बीड (प्रतिनीधी) शेळ्या चरत असलेल्या एकट्या महिलेला वाईट हेतूने छेडछाड करणाऱ्या तरुणाला विरोध केला म्हणून महिलेला कुऱ्हाडीने अमानुष मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील महाजनावाडी येथे घडली आहे . महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याने गंभीर जखमी महिलेवर बीड येथील काकु नाना खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पिडीत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील वंदना चंद्रकांत बोराडे वय (३६) ही महिला गावातील कॅनॉल परिसरात शेळ्या चारत असताना गावातील संकेत पपु गायकवाड हा त्या ठिकाणी आला. एकटी आहे, आजू बाजूला कुणीही नाही बघून अंगावर हात टाकून पदर ओढला. तसंच वाईट हेतूने अंगावर चढून आला. त्यामुळे वंदनाने त्याला पूर्ण ताकदीने विरोध केला.
यामुळे संतापलेल्या नराधम संकेत गायकवाडने हातातील कुऱ्हाडीने तिच्यावर हल्ला चढवला. डोक्यावर, हातावर आणि पायावर कुऱ्हाडीने मारहाण केली मारहाण एवढी भयानक होती की, डोक्यात ४० टाके पडले असून हात आणि पाय फॅक्चर झाला आहे.
घडलेल्या कृत्यानंतर वंदनाला रक्ताच्या थारोळ्यात सोडून नराधमयुवकांने तेथून पळ काढला
जखमी अवस्थेत वंदनाने आरडा ओरडा केल्यानंतर गावातील बाकीचे लोक धावून आले. त्यांनी तातडीने वंदनाला बीड येथील शासकीय दवाखान्यात दाखल केले.मात्र शासकीय रुग्णालयात आपल्यावर गुन्हा दाखल होईल या भितीने आरोपी व गावातील काही मंडळीने पिडीत महिलेला काकू नाना खाजगी हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत दाखल करुन काढता पाय घेतला. सदर प्रकरणाची माहिती उस्मानाबाद जिल्ह्यातील रहात असलेल्या महिलेच्या आई ला झाल्यानंतर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असलेले आई व भाऊ काकू नाना रुग्णालयात आले असता शुद्धीवर आल्यानंतर पिडीत महिलेने हा प्रकार सांगितला. या प्रकरणी पीडित महिलेची आई पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार घेतली नाही, असा आरोप केला आहे.
तसंच एवढी मारहाण झाल्यानंतर देखील आरोपी मोकाट फिरत असून त्याला अटक करा अशी मागणी पीडित नातेवाईकांनी केली आहे. पीडित महिलेच्या पतीचा काही दिवसांपूर्वीच खुन झालेला आहे तर पिडीत महिलेला दोन लहान मुले आहेत .
पिडीत महिलेवर बीड शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून पिडीतेवर गुन्हा दाखल करु नको म्हणून आरोपी कडून दबाव आणला जात असल्याचे कळते आहे. आरोपी नराधमावर गुन्हा दाखल करून न्याय द्या, अशी मागणी तिच्या आईने थेट पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात गावातील आरोपी हा पोलीसपाटील व्यक्तीचा मुलगा असल्याने पोलीस त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप पिडीत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.
No comments:
Post a Comment