*निवडणूक आयोगाकडे तक्रार; CCTV फुटेज देण्यास नकार.
*गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते मला आणि माझ्या समर्थकांना धमक्या देत आहेत,
*प्रशासनाची मनमानी पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह? निर्माण करणारी.
*शहरात गुटखा, मटका, बनावट दारू यांसारखे बेकायदेशीर धंदे खुलेआम सुरू.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषद निवडणुकीत ईव्हीएम मशिनद्वारे घोटाळा झाल्याची गंभीर शंका व्यक्त करत माजी नगराध्यक्ष व उमेदवार दीपक देशमुख यांनी परळीत पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी पक्षावर थेट आरोप केले. आमच्या विरोधातील प्रमुख दोन पक्षांचे उमेदवार निवडून येऊ नयेत, यासाठी हा डाव रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
देशमुख म्हणाले की, परळीतील निवडणुकीदरम्यान ८८ मतदान केंद्रे होती. मात्र प्रभाग क्रमांक १० मध्ये केवळ दोनच उमेदवार होते. एका मतदान केंद्रावर योग्य पद्धतीने मतदान झाले असून त्या ठिकाणी ३०७ मते पडली. मात्र उर्वरित ८७ मतदान केंद्रांवर कुठेही २७० ते ३०० च्या पुढे मतदानाचा आकडा गाठला गेला नाही, हे संशयास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाकडे तक्रार; CCTV फुटेज देण्यास नकार या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र मतदान केंद्रांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज देण्यास प्रशासनाने नकार दिला, ही बाब पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचे देशमुख म्हणाले.
*हायकोर्टात दाद मागणार*
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगासह माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
*धमक्या व गुंडगिरीचे आरोप*
पत्रकार परिषदेत बोलताना दीपक देशमुख यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या काही कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले. “गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते मला आणि माझ्या समर्थकांना धमक्या देत आहेत. खोटे गुन्हे दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त करू, अशा धमक्या दिल्या जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच परळी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांचे पती बाजीराव धर्माधिकारी यांच्याशी संबंधित व्यक्तींकडूनही जीवाला धोका असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. “शहरात गुटखा, मटका, बनावट दारू यांसारखे बेकायदेशीर धंदे खुलेआम सुरू असून, या माध्यमातून गुंडगिरी वाढवली जात आहे,” असेही ते म्हणाले.
*पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देणार*
या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेऊन तक्रार देणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
*निवडणूक पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी*
शरद पवार गटाच्या उमेदवारांसह आम्ही संयुक्तपणे मागणी करतो की, परळी नगर परिषद निवडणूक पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर घ्यावी. याचा सर्व खर्च देण्यास आम्ही तयार आहोत, असेही देशमुख यांनी सांगितले.
घटनेने दिलेल्या अधिकारानुसार ही मागणी असून, निवडणूक आयोगाने पारदर्शक पद्धतीने यावर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या खळबळ जनक पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे Replacement बाबा शिंदे, उत्तम माने, महादेव गंगणे, शेख शरीफ, नितीन चव्हाण, पंडित झिंजुर्डे, संजय जगतकर, अधी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment