परळी वैजनाथ (प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवर्तन दिनानिमित्त परळी रेल्वे स्टेशन परिसरात भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते भारत भाऊ ताटे व डी. जी. वाघमारे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम उत्साहात पार पडला.
डॉ. आंबेडकरांनी विषमता, अन्याय व अंधश्रद्धा निर्मूलन करून स्वच्छ, सशक्त आणि जागरूक समाज निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्या प्रेरणेतून परिवर्तन दिनाचे औचित्य साधत स्टेशन परिसरातील कचरा साफसफाई, प्लास्टिक बंदीविषयी जनजागृती, नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे आदी उपक्रम राबविण्यात आले.
या मोहिमेत अमोल रोडे, बापू ताटे, राहुल ताटे यांचा विशेष सहभाग राहिला. युवकांनी झाडू, हातमोजे व स्वच्छतेची साधने हातात घेऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचा आदर्श संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला.
कार्यकर्त्यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फक्त पूजेसाठी नाहीत; ते आचरणात आणणे हीच खरी कृतज्ञता आहे. समाजात परिवर्तन घडवायचे असेल तर स्वच्छता, शिक्षण आणि समता या मूल्यांवर सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे.”
या उपक्रमाचे स्थानिक नागरिक व प्रवाशांनी कौतुक केले. सामाजिक बांधिलकी जपत भविष्यात आणखी सेवा प्रकल्प हाती घेण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून, परळी शहरात सकारात्मक संदेश देणारी ही मोहीम प्रेरणादायी ठरत आहे.
No comments:
Post a Comment