शिक्षणरुपी वाघिणीचे दूध पिऊन प्रत्येक व्यक्ती प्रगत झाल्यास समता, स्वातंत्र्य ,बंधुता व न्याय या मूल्यावर आधारित समाज रचना अस्तित्वात येईल ही शैक्षणिक क्रांतीची जाणीव डॉ. आंबेडकरांनी निर्माण केली. शिक्षणाचा हेतू लोकांचे नैतिकी करण व सामाजिकीकरण करणे हा होय. सभ्यता आणि संस्कृती यांचा शिक्षण हा पाया आहे, हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जाणले आणि जाहीर सुद्धा केले थोडक्यात लोकशाही यशस्वी करायची असेल तर जनता आणि समाज नैतिक मूल्याधिष्ठित शिक्षणाद्वारे संस्कारित झाला पाहिजे, यावर बाबासाहेबांनी भर दिलेला दिसून येतो. लोकशाहीसाठी सुशिक्षित समाजाची गरज आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येक मानवाने वाटचाल केली पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शैक्षणिक तत्वज्ञान मनुष्याचे डोळे हृदय आणि हात यांच्या अंतर्गत गुणवत्ता जोपासणारी प्रक्रिया संकल्पित करते. मनुष्याला विशुद्धता, सद्गुण आणि सात्विकता यांच्या पातळीपर्यंत ती उन्नत करते. स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्मोद्धार हे परिणामकारक शिक्षणाचे ध्येय होय. शिक्षण हाच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उन्नतीचा मूलमंत्र आहे. शिक्षण म्हणजे परिवर्तन ,शिक्षण हे सामाजिक क्रांतीचे प्रभावी साधन आहे. शिक्षणाचा परिणाम हा शील आणि चारित्र्य निर्मितीसाठी करण्यात यावा अशी आंबेडकरांची धारणा होती. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केले. या समाजातील लोकांना आपल्या मुलांना शिकविण्यासाठी येणारा खर्च झेपत नव्हता अशा मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून बाबासाहेबांच्या शिक्षण संस्थेने वसतिगृह उघडण्याचे कार्य सुरु केले.यासाठी शासन, स्वयंसेवी संस्था,दानशूर व्यक्ती यांनी तत्कालात मदतही केली. सरकारने बाबासाहेबांचे लोकहिताचे कार्य लक्षात घेऊन फक्त दलित समाजातील मुलांसाठी म्हणून पाच नवीन वसतिगृहांसाठी मान्यता आणि मदत देऊ असे जाहीर केले. बाबासाहेबांनी आपल्या शिक्षण संस्थेचे वसतीग्रहाचे कामकाज व्यवस्थित चालविण्यासाठी एक विश्वस्त मंडळ स्थापन केले. सरकारी मदत, देणगी म्हणून मिळालेली मदत यातून विद्यार्थ्यांच्या राहण्याची, जेवणाची,खाण्याची सोय झाली. व त्यांच्या शैक्षणिक गरजा ही संस्था भागवू लागली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचे आणि समग्र चळवळीचे आधारभूत असणारे तीन शब्द आहेत शिका! संघटीत व्हा!! आणि संघर्ष करा!!! हा क्रम मार्गदर्शक आणि दिशादर्शक आहे. शिक्षण हे पक्षपात विरहित असावे शिक्षणाचा उद्देश हा केवळ वस्तुस्थिती पूरक माहिती पुरविणे किंवा काही सिद्धांत शिकवणे हा नसावा तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित करणे त्यांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतांची वाढ करणे हा असावा. डॉ बाबासाहेब आंबेडकर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद येथील शिलान्यास सोहळ्या प्रसंगी भाषण करताना म्हणतात,खालच्या वर्गाची ज्यांच्यामुळे प्रगती खुंटून त्यांना दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागते तो न्यूनगंड त्यांच्या पासून नाहीसा करणे चालू समाजपद्धतीमुळे जे त्यांचे जीवन निर्दयीपणे उभारण्यात आले आहे त्यांचे त्यांच्या स्वतःच्या आणि राष्ट्राच्या दृष्टीने काय महत्व आहे याची जाणीव त्यांना करून देणे हाच खालच्या वर्गाचा मोठा प्रश्न आहे. उच्च शिक्षणाच्या प्रसारा खेरीज हे साध्य होणार नाही. आमच्या सर्व सामाजिक दुखण्यावर माझ्या मताप्रमाणे शिक्षण हेच औषध आहे, असे आंबेडकर म्हणतात. मनमाड येथील अस्पृश्य विद्यार्थी बोर्डिंगच्या इमारतीचा कोनशिला समारंभ प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण करताना म्हणतात,आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो तितकेच महत्त्व शिक्षण प्रसाराला दिले पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला मोक्याच्या जागा काबीज करता येणार नाहीत. प्रोफेसरांनी अध्ययन आणि अध्यापन कार्यात स्वतःला वाहून घ्यावे जेणेकरून आपल्या हाताखालून जाणारी पिढी सर्वांगाने युक्त बनेल .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणविषयक विचारांचा प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकार करणे आवश्यक आहे.तरच सर्वांगीण प्रगतीकडे वाटचाल होईल. शिक्षणाचे नियंत्रण सामाजिक सद्गुन असलेल्या सुशिक्षित वर्गाने करणे गरजेचे आहे शिक्षण क्षेत्रात असलेली जळमटे नष्ट करून एकसंघ भारतीय समाज निर्माण करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. शिक्षणा संदर्भातील उदासीनता ही लोकशाही साठी अतिशय घातक स्वरूपाचे आहे. शिक्षणातून सामाजिक जाणिवांचे आदान-प्रदान झाल्यास जातिसंस्थेचा अंत होण्यास वेळ लागणार नाही. प्रत्येकाच्या अंगी चांगल्या गुणांची रुजवन उज्वल शिक्षणामुळे होत असते याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.तरच खऱ्या अर्थाने माणूस,समाज,देश सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करेल. *झेप घे तु उंच गगनात उंच घे तू भरारी मावळलेल्या सूर्यानंतर प्रकाश दे दारोदारी विळख्यात तू गुलामीच्या अजूनही तू गुंतलेला आर बंड कराया सांग आता तुझ्या मधल्या माणसाला एकटा तू फिरताना घे हातात हात सारे. वाहु दे वादळात पुन्हा एकदा क्रांतीचे वारे .... .* ज्ञानाचा महासागर असणाऱ्या *डॉ.बाबासाहेब आंबेडकर* या महामानवास जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम ! ------------------
*प्रा मकरंद जोगदंड*
"राज्यशास्त्र विभाग प्रमुख"
*वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर*
No comments:
Post a Comment