Friday, May 15, 2020

बीड शहर पोलीस ठाण्याचे वासुदेव मोरेंना निलंबित करा- आ.विनायक मेटे


बीड : बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे व त्यांच्या सहकार्‍यांनी व्यापार्‍यांना, दुकानदारांना, कर्मचार्‍यांना आणि आलेल्या ग्राहकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. त्यामुळे पोनि.वासुदेव मोरे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांना निलंबित करावे अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे आ. विनायक मेटे यांनी केली आहे.
 आ.विनायक मेटे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून जिल्हा प्रशासन चांगले काम करत आहे. परंतु शहर पोलीस ठाण्याचे पोनि.वासुदेव मोरे यांच्या सारखे अधिकारी चांगल्या कामाला गालबोट लावण्याचे काम करत आहेत. दि.12 मे रोजी जिल्हाधिकारी यांनी सकाळी 7 ते दुपारी 2 दरम्यान सर्व प्रकारची दुकाने उघडी ठेवण्यास मान्यता दिली. त्यानंतर बीड शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यापार्‍यांनी दुकाने उघडली. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोनि.वासुदेव मोरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी व्यापार्‍यांना, दुकानदारांना, कर्मचार्‍यांना आणि आलेल्या ग्राहकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांनी गरोदर महिलांची पण गय केली नाही. एवढ्यावर न थांबता त्यांनी व्यापार्‍यांना, कर्मचार्‍यांना पोलीस गाडीत बसवून शहर पोलीस ठाण्यात नेले. तुम्हाला जामीन मिळणार नाही, असे गुन्हे दाखल करतो अशी धमकी दिली. गुन्हे दाखल करुन घेयचे नसतील तर पैसे द्यावे लागतील असे सांगून अनेक व्यापार्‍यांकडून प्रत्येकी पन्नास हजार रुपये घेवून सुटका केली. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने दुकाने उघडली असल्याचे सांगितले व आदेशाची माहितीही पोनि.मोरे यांना दिली. तरीही त्यांनी हा प्रकार केला. तसेच मोरे यांच्याबद्दल दमदाटी करणे, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, अपमानास्पद वागवणे, मारहाण करणे, भ्रष्टाचार करणे या बद्दल अनेकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पोनि.वासुदेव मोरे व त्यांच्या सहकार्‍यांना निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व कडक शिक्षा करावी अशी मागणी आ.मेटे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment