Saturday, April 15, 2023

बीड चा बिहार होतोय का? सलग 3 दिवसात 3 हत्या; वाढत्या खुनाच्या घटनेने खळबळ.


*बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे की नाही ? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

बीड (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे की नाही ? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 3 दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी खुनाच्या घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अद्याप यातील दोन प्रकरणात आरोपी अटक नाहीत.सलग तीन दिवसात तीन खून झाल्याने बीडचा पुन्हा बिहार होतोय की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गुरुवारी मोबाईल चोरीची तक्रार दिल्याच्या रागातून, बीडच्या पाली येथील बिंदुसरा धरणालगत, अक्षय नावाच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. मयत अक्षयची हत्या करणारे त्याचेच मित्र असल्याचे तपासात उघड झाले आहे. हे दोन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत कुक्कडगाव येथील गणेश आठवले यांच्या शेतातील विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला. अज्ञात व्यक्तीने या महिलेची गळा चिरुन हत्या केली असावी, त्यानंतर तिचा मृतदेह विहिरीमध्ये फेकला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या महिलेचे वय साधारण 30 ते 32 वर्षांदरम्यान असावे. पिंपळनेर पोलिसांकडून महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंडके नसलेला मृतदेह आढळून आल्याने मृत महिला कोण आहे आणि मारेकरी कोण आहेत ? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

No comments:

Post a Comment