केज (प्रतिनिधी): केज तालुक्यात एका अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटनेने नात्याला काळिमा फासला आहे. 'दारू पिऊन घरी का आलास?' असे विचारणे एका पित्याच्या जीवावर बेतले असते. धारूर तालुक्यातील गांजपूर येथे शुक्रवारी (दि. ५) रात्री दारूच्या नशेत आलेल्या मुलाने रागाच्या भरात चक्क जन्मदात्या पित्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. नशिबाने ऐनवेळी कुऱ्हाड दांड्यातून निखळून पडल्यामुळे बापाचा जीव वाचला आणि पुढील अनर्थ टळला.
जखमी पिता रुग्णालयात, आरोपी जामिनावर.
जखमी भारत धोंगडे यांच्या हातावर पाच टाके पडले असून, प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गंभीर प्रकरणी जखमी पिता भारत धोंगडे यांच्या फिर्यादीवरून मुलगा नितीन धोंगडे याच्याविरुद्ध युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. युसूफवडगाव पोलिसांनी तातडीने नितीन धोंगडे याला अटक करत केज न्यायालयाने हजर केले. न्यायालयाने आरोपीला जामिनावर सोडण्याचे आदेश दिले.
No comments:
Post a Comment