Wednesday, April 28, 2021

कोरोना मुक्तीसाठी ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के यांचे नवनाथ पारायण.शिवाजी गडेकर यांच्या निवासस्थानी कोरोना नियम पाळून होत आहे कार्यक्रम.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कोरोना विषाणूच्या संसर्गाने अवघ्या विश्वाला जंग जंग पछाडले असून कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर, अनेक रूग्णांना मृत्यूच्या कवेत आणणारी आहे. प्रशासन व वैद्यकिय यंत्रणा आपआपल्या परीने कोरोनापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असले तरीही देशाचे अध्यात्मीक आणि धार्मीक योगदान सुद्धा आता कोरोना मुक्तीसाठी पुढे आले असून ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के यांनी श्री नवनाथ पारायणास सुरूवात केली आहे. सलग दहा दिवस हे पारायण चालणार असून ईश्वराकडे कोरोनापासून मुक्ती दे अशी प्रार्थना केली जात आहे.

माणिकनगर येथील रहिवाशी शिवाजी नरसिंगराव गडेकर यांच्या निवासस्थानी कोरोना मुक्तीसाठी दहा दिवसीय श्री नवनाथ पारायणास आज बुधवार पासून प्रारंभ झाला. ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के हे नवनाथ पारायणाचे अत्यंत सुरेखपणे निरूपण करीत असून पहिल्याच दिवशी कथेला प्रारंभ करतांना त्यांनी ईश्वराकडे आम्हा सर्वांना कोरोना संसर्गापासून मुक्ती दे, आपण निर्मित केलेले हे विश्व पाना फुलाप्रमाणे सजीवांच्या माध्यमातून फुलू दे अशी प्रार्थना ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के यांनी केली. 

वैद्यकिय ज्ञान अत्यंत महत्वाचे असून त्याला अध्यात्माची जोड मिळाली तर चांगलेच होईल असे सांगत कोरोना पासून बचाव करण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे सर्वांनीच करावेत. कोरोनाचा आजार परळी शहर आणि तालुक्यात वाढत असल्याने एक प्रामाणिक प्रयत्न कोरोनाला हरविण्यासाठी आम्ही करीत आहोत. यश येणे किंवा न येणे हे शेवटी ईश्वराच्या स्वाधीन असल्याचे सांगत आम्ही अध्यात्मीक व्यक्ती असून ईश्वराला साकडे घालण्याशिवाय आणखी काय करू शकतो असेही ते म्हणाले. दरम्यान हा घरगुती कार्यक्रम असला तरी परिसरातील निवडक व्यक्तींना येथे निमंत्रित करण्यात आले आहे. कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठीच्या सर्व नियमांचे पालन येथे केले जात आहे.

No comments:

Post a Comment