Thursday, April 4, 2024

अस्थिर जयदत्त क्षीरसागर आहेत तरी कुठ!बीड जिल्ह्याचं राजकीय प्रस्थ कौटुंबिक कलहामुळे बेदखल ?

बीड (परमेश्वर गिते) बीड जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक सारीपाटावर जयदत्त (अण्णा )क्षीरसागर नावाचं एक प्रस्थ होतं. परंतु ते प्रस्थ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं गेलं तरी कुठं?असा प्रश्न सामान्यजण उपस्थित करु लागले आहेत. कारण बीड जिल्हा आणि जयदत्त क्षीरसागर हे एक समीकरण होते.परंतु पुढच्या पिढीने अण्णांना राजकीय क्षेत्रातून बेदखल का ? केले हा प्रश्न अनुत्तरीत असला तरी अण्णांची भुमिका सुद्धा सध्या काहीच दिसत नाही. अनेक पक्षांना कवटाळून पाहिले परंतु ज्या त्या ठिकाणी अण्णांसाठी ब्रेकर निर्माण झाले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून अण्णांच्या कुटूंबियात कलह निर्माण झाल्याने अण्णा बेदखल झाले आहेत का?असा सवाल उपस्थित केला जातो आहे. परंतु अण्णा हे बेदखल होण्यासारखे नेतृत्व नक्कीच नाही. कारण अण्णांमध्ये ती किमया आणि ती इच्छाशक्ती आहे ज्यातून पुन्हा विश्व निर्माण करु शकतात. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक कार्यकर्ता, नेता व पदाधिकारी अण्णांच्या अनुपस्थितीबद्दल चर्चा करताना दिसतो आहे.
जयदत्त (अण्णा)क्षीरसागर यांची संपूर्ण हयात ही राजकारणात व समाजकारणात गेलेली आहे. अण्णांनी बीड जिल्ह्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. बीड जिल्हयाचे पालकमंत्री व विविध खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. जवळपास 40 वर्षापासून त्यांनी आमदारकी भोगलेली आहे.मधले काही अपवाद वगळता. जयदत्त अण्णा क्षीरसागर आणि डॉ.भारतभूषण क्षीरसागर या दोन नावाभोवती जिल्ह्याचे राजकारण फिरत होते. कारण दोन्ही भाऊ म्हणजे *' एक दिल दो जान है हम '* सारखे होते. परंतु त्यांच्या या नात्याला नजर लागली आणि पुढच्या पिढीने राजकारणात पाऊल ठेवण्यासाठी या नेत्यांना बाजूला सारले. जयदत्त अण्णा हे संयमी, अनुभवी, वैचारिक अधिष्ठान असलेले व्यक्तीमत्व तर डॉ.भारतभूषण क्षीरसागर हे अत्यंत तापट, हजरजबाबी आणि तेवढेच कठोर व्यक्तीमत्व होते. परंतु दोन्ही भावांमध्ये समन्वय होता म्हणून बीड नगरपालिका असो किंवा बीड जिल्ह्याचे राजकारण असो यात दोघांचा प्रभाव होता. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीपासून या कुटूंबियात दुरावा निर्माण झाला. आ.संदिप क्षीरसागर यांनी सवतासुभा निर्माण करुन आमदारकी पदरात पाडण्याची भुमिका घेतली अन् खुद्द चुलत्याच्या विरोधात निवडणुक लढविली अत्यंत अटीतटीच्या व प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आ.संदिप क्षीरसागर यांनी अवघ्या 1700 मतांनी जयदत्त अण्णा यांचा पराभव केला. पुढे अण्णा राजकारणापासून दूर राहिले. मूळ शिवसेनेसोबत राहिले परंतु मध्यंतरी शिवसेनेची दोन शकले पडली त्यात उद्धव ठाकरे सत्तेच्या बाहेर फेकले गेले तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्ट्रॉंग झाली परंतु अण्णा त्या ठिकाणी जावून आमदारकीवर दावा करु शकत नव्हते कारण अगोदरच त्याठिकाणी गर्दी जमलेली होती अनेकांनी गुढघ्याला बाशिंग बांधलेले आहे. मूळ राष्ट्रवादी जेव्हा एकसंघ होती त्यावेळी संदिप क्षीरसागर आमदार असल्याने त्या ठिकाणी जावू शकत नव्हते नंतर राष्ट्रवादीची सुद्धा दोन शकले झाली आणि संदिप क्षीरसागर हे शरदचंद्र पवार यांच्य राष्ट्रवादीसोबत राहिले त्या दरम्यान अण्णांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याच दरम्यान डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉ.योगेश क्षीरसागर यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अण्णांचा त्याठिकाणी निभाव लागला नाही. डॉ.भारतभूषण क्षीरसागर व जयदत्त अण्णा हे आज पूर्णत: राजकीय परिघाच्या बाहेर दिसत आहेत. कारण नवी पिढी राजकारणात सक्रिय झालेली आहे.परंतु त्यांना राजकीय छक्के पंजे ज्ञात नसल्याने कोणता डाव कशा पद्धतीने परतावयाचा किंवा हाणून पाडायचा याची समज नव्या नेतृत्वाला आलेली नसते. एकूणच जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांची बीड जिल्ह्यावर जी कमांड आणि एकमुठी नेतृत्व होते ते नेतृत्व आज कुठेतरी कमकुवत झाल्यासारखे दिसत आहे. कारण लोकसभा असो किंवा विधानसभा असो जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या सल्लामसलतीशिवाय होवू शकत नव्हती परंतु ही पहिली निवडणुक आहे की, ज्यात अण्णांचा सहभाग नाही किंवा ते प्रक्रियेत दिसत नाहीत परवा माध्यमांमध्ये अण्णा फिरत असल्याची बातमी प्रसारीत झाली अनेकांच्या चेहर्‍यावर आनंदाश्रु दिसू लागले. कारण अण्णांनी निवडणुक लढण्यापेक्षा सक्रिय असणे महत्वाचे मानले जाते. कारण जयदत्त अण्णा यांना मानणारा मोठा वर्ग बीड जिल्ह्यात आहे. संस्थानिक असून जिल्हाभरात संस्थेचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अण्णांची ही फरफट अनेकांना पाहवत नाही म्हणून अण्णा तुम्ही सक्रिय व्हा आणि योग्य ती भुमिका घ्या अशी साद कार्यकर्ते घालत आहेत. बीड जिल्ह्याच्या राजकारणातील हा ' तेजोमय कोहिनूर हिरा ' आज अलिप्त असल्याने अनेक मंडळी संधी पासून दूर असल्याची भावना कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे ' हीच खरी योग्य वेळ ' म्हणत जनसंपर्क वाढवा आणि योग्य तो निर्णय घ्या अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment