याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ या त्यांच्या वेगळ्या कार्यशैलीमुळे ओळखल्या जातात. बेधडक अधिकारी अशी त्यांची खास ओळख आहे. सध्या त्यांनी बीड जिल्ह्याची अनेक वर्षांपासून असलेली ऊस तोड मजूरांचा जिल्हा ही ओळख मिटवण्याचा चंग बांधला आहे. ज्यासाठी त्या गेल्या काही दिवसांपासून ऊसतोड कामगार महिलांसाठी आयोजित विविध मेळाव्याला हजेरी लावत मार्गदर्शन करत आहेत.
या मेळाव्यांमधून "तुम्ही अगदी तुमच्या आजोबांच्या काळापासून ऊस तोडणीला जात आहेत. ऊस तोडणीला तुम्ही एकदम पैसे मिळतात म्हणून जातात. मात्र या पैशामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे का ? तुम्ही चांगले घर बांधलेत का ? शेतजमीन घेतली आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न विचारत तुम्ही इथंच रहा, प्रशासन तुम्हाला आवश्यक त्या सुविधा देईल, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आज बीडच्या वडवणी शहरात ऊसतोड कामगारांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बोलताना दीपा मुधोळ यांनी ऊसतोड कामगार महिलांना ऊस तोडणीला जाऊ नका, तुम्ही इथेच रहा, रोजगार हमी योजनेतून आम्ही तुम्हाला रोजगार देऊ. असे आवाहन केले आहे.
आपल्याला बीड जिल्हा हा व्यवसायिकांचा आणि विकसनशील शेतकऱ्यांचा करायचा आहे. त्यामुळे तुम्ही ऊसतोडणीला जाऊ नका.. असे म्हणत "तुम्ही माझ्याकडे ऊस तोडणीला जायचंय आरोग्याची सुविधा मिळत नाही, असे प्रश्न घेऊन येऊ नका. तर आम्हाला ऊस तोडणीला नाही जायचं, आम्हाला इथं सुविधा उपलब्ध करून द्या, असे प्रश्न घेऊन या मी ते सगळे प्रश्न सोडवेन" असे आश्वासन त्या या मेळाव्यांमधून देत आहेत
No comments:
Post a Comment