Wednesday, April 21, 2021

अंबाजोगाईत ऑक्सिजन अभावी 5 रुग्णांचा मृत्यू. नातेवाईकांचा आरोप. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घटना.


अंबाजोगाई : (प्रतिनीधी)    नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांचा दु्र्दैवी मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथेही ऑक्सिजन अभावी 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. परंतु रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या अभावामुळे झाला नसल्याचे रुग्णालयाचे डीन शिवाजी सुक्रे यांनी स्पष्ट केले आहे. 

राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दररोज हजारो रुग्ण आढळत असल्याने चिंतेचे वातवरण पसरले आहे. आज ऑक्सिजन अभावी नाशिकात 22 रुग्णांचा मृत्यू झालाय. या घटनेने राज्य सुन्न झालेले असताना आता अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिनच्या तुटवड्यामुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसे आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.

ऑक्सिजन कमतरता होती तर रुग्णालय प्रशासनाने आधीच खबरदारी का घेतली नाही, असे आरोप होत असताना वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचा दावा फेटाळून लावलाय. तसेच त्यांनी सध्या आमच्याकडे रुग्णांसाठी लागणारा आवश्यक तो ऑक्सिजनचा पुरवठा आहे, असा दावा केलाय.

यावेळी पुढे स्पष्टीकरण देताना सुक्रे यांनी दिवसभरात उपचार करताना एकूण 11 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच, आज मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांचे वय हे 60 वर्षे आहे. यामध्ये बहुतांश रुग्ण हे शारीरिक व्याधी किंवा रक्तदाब, हायपरटेन्शन असलेले रुग्ण आहेत, असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment