दिंद्रुड (प्रतिनिधी): बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील जवळा (परळी पोलीस हद्द) येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या असेफ समद शेख (वय ४ वर्ष) या चिमुकल्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी एका विहिरीत आढळून आला. या घटनेमुळे जवळा गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी रात्रभर राबवले शोध मोहीम
असेफ हा सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शोध घेऊनही तो न सापडल्याने शिरसाळा पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवली. मंगळवारी सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ दहिफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील पडकी घरे, शाळा आणि विहिरींची तपासणी सुरू केली. यावेळी घरापासून जवळच असलेल्या सुरेश मिसाळ यांच्या शेतातील विहिरीत असेफचा मृतदेह बुडालेल्या अवस्थेत आढळून आला.
विहिरीच्या कडेला असलेल्या फिरंगी चिंचा खाण्याच्या नादात असेफ विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. खेळत्या-बागळत्या वयातील असेफच्या अशा जाण्याने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पालकांनी आपल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
No comments:
Post a Comment