Tuesday, April 18, 2023

रस्त्यात अडवून भावावर हल्ला, बहिणीची मदतीसाठी घराकडे धाव; परत येताच आढळला भावाचा मृतदेह.


*रस्त्यात अडवून तीन ते चार जणांची मारहाण; एका आरोपीस पोलिसांनी अटक केल्याची माहिती. 

दिंद्रुड ( प्रतिनिधी) : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत एका पंधरा वर्षीय मुलाची रस्त्यात अडवून हत्या करत मृतदेह झाडाला लटकवल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. गुलाम मोहम्मद हाफिज मुर्तजा शेख असे मृताचे नाव आहे.

नित्रुड येथील गुलाम मोहम्मद हाफिज मुर्तजा शेख हा आपल्या बहिणीसोबत सरपण आणण्यासाठी सकाळी सात वाजता घराबाहेर पडला. दरम्यान, तीन ते चार व्यक्तींनी त्याला रस्त्यात अडवत मारहाण सुरु केली. यामुळे घाबरलेल्या बहिणीने घराकडे धाव घेतली. माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले असता एका झाडाला संशयास्पदरीत्या गळफास घेतलेल्या अवस्थेत गुलाम मोहम्मद हाफिज मुर्तजा शेख याचा मृतदेह आढळला.

दिंद्रुड पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. दिंद्रुड पोलीस स्टेशन बाहेर मृताचे नातेवाईकांनी गर्दी केली आहे. आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतल्याची माहिती असून पुढील तपास सुरु आहे.

No comments:

Post a Comment