परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सामाजिक, धार्मिक व सेवाभावी क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ संत व विचारवंत वेदांताचार्य शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज (साखरखेर्डा) यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. बुलढाणाचे जिल्हाधिकारी श्री किरण पाटील यांच्या हस्ते महाराजांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सिंदखेडराजा येथील डॉ. अल्हाज असद बाबा मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने २५ डिसेंबर रोजी आयोजित एका भव्य समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती असलेल्या सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनी अध्यात्म, समाजसेवा आणि धार्मिक प्रबोधनाच्या माध्यमातून समाजमनावर अमीट छाप सोडली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत, ट्रस्टतर्फे विशेष सन्मानाने त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात देशभरातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सदर पुरस्कार सोहळा हजरत गौस-ए-आझम दस्तगीर बाबा दर्गा परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुकेश झवर, डॉ. अमजदखान पठाण, अयाज खान पठाण यांची उपस्थिती लाभली. डॉ. अल्हाज असद बाबा मेमोरियल ट्रस्ट ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. यंदा कॅन्सर निदान शिबिरासह विविध उपक्रम राबवत, समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून समाजसेवेस नवे बळ देण्याचे कार्य या ट्रस्टने केले आहे.
सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या या सन्मानामुळे साखरखेर्डा ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, मठाच्या माध्यमातून सुरु असलेले अध्यात्मिक कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
No comments:
Post a Comment