Thursday, May 7, 2026

भूसंपादन मावेजा घोटाळा; तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक ताब्यात!

बीड (प्रतिनिधी) : भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बीड पोलिसांनी लातूर येथून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यांना आज लातूर न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी बीड येथे आणले जाणार असल्याचे समजते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांना ताब्यात घेऊन बीडकडे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील कथित भूसंपादन मोबदला घोटाळा प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पदनाम व स्वाक्षरी नमूद करून तब्बल १५४ भूसंपादन प्रकरणांमध्ये बनावट मोबदला आदेश तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भूसंपादन उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १० आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सहाय्यक महसूल अधिकारी संजय हांगे, अविनाश चव्हाण (कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर, भूसंपादन समन्वय कार्यालय), शेख अजहर शेख बाबू (कंत्राटी ऑपरेटर, भूसंपादन जायकवाडी प्रकल्प कार्यालय), त्रिंबक पिंगळे (सेवानिवृत्त कंत्राटी कर्मचारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय बीड), पांडुरंग पाटील (सहाय्यक महसूल अधिकारी, भूसंपादन समन्वय कार्यालय), श्री. राऊत (राष्ट्रीय महामार्ग कार्यालय), अॅड. एस. एम. नन्नवरे, अॅड. नरवडकर, अॅड. पिसूरे आणि अॅड. प्रवीण राख यांचा समावेश आहे. या प्रकरणात संजय हांगे, त्रिंबक पिंगळे आणि शेख अजहर शेख बाबू या तिघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील उर्वरित सात आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आहे. या गुन्ह्याचा तपास सुरुवातीला पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांच्याकडे होता. मात्र त्या सध्या रजेवर असल्याने तपासाची जबाबदारी एम. व्यंकटराम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तपासादरम्यान आता तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनाही ताब्यात घेण्यात आल्याने या प्रकरणात मोठी घडामोड मानली जात आहे.

दोरखंड टाकून अंबडची वाळू गेवराईत!' तहसीलदारांच्या धडक मोहीमेत१५ बड्या तस्करांविरुद्ध गोंदी पोलिसांत गुन्हा.


अंबड (प्रतिनिधी): अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून 'केणी' आणि दोरखंडांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्या गेवराई तालुक्यातील १५ मुख्य वाळू माफियांवर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीपात्रात पाणी असल्याचा फायदा घेऊन बीड जिल्ह्याच्या हद्दीतून लांबवर दोरखंड टाकून अंबडच्या हद्दीतील वाळू ओढून नेली जात असल्याचे प्रशासकीय तपासात निष्पन्न झाले आहे.

अशी चालायची चोरी
गेवराई तालुक्यातील तस्कर नदीत पाणी असल्याने महसूल पथक पोहोचू शकणार नाही, असा विचार करून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी करत होते. १८ ते २२ एप्रिल दरम्यान प्रशासनाने अनेकदा धाडी टाकून केण्यांचे दोरखंड कापून जाळून नष्ट केले होते. मात्र, तरीही तस्करांनी जेसीबी, पोकलेन आणि हायवा लावून शासकीय मालमत्तेची लूट सुरूच ठेवल्याने अखेर कडक पाऊले उचलण्यात आली आहेत.

मुख्य आरोपींची नावे
तहसीलदार विजय चव्हाण यांच्या सूचनेनुसार तलाठी पथकाने गोपनीय माहिती गोळा केली, ज्यातून खालील आरोपी निष्पन्न झाले आहेत:
-माळस पिंपळगाव (ता. गेवराई): हरी रघुनाथ सुखदेव, अंकुश पवार, वैभव डाके, शिवाजी पंडित डाके, रमेश सुखदेव, राजेंद्र बाबुराव डाके, किरण डाके, अशोक सुखदेव, रवी टेकाळे, पवन पठाडे, अजय पठाडे आणि प्रवीण राऊत.
-सावळेश्वर (ता. गेवराई): बंटी उदे आणि मुकेश कुटे.
-भांबेरी (ता. अंबड): शाहरुख अनवर शेख.
-याशिवाय राक्षसभुवन व सुरळेगाव येथील त्यांचे इतर साथीदारही या गुन्ह्यात सामील आहेत.

ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ आणि उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.

कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल
"पर्यावरणाचा ऱ्हास आणि शासकीय मालमत्तेची संघटित चोरी करणाऱ्यांना कोणताही थारा दिला जाणार नाही. गुन्हे दाखल केल्यानंतरही तस्करांच्या वर्तनात बदल झाला नाही, तर यापेक्षाही अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची पथके २४ तास पाळत ठेवून आहेत."
— विजय चव्हाण, तहसीलदार, अंबड.

आष्टीत ७दिवसांत धुमस्टाईल सोनेचोरीच्या ५घटना.सीसीटीव्ही बंद असल्याचा चोरट्यां नी घेतला फायदा.


आष्टी (प्रतिनिधी): आष्टी शहरात गेल्या आठवड्याभरापासून जबरी चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. बुधवारी रात्री आष्टी दूध संघासमोर दुचाकीवरून जात असलेल्या दोन महिलांना पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी अडवून त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून नेले. विशेष म्हणजे, सात दिवसांपूर्वी एकाच दिवशी तीन ठिकाणी अशाच प्रकारे चोरी झाली होती. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे शहरातील 'लाडक्या बहिणी' घराबाहेर पडताना भयभीत झाल्या आहेत.

रस्ते कामामुळे तपासात अडथळा
साबलखेड-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने अनेक भागांतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. चोरट्यांना याची पूर्ण खात्री असल्याने ते बिनधास्तपणे महिलांना लुटत आहेत. कॅमेरे बंद असल्याने पोलिसांनाही चोरट्यांचा माग काढणे कठीण जात आहे.

गुन्हे दाखल, पण तपासाचे काय?

पोलिस दरवेळी गुन्हा दाखल करून घेतात, मात्र ठोस कारवाई होताना दिसत नाही. "तपास सुरू आहे" हे पालुपद ऐकून नागरिक आता वैतागले आहेत. चोरटे पोलिसांना उघडपणे आव्हान देत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

लवकरच चोर पकडले जातील

"सोनसाखळी चोरांचा शोध घेण्यासाठी एक अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. तांत्रिक तपासाच्या साहाय्याने लवकरच या चोरांच्या मुसक्या आवळल्या जातील."
-शरद भुतेकर, पोलीस निरीक्षक, आष्टी.

मामा-मामी शेतात गेल्याची संधी साधून चिमुकलीवर अत्याचार. युसूफवडगाव पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

केज (प्रतिनिधी): तालुक्यातील एका ग्रामीण भागात नात्यातील विश्वासाला तडा देणारी घटना घडली आहे. सोमवारी (४ मे) धाराशिव जिल्ह्यातील इटकूर (ता. कळंब) येथील २९ वर्षीय युवक आपल्या मामा-मामीला भेटण्यासाठी त्यांच्या गावी आला होता. रात्रीच्या वेळी मामा आणि मामी शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता, घरी १० वर्षे १० महिने १८ दिवस वय असलेल्या अल्पवयीन मुलीला या भाच्यासोबत ठेवण्यात आले होते.

पाच महिन्यांपासून सुरू होते शोषण. 

घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन या नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे, हा आरोपी केवळ एकदाच नाही तर गेल्या पाच महिन्यांपासून अशा प्रकारच्या गैरकृत्यात गुंतलेला होता. फिर्यादीनुसार, १३ मार्च ते १९ मार्च २०२६ या कालावधीत आणि त्याआधीही २ ते ३ महिन्यांपासून त्याने वारंवार पीडितेचे लैंगिक शोषण केले होते.

आरोपीला इटकूरमधून. 

अटक
आई-वडील शेतातून परतल्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मामीने दिलेल्या फिर्यादीवरून युसूफवडगाव पोलिसांनी मंगळवारी रात्री आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्यानंतर आरोपी आपल्या गावी पळून गेला होता, मात्र पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून त्याला इटकूर येथून बेड्या ठोकल्या.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे, पोलीस कॉन्स्टेबल महेश कोकाटे आणि सोहेल पठाण यांनी पार पाडली. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी महिला जमादार बेबी गांधले यांनी तिला अंबाजोगाई येथे नेले होते.