Wednesday, April 26, 2023

वसई-विरार महापालिका मुख्यालया समोर (ठाकरे) शिवसेनेचा ठिय्या ! पाणी आरोग्यासह अन्य समस्यांवर शिवसैनिक पुन्हा आक्रमक.

विरार (प्रतिनिधी) - नियोजनाच्या अभावामुळे शहरात उद्भवणारी पाणीटंचाई आणि सामान्य वसई-विरारकरांना मिळत नसलेल्या आवश्यक आरोग्य सुविधा याविरोधात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने मंगळवारी दुपारी वसई-विरार महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पाणी, आरोग्य आणि अन्य समस्यांवर संतप्त शिवसैनिकांनी पालिका आयुक्तांना जाब विचारला.

वसई-विरार शहराची लोकसंख्या आजघडीला 24 लाखाच्या घरात आहे. या लोकसंख्येला 350 एमएलडी इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत शहराला 230 एमएलडी इतका पाणीपुरवठा होत आहे. शहराला सूर्या धरण प्रकल्प योजनेतून 185 एमएलडी, उसगाव धरणातून 20 एमएलडी, पेल्हार धरणातून 14 एमएलडी आणि फुलपाडा पाणी योजनेतून 1.5 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय महापालिकेला खोलसापाडा-1 व खोलसापाडा-2 धरण योजनेतून 70 एमएलडी पाण्याची प्रतीक्षा आहे.
प्रत्यक्षात हा पाणीसाठी पुरेसा आहे. केवळ नियोजनाचा अभाव व महापालिकेकडून होणारा अपुरा  पाणीपुरवठा यामुळे शहरात पाणीटंचाई उद्भवत आहे. शहरातील बहुतांश इमारतींना पाणी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी मोटर लावून पाणी खेचले जात जात असल्यानेच सामान्य नागरिकांना या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे अशा मोटरधारकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संतप्त शिवसैनिकांनी या वेळी केली.

वसई पश्चिमेकडील सर डी. एम. पेटिट रुग्णालय, नालासोपारा पूर्वेकडील विजयनगर-तुळींज रुग्णालय, महापालिकेची 21 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, 9 दवाखाने यांच्यामार्फत वसई-विरार महापालिका वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या सोबतच जिल्हा परिषदेतील सोपारा, नवघर, निर्मळ, आगाशी, चंदनसार आणि कामण ही सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शासकीय रुग्णालये पालिकेकड़े हस्तांतरित करण्यात आली तर याचा फायदा नागरिकांना होऊन त्यांना वैद्यकीय सेवा वेळेवर आणि जलद उपलब्ध होईल, अशी अपेक्षा वसई-विरारकरांनी व्यक्त केली होती.

ही रुग्णालये पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी वसई शिवसेनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. त्याआधीही आरोग्य केंद्रांच्या हस्तांतरणासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात यावेत, अशी विनंती करण्यात आलेली होती. मात्र आजपर्यंत ही रुग्णालये पालिकेकडे हस्तांतरित झालेली नाहीत. जवळपास दोन हजार कोटींचे बजेट असलेल्या वसई-विरार महापालिका रुग्णालयांत कोणत्याच आवश्यक सुविधा मिळत नाहीत. शहरात सामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नसल्याने मुंबई-ठाणे येथे जावे लागत आहे. त्यामुळे  वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ड` अंतर्गत येणाऱ्या नालासोपारा-आचोळे आरक्षण क्रमांक- 455 व सर्व्हे क्रमांक- 6 येथील प्रस्तावित सुसज्ज दोनशे खाटांचे रुग्णालय व वसई येथील सर. डी. एम. पेटीट रुग्णालयाच्या जोड इमारतीचा प्रस्ताव होता.

नालासोपारा-आचोळे आरक्षण क्रमांक- 455 व सर्व्हे क्रमांक- 6 येथील प्रस्तावित सुसज्ज दोनशे खाटांच्या रुग्णालयाच्या कामाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने माहे सप्टेंबर 2021 मध्ये करण्यात आले होते. या कामासाठी वसई-विरार महापालिकेने 15 कोटी 82 लाख रुपये इतक्या निधीची तरतूद केलेली आहे. या रुग्णालयाच्या कामासाठी कार्यादेशही काढण्यात आलेले होते. तसेच वसई येथील सर डी. एम. पेटीट रुग्णालयातील जोड इमारतीचे भूमिपूजन माहे नोव्हेंबर 2020 मध्ये तत्कालिन पालकमंत्री यांच्या हस्ते झाले होते. या कामासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद पालिकेने केलेली आहे. मात्र या दोन्ही इमारतींचे काम अद्याप मार्गी लागलेले नाही. त्यामुळे वसई-विरारकरांच्या आरोग्य सुविधांकरता मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करणार असल्याचे शिवसैनिकांच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीत नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. या समस्यांचे निरसन व्हावे, याकरिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महानगरपालिका मुख्यालयावर दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी ‘धडक मोर्चा` काढण्यात आलेला होता.

जलवाहिनी जोडणी असूनही सामान्य नागरिकांना होत नसलेला सुनियोजित पाणीपुरवठा, पैसे भरूनही मिळत नसलेल्या जलजोडण्या, पालिकेच्या शाळा उपलब्ध नसतानाही पालिका वसूल करत असलेला शिक्षण कर, आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, शहरात होत असलेली वाहतूक कोंडी, जाहिरात धोरण नसल्याने अनधिकृत बॅनर, फलक आणि होर्डिंग यामुळे शहराचे होत असलेले विद्रुपीकरण, फेरीवाला धोरणाअभावी शहरात वाढत असलेले फेरीवाले आणि त्यांच्याकडून होत असलेली बेकायदा हफ्ता वसुली,  पालिकेच्या आरक्षित जागांवर झालेले अतिक्रमण, आरक्षित जागांचे पालिकेकडे होत नसलेले हस्तांतरण, नालेसफाई-गटारसफाई योग्य पद्धतीने व वेळत होत नसल्याने वसई-विरार शहरात दरवर्षी उद्भवत असलेली पूरस्थिती यासोबतच प्रशासकीय काळात पालिकेच्या विविध विभागांत बोकाळलेला अनिर्बंध भ्रष्टाचार याबाबत आपल्यासोबत मोर्चादरम्यान ऊहापोह करण्यात आलेला होता.

मात्र तब्बल चार महिन्यांचा कालावधी उलटूनही यातील बहुतांश समस्यांबाबत  महानगरपालिकेच्या वतीने कोणतीही ठोस कार्यवाही/कारवाई करण्यात आलेली नसल्यानेच या ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली.

मोटर लावून पाणीचोरी होत असलेल्या बार, रेस्टॉरंट व अन्य आस्थापनांविरोधात तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. तर फेरीवाल्यांविरोधात आजपासूनच कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

दरम्यान पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, पालघर जिल्हा महिला आघाडी प्रमुख तथा माजी नगरसेविका किरणताई चेंदवणकर, वसई विधानसभा संघटक विनायक निकम,वसई तालुका प्रमुख राजाराम बाबर, उपतालुका प्रमुख अनिल चव्हाण, गिरीश देवाशी, मनीष वैद्य, जनार्दन म्हात्रे, सुनील भालेकर, उदय जाधव, प्रदीप सावंत, किशोर पाटील,संतोष टेबवळकर , नम्रता वैती, भारती गावडे, सिद्धेश जोगळे, भूमिश सावे, प्रतीक जाधव, संजय गुरव, गणेश भायदे,राज सिंह अन्य शिवसैनिक या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते...!
जय महाराष्ट्र..!🚩🙏🏻

No comments:

Post a Comment