Thursday, April 13, 2023

मोबाईल चोरीची तक्रार दिल्याने तरुणाची निर्घृण हत्या. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु!

बीड (प्रतिनिधी)   मोबाईल चोरीची तक्रार दिल्याच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फरार झालेल्या दोन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहराच्या जवळ एका 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. मोबाईल चोरीची तक्रार दिल्याच्या शुल्लक कारणावरुन या तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. अक्षय राजेंद्र मडकर असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर बिंदुसरा तलावाजवळ अक्षयची हत्या करण्यात आली होती. रोहण प्रकाश जाधव आणि वैभव क्षीरसागर या तरुणांनी अक्षयची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. रोहण आणि वैभव हे दोघेही अक्षयचे खास मित्र आहेत. पोलिस तपासात शुल्लक कारणावरुन मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचे समोर येताच सर्वांना मोठा धक्का बसला.दरम्यान, डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्यामुळे सुरुवातीला पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणे खूपच अवघड झाले होते. सध्या रोहन आणि वैभव हे दोन्ही आरोपी फरार आहेत. दोघांविरोधात बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. याप्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.

No comments:

Post a Comment