Wednesday, April 28, 2021

महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा बैठकीत निर्णय.


मुंबई : महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. पाच कोटी 71 लाख जनतेला मोफत लस मिळणार आहे. येत्या एक मेपासून महाराष्ट्रासह देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरु होणार आहे.

महाराष्ट्रातील जनतेला लसीकरण करण्यासाठी जवळपास 12 कोटी लसींची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी राज्य सरकार 6 हजार 500 कोटी रुपये खर्च करणार आहे. सध्या फक्त 45 वर्ष वयोगटातील नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लसीकरण केले जात आहे. मात्र राज्याच्या अनेक भागात लसींचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरु करताना मुबलक लसी, कर्मचारी वर्ग यांची सोय सरकारला करावी लागणार आहे.

*मोफत लसीकरणाबाबत अजित पवारांचे सूतोवाच.

राज्यात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याच्या प्रस्तावावर मी सही केली आहे. हा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीत येणार असून त्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आर्थिक भाराचा कोणताही निर्णय मुख्यमंत्रीच घेत असतात, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल स्पष्ट केलं होतं. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत मोफत लसीकरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे. सात दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवावा, असं मत राज्यातील टास्क फोर्सने मांडलं होतं, मात्र 13 मे रोजी रमजान ईद असल्याने गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवावा असे काही मंत्र्यांचे मत आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

* कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचा अंदाज.

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे महत्त्वपूर्ण भाकित टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तवले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे 30 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment