Friday, November 6, 2020

मराठवाड्यात थंडीची तीव्रता जाणवु लागली.आठवडा भरात आणखी वाढणार.

औरंगाबाद: मागील पाच ते सहा दिवसांपासून गारठा वाढला आहे. त्यामुळे औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हुडहुडी भरणारी थंडी सुरू झाली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये आता थंडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. आगामी आठवडाभरात सर्वत्र थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर येथे मागील काही दिवसांत तापमानात घट झाली आहे. त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी थंडी वाढेल. मराठवाड्यातील काही भागात जास्त थंड वारे वाहतील. त्यामुळे या भागातही अजूनही थंडी वाढण्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणसह, गंगापूर, वैजापूर, गेवराई, बीड या भागांमध्ये थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. थंडी वाढू लागल्याने आता ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. सध्या वातावरणात धुरकटपणा वाढला आहे. त्यामुळे जमिनीवर कमी सूर्यप्रकाश येतो व दिवसाचेही तापमान कमी होताना दिसत आहे. किमान तापमानात घट होऊ लागली आहे. परभणी येथे 14.0 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. तर नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड या भागांतील किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. गुरुवारी दि.5 सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमानाची नोंद हवामान खात्याने केली आहे. यात औरंगाबाद 16.3, बीड 16.0, परभणी 14.0 , उस्मानाबाद 16.2, नांदेड 17.0 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे.

गहू पेरणीसाठी थंडी उपयुक्त : मराठवाड्यात सध्या रब्बीच्या पेरण्या सुरू असून, वाढणारी थंडी गहू, हरभरा, ज्वारी पिकांच्या पेरणीसाठी उपयुक्त मानली जाते. यंदा अतिवृष्टीसारखीच थंडीची तीव्र लाट राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

No comments:

Post a Comment