Saturday, September 21, 2024

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केलेल्या पिडितेला जिवे मारण्याची धमकी.


गंगाखेड (प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्या प्रकरणी २५ वर्षीय पिडितेने गुन्हा दाखल केल्याने तू माझ्यावर गुन्हा का दाखल केला, असे म्हणत गुन्ह्यातील आरोपी व अन्य दोघांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पिडितेने दिल्यावरून शुक्रवार रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या सोनपेठ तालुक्यातील एका २५ वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून जुलै महिन्यात मुकुंद भिमराव कांबळे रा. अंजनडोह तालुका धारूर जि. बीड याच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दि. ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता गुन्ह्यातील आरोपी मुकुंद भिमराव कांबळे व त्याचा भाऊ कृष्णा भिमराव कांबळे, चुलता रामराव गोपाळराव कांबळे सर्व रा. अंजनडोह तालुका धारूर जि. बीड हे पिडितेच्या घरी आले व तू माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा का दाखल केला, तुझ्या पोटातील बाळ मारून टाक असे म्हणत पोटातील बाळ खाली नाही केलेस तर तुला खतम करून टाकीन अशी जिवे मारण्याची धमकी मुकुंद कांबळे याने दिली तर त्याचा भाऊ कृष्णा भिमराव कांबळे आणि चुलता रामराव गोपाळराव कांबळे यांनी शिवीगाळ करून धमक्या दिल्याची तक्रार पिडितेने गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून शुक्रवार रोजी वरील तिघांविरुद्ध अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment