बीड (प्रतिनिधी) : शिंदे सरकार निवडणुकांपासून लांब पळत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेते करत असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही आता निवडणुका घ्याच असं आव्हान दिले आहे. "कार्यकर्त्यांनो कामाला लागा. तुमच्या आणि माझ्या संघर्षाला सोन्याचे दिवस येतील. आपण आपला हक्क हात आपटून घेऊ," असं म्हणत पंकजा मुंडे यांनी निवडणुकीसाठी वज्रमुठ आवळली आहे.
भारतीय जनता पार्टीचे बूथ सशक्तीकरण, जिल्हा प्रशिक्षण वर्ग व जिल्हा कार्यकारिणीची बैठक मुंडे यांनी घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना "मुंडे साहेबांसारख करणं, त्यांची कॉपी करणे, यामुळे कोणीही मुंडे होत नाही तर त्यांच्या विचाराचे अनुकरण करून वागणं म्हणजे मुंडे साहेब आहे," असं म्हणत नाव न घेता भाऊ धनंजय मुंडेंवर पंकजा मुंडे यांनी निशाणा साधला.
फडणवीसांवरही साधला निशाणा...
तसेच यावेळी बोलताना त्यांनी "मठातला एखादा माणूस जवळ घेऊन लोकं जवळ आले, असा अविर्भाव आणू शकत नाही, लोक हे त्याच्या जवळ येऊ शकत नाहीत कारण त्याच्या मनामध्ये स्वार्थ आहे, "असं म्हणत बीडच्या गहनीनाथ गडावर आलेल्या देवेंद्र फडणवीसांवरही पंकजा मुंडेंनी सडकून टीका केली.
भाजपलाच दिला घरचा आहेर...
तसेच यावेळी बोलताना "त्यांनी निवडणुकाच होईना नगरपालिका होत नाही, जिल्हा परिषद होत नाहीत, मात्र ग्रामपंचायत होत आहेत, मला असं वाटतंय गावागावात युद्ध तयार झालंय, मात्र पुढे नाही," असं म्हणत निवडणुकांवरून पंकजा मुंडे यांनी भाजपला आता घरचाच आहेर दिला आहे.
No comments:
Post a Comment