Thursday, March 19, 2026

शिक्षण क्षेत्रात खळबळ! पगाराच्या विवंचनेतून शिक्षकाची दोन पानी सुसाईड नोट लिहून आत्महत्या.


गेवराई (प्रतिनिधी) : "श्री. गोरकर सर आणि श्रीराम शेळके यांनी माझा फेब्रुवारीचा पगार बंद केला, त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला आहे. हे दोन व्यक्ती माझ्या संसाराला कारणीभूत आहेत..." अशी हृदयद्रावक सुसाइड नोट लिहून अर्धामसला येथील एका ५५ वर्षीय शिक्षकाने आपले जीवन संपवले. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, याप्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैलास बाबूराव उघडे (वय ५५, रा. अर्धामसला) हे सिरसदेवी येथील एका खासगी माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. १४ मार्च रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या खोलीत दोन सविस्तर चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या, ज्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी मयताचे वडील बाबूराव गोलाजी उघडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, तलवाडा पोलिसांनी १७ मार्च रोजी गोरकर आणि श्रीराम शेळके यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

सुसाइड नोटमध्ये नावांचा उल्लेख.

पोलिसांना मिळालेल्या पहिल्या चिठ्ठीत उघडे यांनी पगार बंद झाल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे, तर दुसऱ्या चिठ्ठीत "गोरकर सर आणि श्रीराम शेळके हे माझ्या संसाराच्या विनाशाला कारणीभूत आहेत," असा गंभीर आरोप केला आहे. आर्थिक कोंडी आणि मानसिक त्रासामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे.

No comments:

Post a Comment