परळी वैजनाथ : साप्ताहिक शिक्षण मार्गच्या वतीने देण्यात येणारे शिक्षक गौरव पुरस्कार जाहिर करण्यात आले असून ६ मार्च रोजी परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या शिक्षक साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.
६ मार्च रोजी परळी येथील नटराज रंगमंदिरात पाचवे बीड जिल्हा शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी, लेखक, भारूडकार विश्वंभर वराट हे आहेत. तर उदघाटन मुंबई येथील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते होणार असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी नगराध्यक्ष तथा अ. भा. मराठी नाट्य परिषद परळी शाखा अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी आहेत.
कार्यक्रमास चौथ्या संमेलनाचे अध्यक्ष कवी नागनाथ बडे, जेष्ठ साहित्यिक आबासाहेब वाघमारे, मराठवाडा साहित्य परिषदेचे परळी अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सुप्रसिद्ध कवी अरुण पवार, सावित्रीबाई फुले शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन शाम सातपुते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या शिवछत्रपती विद्यालाचे मुख्याध्यापक सुहास शिंदे, जि. प. प्रा. शाळा मांडवा येथील दिवाकर जोशी, कृष्णाबाई देशमुख कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण आटोळकर, कवी रामकिशन केकाण, जि. प. प्रा. शाळा लोणारवाडी, शैला प्रकाश मस्के सेलू, दौनापूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कैलास मोरे यांना शिक्षक गौरव पुरस्कार तर बालसाहित्यिक पुरस्कार कवी केशव कुकडे उर्फ मुक्तविहारी यांना आणि शेख गणी निजामोद्दिन यांना कलागौरव पुरस्कार जाहिर झाला आहे. पाचव्या शिक्षक साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते पुस्कार देण्यात येणार असल्याचे संयोजक रानबा गायकवाड व स्वागत समितीने म्हटले आहे.
No comments:
Post a Comment