Saturday, December 6, 2025

सर्व उमेदवारांना जेलमध्ये टाकून ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्याचा डाव. कायद्याने दिलेले अधिकार वापरल्यामुळेच आमच्या वर गुन्हे दाखल.- दीपक देशमुख


* पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांचे फोन रेकॉर्डिंग तपासले जावेत.

परळी (प्रतिनिधी) परळी नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया प्रचंड दबावाखाली पार पडल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते व माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांनी केला आहे. “सर्व राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) गटाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विविध प्रकरणांत अडकवून जेलमध्ये टाकायचे आणि त्यानंतर ईव्हीएम मशिनमध्ये काहीतरी घोटाळा करायचा हा दुर्दैवी कट रचला जात आहे, असा खळबळजनक दावाही त्यांनी माध्यमांसमोर केला.

निवडणूक पार पडल्यानंतर सुरुवातीला ३ डिसेंबरला होणारी मतमोजणी माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार २१ डिसेंबरला ढकलण्यात आली. मात्र, ज्या स्ट्रॉंग रूममध्ये मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत, त्याबाबत मोठा संभ्रम असून निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला असल्याचे देशमुख म्हणाले. या संदर्भात स्ट्रॉंग रूम परिसरात रीतसर गस्त घालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.४० वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली.

आम्ही उमेदवार व माध्यम प्रतिनिधींसह स्ट्रॉंग रूमकडे गेलो असता सुरुवातीला तीन रजिस्टरमध्ये सह्या करून प्रवेश दिला गेला. मात्र, दोन दिवसांनंतर अचानक वर जाण्यास मनाई करून खाली कॅमेरा लावून केवळ खुर्च्या टाकण्यात आल्या. थंडी, अपुरी व्यवस्था आणि रात्रंदिवस थांबण्याची परवानगी नसल्याने आम्ही लेखी तक्रार दिली. तरीही निवडणूक अधिकारी पक्षपातीपणे वागत असल्याचे स्पष्ट दिसत आहे, असा आरोप देशमुख यांनी केला.

कायद्याने दिलेले अधिकार वापरल्यामुळेच आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. स्ट्रॉंग रूम तपासणीसाठी नियमाप्रमाणे जात असताना पोलिसांनी आमच्या उमेदवारांवर लाठीचार्ज केला, कुठलेही लेखी आदेश न देता आमच्यावरच गोंधळाचा ठपका ठेवण्यात आला, असे त्यांनी सांगितले.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत परळीत ज्या पद्धतीने त्रास देण्यात आला, त्याच पद्धतीने आता नगरपरिषद निवडणुकीतही दबावाखाली काम सुरू असल्याचा आरोप करत, पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांचे फोन रेकॉर्डिंग तपासले जावेत. या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार करणार आहोत, असा इशारा देशमुख यांनी दिला.

इलेक्शन कमिशनच्या भूमिकेबाबत संशय असून, काहीतरी काळेबेरे सुरू आहे. उमेदवारांना अडकवून ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचा हा लोकशाहीविरोधी डाव आम्ही कदापी खपवून घेणार नाही, असे ठाम शब्दांत दीपक नाना देशमुख यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment