Saturday, March 5, 2022

भारतातील पहिल्या विवाहित तृतीयपंथी सौ शिवलक्ष्मी यांच्या उपस्थितीत होणार किन्नर सपना आणि बाळूचा बीड जिल्ह्यातील पहिला विवाह .

बीड (प्रतिनिधी) सून म्हणून नांदायला गेलेल्या भारतातील पहिल्या तृतीयपंथी सौ.शिवलक्ष्मी संजय झाल्टे यांच्यासह त्यांचे पती संजय झाल्टे,शिवलक्ष्मी यांच्या सासू तसेच किन्नर आखाडाचे महाराष्ट्र व्यवस्थापन प्रमुख श्रीमंत ऋषिकेश महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीड जिल्ह्यात पहिल्या होणाऱ्या तृतीयपंथी किन्नर सपना आणि बाळूचा विवाह सोमवार दिनांक 7 मार्च रोजी सकाळी 11.35 वाजता श्रीक्षेत्र कंकालेश्वर मंदिर येथे होणार आहे.या विवाह सोहळ्याला प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन या अनोख्या विवाहसोहळ्याला ऐतिहासिक करावे असे आवाहन करणी सेनेच्या प्रदेशाध्यक्षा संध्या राजपूत यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातच नव्हे किंबहुना मराठवाड्यामध्ये किन्नर असलेली सपना पहिल्यांदा सून म्हणून नांदायला जाणार आहे. किन्नर सपना आणि तिचा प्रेमवीर बाळू धुताडमल यांचे मागील दोन वर्षापासून प्रेम आहे. या प्रेमाचे रुपांतर सोमवार दिनांक 7 मार्च रोजी सकाळी 11.35 वाजता प्रत्यक्ष विवाह बंधनात अडकून शिवपार्वतीचे रूप लाभणार आहे. दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव विवेक स्वामी, दैनिक सूर्योदयच्या पत्रकार शेख आयेशा रफिक आणि दैनिक बीड संचारच्या संपादिका प्रतिभा गणोरकर यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून किन्नर महिलांच्या सत्काराचे आयोजन केले आहे. या आयोजनाची तयारी करत असतांना किन्नर सपना आणि बाळू यांनी स्वच्छेने आम्ही दोघेही दोन वर्षापासून सोबत राहत आहोत आमच्या दोघांना लग्न करायचे आहे. या सत्कार सोहळ्यात लग्नाचा सन्मान आपण द्यावा अशी विनंती केली. त्यांच्या इच्छेनुसारच हा विवाह सोहळा पार पडणार आहे. लग्नाच्या पूर्वदिनी रविवार दिनांक 6 मार्च रोजी नववधू किन्नर सपना आणि नवरदेव बाळू यांच्या हळदीचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी नाळवंडी नाका, पेठ बीड भागात धार्मिक परंपरेनुसार होणार आहे. हा सोहळा देखील बघण्यासारखा राहणार असून किन्नर सपना आणि बाळू यांच्या विवाहाला प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक यांनी स्वतःहून उपस्थित राहत या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याला ऐतिहासिक करावे असे आवाहन करणी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संध्या राजपूत यांच्यासह प्रीत कुकडेजा, शितल धोंडरे, शीतल राजपूत यांनी केले असून करणी सेनेच्या वतीने किन्नर सपना हिचे कन्यादान करण्यात येणार आहे.

विवाहाला विरोध न करता आशीर्वाद द्यावेत - किन्नर सपना आणि बाळू
आमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. समाजाला वेगळे वाटत असेल मात्र आम्ही स्वतःला शिवपार्वतीचे रूप मानून एकरूप झालेलो आहोत. त्यामुळे आम्ही आमच्या स्वेच्छेने विवाहाच्या पवित्र बंधनात अडकणार आहोत. तेव्हा या विवाह सोहळ्याला कोणत्याही समाजकंटकांनी विरोध करून अडथळा निर्माण करण्यापेक्षा आम्हाला शुभ आशीर्वाद देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन नववधू किन्नर सपना आणि नवरदेव बाळू धुताडमल यांनी केले आहे.

लग्नाच्या मदतीसाठी यांनी दिले योगदान
करणी सेनेच्या प्रदेशाध्यक्षा संध्या राजपूत, प्रीत कुकडेजा, शितल धोंडरे, शीतल राजपूत यांनी कन्यादान करून लग्नातील जेवणाची जबाबदारी स्वीकारली आहे.नववधू किन्नर सपनाला सोन्याचे मणी मंगळसूत्र,चांदीचे जोडवे याची जबाबदारी टीव्ही नाईनचे जिल्हा प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्या पुढाकारातून भाजपा भटक्या-विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश भोसले यांनी स्वीकारली आहे. पायातील चांदीचे चैन संपादिका प्रतिभा गणोरकर यांनी तर नववधूचा लांचा ड्रेस पत्रकार शेख आयेशा यांच्या वतीने देण्यात येणार आहे.बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवेंद्र शेटे यांनी संसार उपयोगी साहित्य देण्याचे जाहीर केले आहे. बीड जिल्ह्यातील किन्नर महिलांना साडी-चोळी भेट देऊन सन्मान करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी 25 साड्या भेट दिल्या आहेत. याशिवाय आणखी दानशूरांनी पुढे येऊन या अनोख्या नववधुना विवाह स्थळी शुभेच्छा गिफ्ट आपल्या स्व इच्छेनुसार देऊन त्यांना पाठबळ द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment