Friday, April 21, 2023

देवस्थान जमीन घोटाळा.अतिक्रमणे परस्पर हस्तांतर प्रकरणी समिती गठीत. सर्व माहिती संकलित करून ३० एप्रिल पूर्वी कारवाई.

बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील देवस्थान जमीन घोटाळा आणि अतिक्रमण प्रकरणात आता समिती गठीत करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशाने जिल्ह्यातील हिंदू देवस्थान जमिनीची माहिती गोळा करणे, अतिक्रमणे व अवैधरीत्या हस्तांतरण झाले असल्यास कारवाई करावी. यासह इतर कामांसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी, बीड व अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई हे समितीचे अध्यक्ष असणार आहेत. सर्व माहिती संकलित करून ३० एप्रिलपूर्वी कारवाई करावी; असा आदेश आयुक्तांनी समितीला दिला आहे. त्यामुळे देवस्थान जमिनी घोटाळा प्रकरणातील भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. 
१९५९ पासून सात- बारा, क, ड पत्रक, खासरा पत्रक, पाहणी पत्रक व इनाम जमिनीच्या नोंदवहीमधील नोंदी तपासून हिंदू देवस्थानाची माहिती संकलित करावी. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर करण्यात आलेल्या इनाम जमिनीचा डाटाबेसमध्ये गाव नमुना ९ मध्ये समाविष्ट असलेल्या हिंदू देवस्थान इनाम जमिनीचा समावेश करण्यात आला असल्याची खात्री करावी. हिंदू देवस्थान इनाम जमिनीचे जूने अभिलेख उपलब्ध करून देण्यात यावेत. त्यामध्ये खासरा पत्रक, पाहणी पत्रक, गाव नमुना 9 सात-बारा, राजपत्र, मुंतखब, जमिनीशी संबंधित फेर, नवीन सात-बारा व इतर कागदपत्रे, अस्तित्वात असलेल्या सर्व हिंदू देवस्थान इनाम मालमत्ता, प्रत्यक्षात ताब्यात असलेल्या व्यक्ती, संस्थाचा तपशील द्यावा. सदरचा ताबा कायदेशीर आहे किवा कसे हे पहावे.
तसेच संबंधित इनाम मालमत्ता अतिक्रमणाखाली आहेत किंवा कसे याबाबींची देखील नोंद घेऊन अतिक्रमणे व अवैधरीत्या हस्तांतरण झाले असल्यास कारवाई करावी. देवस्थान इनाम मालमत्तेमध्ये सात- बारा उताच्यावर मालकी हक्कात केवळ संबंधित संस्थेचे किंवा देवस्थानचे नाव व प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद असल्यास त्याबाबतची तपासणी करून अवैधरीत्या खासगी इसमांची नावे नियमानुसार कार्यवाही करून काढून टाकावीत. अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment