Tuesday, June 23, 2020

आरोग्य उपसंचालक डाॕ .मालेंनी दिली स्थलांतरीत जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट.


* आ. मेटेंच्या तक्रारीची गंभीर दखल, डॉ. माले दोषींवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष.

बीड ;(प्रतिनीधी )- स्थलांतरीत जिल्हा रुग्णालयात उपचारा अभावी रुग्ण तडफडत असल्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतर याबाबत मोठ्या प्रमाणावर ओरड झाली, त्याचबरोबर कोविड रुग्णालयातही अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप आणि तक्रारी वरिष्ठांपर्यंत गेल्यानंतर आज आरोग्य उपसंचालक माले यांनी आदित्य डेंटल कॉलेजमधील जिल्हा रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली. परिस्थितीची पाहणी करून माले थेट जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या कार्यालयामध्ये डेरेदाखल झाले असून व्हिसीद्वारे ते जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलची माहिती घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
कोरोना महामारीने जिल्ह्याला अक्षरश: वेठीस धरले आहे. या महामारीपेक्षा जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभाराने सर्वसामान्य रुग्ण अत्यंत त्रासून गेला आहे. स्थलांतरीत जिल्हा रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांच्या कार्यकाळात अनेक आक्षेपार्ह घटना निदर्शनास आल्या. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार करण्याची तसदी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतली नाही  ते तडफडत रुग्णालयाच्या फरशीवर पडून राहिले. याचा व्हिडिओही व्हायरल झाला. तेथील महिला कर्मचार्‍यांसोबत छेडछाड करणार्‍या कर्मचार्‍याला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला त्यापाठोपाठ रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, डॉक्टर, कर्मचारी अरेरावी करतात, सुविधा नाहीत, स्वच्छता नाही, यासह अन्य प्रकारच्या तक्रारी आणि ओरड होत राहिली. विधान परिषदेचे आमदार विनायक मेटेंनी दोन दिवसांपूर्वी स्टिंग केले. रुग्णालयातील परिस्थिती पाहता त्यांनी याबाबत तक्रार केली. यासह अनेक बेजबाबदारपणाच्या घटना आरोग्य विभागाकडून झाल्याचे या आधी उघड झाले. कोरोनाबाबतीतही आरोग्य विभागाचा आणि जिल्हा प्रशासनाचा तुघलकी कारभार सातत्याने उघड होत आहे. या सर्व तक्रारींचा पाढा आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनापर्यंत गेल्यानंतर आज आरोग्य उपसंचालक माले यांनी अचानक आदित्य डेंटलमधील स्थलांतरीत जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तेथील पाहणी केली आणि ते थेट जिल्हा आरोग्य अधिकार्‍याच्या कक्षात जाऊन बसले. दुपारी एक वाजेपर्यंत माले यांनी कोविड रुग्णालयाला भेट दिली नव्हती. सुत्रांच्या माहितीनुसार माले जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या कक्षातून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांच्याशी व्हिसीद्वारे बोलणार आहेत. माले बेजबाबदार डॉक्टर-कर्मचार्‍यांवर काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

No comments:

Post a Comment