Tuesday, February 8, 2022

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न प्राधान्याने सोडवू - ना. डॉ. नितीन राऊत.


*शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज - ना. धनंजय मुंडे.

*आम्ही गाजावाजा करण्याऐवजी विकासकामे करतो, कोणी आणले पेक्षा काम झाले याला महत्व - आ. बाळासाहेब आजबे.

*कडा ता. आष्टी येथील 33/11 केव्ही उपकेंद्राचे डॉ. नितीन राऊत, धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण.

आष्टी (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील औष्णिक विद्युत केंद्र व सौर ऊर्जेचे प्रकल्प हे महाराष्ट्राच्या विद्युत पुरवठ्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतात. पण पूर्वीच्या धोरणांमुळे वीज निर्मिती करणाऱ्या या भागावर मात्र अन्याय होतो. येथे शेतीला पूरक वीज मिळावी यासह शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जावेत यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समन्वयातून व्यापक प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.
कडा ता. आष्टी येथील महावितरण च्या 33/11 केव्ही उपकेंद्राचे आज डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते व्हर्च्युअली व पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. राऊत बोलत होते.
यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा हा वीज उत्पादन करण्यात अग्रेसर असून इथल्या शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी वीज मिळावी यासाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे नमूद केले.
कडा येथील 33/11 केव्ही उपकेंद्र कधी मंजूर झाले त्यापेक्षा त्याला निधी उपलब्ध होऊन त्याचे काम पूर्ण झाले हे महत्वाचे आहे. गाजावाजा किंवा श्रेयवाद करण्याऐवजी विकासकामे करण्याला आम्ही प्राधान्य देतो, इथल्या सामान्य माणसाला दिलेला शब्द पूर्ण करणे व त्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणे हे उद्दिष्ट असल्याचे यावेळी बोलताना आ. बाळासाहेब आजबे म्हणाले. 
याप्रसंगी माजी आमदार ज्येष्ठ नेते साहेबराव दरेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत या भागात अधिक क्षमतेच्या उपकेंद्राची निर्मिती करणे गरजेचे असल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महावितरणचे अधीक्षक अभियंता रवींद्र कोलप यांनी केले.
यावेळी महावितरण चे सह व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदवले, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, रामकृष्ण बांगर, सतिष शिंदे, अण्णासाहेब चौधरी, किशोर नाना हंबर्डे, परमेश्वर शेळके, विठ्ठल सानप, शिवाजी नाकाडे, शिवभूषण जाधव यांसह आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment