Monday, April 22, 2024

ज्योती मेटेंची माघार; बीडमध्ये आता तिरंगी लढतीची शक्यता.


बीड (प्रतिनिधी) बीड लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्याबाबत चर्चा रंगात होती.  शिवसंग्रामच्या नेत्या यांनी शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. परंतु बजरंग सोनवणे यांना शरद पवार  यांनी उमेदवारी जाहीर केली. यानंतर ज्योती मेटे यांनी माघार घेतली असून आता बीडमध्ये तिरंगी लढत होण्याची  शक्यता आहे. 

राज्याचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात सर्वात आधी भाजपने पंकजा मुंडे यांना उतरवलं. त्या पाठोपाठ चर्चा सुरु झाली ती ज्योती मेटेंच्या उमेदवारीची. मेटेंनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून थेट पवारांशी चर्चा सुरु केली. एकीकडे महायुतीशी संलग्न असलेल्या शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी असं शरद पवारांना भेटणं अन्‌‍ उमेदवारी मागणं सर्वांनाच धक्का देणारं होतं. पण हा धक्का भेटीपुरताच मर्यादित राहिला आणि अचानक बजरंग सोनवणे यांनी थेट शरद पवारांच्या  राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे ज्योती मेटेंबरोबरच सोनवणे ही उमेदवारीच्या स्पर्धेत उतरले. 

ज्योती मेटे चर्चेच्या फेऱ्या करत असताना राष्ट्रवादीने सोनवणेंची उमेदवारी जाहीर केली. यानंतर ज्योती मेटे यांनी मतदार संघात दाखल होत चाचपणी केली अन्‌‍ माघारीचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय जाहीर करतांना त्यांनी व्यापक जनहित लक्षात घेवून मतविभाजन टाळण्यासाठी माघारीचा दावा मेटेंनी केला. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे बजरंग सोनवणे यांनी देखील कौतूक केले असून त्यांच्या माघारीचा मला नक्की फायदा होईल; असं देखील सोनवणे यांनी म्हटले आहे.

आता महायुतीच्या पंकजा मुंडे, महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे हे प्रमुख उमेदवार सध्या तरी मैदानात आहेत. यातून तिरंगी लढतीचेच संकेत मिळत आहेत. उमेदवारी दाखल करण्यासाठी अजून ३ दिवस बाकी असल्याने बीडची लढत तिरंगी होणार की चौरंगी; हे लवकरच स्पष्ट होऊ शकेल.


No comments:

Post a Comment