बीड (प्रतिनिधी) गेल्या दोन वर्षाच्या काळातील पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूरांची कारकीर्द कायदा सुव्यवस्थेची लक्तर महाराष्ट्राच्या वेशीवर टांगणारी ठरली.सर्वच आघाड्यावर अपयशी अधिकारी म्हणून जनता त्यांच्याकडे पाहत होती. पोलीस दलाची कारकीर्द मलीन करण्यात त्यांनी मोठा हातभार लावला. मात्र विधानसभेच्या निवडणूक अनुषंगाने बीडची इडा पिडा टळली असून नंदकुमार ठाकूर यांची बदली झाली आहे.त्यांच्या जागी अमरावती येथून शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष समजले जाणारे अविनाश बारगळ हे येत आहेत. बीडची विस्कटलेली घडी पुन्हा पूर्वीसारखी बसवून सामान्य जनतेला न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
. बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दोन वर्षाचा कार्यकाळ होय बाऽऽ। करण्यातच घालवला.सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी पदाचा प्रामाणिकपणे वापर कधीच केला नाही. अवैध धंद्यांसाठी ठाकूर यांची कारकीर्द सुवर्णकाळ ठरली. कायदा सुव्यवस्थेची लक्तर अनेक घटना मधून महाराष्ट्राच्या वेशीवर कित्येक वेळा टांगली गेली. बीडमध्ये घडलेल्या घटनांचे पडसाद विधानसभे मध्ये उमटून देखील त्यांना कधी या गोष्टींची खंत वाटली नाही. जातीय सलोखा कायम ठेवण्यात वेळीच हस्तक्षेप न केल्यामुळे ठाकूर यांना नेहमीच अपयश पदरी पडली. यामध्ये सर्वसामान्य जनता मात्र प्रचंड भरडली गेली.”कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा अन् आजच्या पेक्षा कालचा दिवस बरा! असं म्हणण्याची वेळ जनतेवर आली. चोऱ्या दरोडे अफवांचे पीक यामुळे तर बीड करांच्या झोपा हराम झाल्या तरी जनतेला अश्वस्त करण्याची त्यांना गरज वाटली नाही. साबळे सारखे अनेक अधिकारी वादग्रस्त ठरले असले तरी एसपींनी त्यांची पाठराखण करताना निवडणूक आयोगाच्या दिशा निर्देशाला लोकसभा निवडणुकीपूर्वी हरताळ फासला.आजही स्थानिक गुन्हे शाखेची तीच स्थिती आहे. भ्रष्टाचाराने अख्खी यंत्रणा पोखरून काढण्याचं काम यांच्याच कारकिर्दीत झालं. कोट्यावधी रुपयांचा चुना लावून जनतेच्या कमाईवर दरोडा घालणाऱ्या पतसंस्था,मल्टीस्टेट वाल्यांना अभयदान देत मस्त “गुलगुले” खाण्याचं काम त्यांनी केलं. एकंदरच दोन वर्षाच्या ठाकूर यांच्या “कृष्ण”कारकिर्दीची यादी जाहीर करताना देखील लेखणीतून बाहेर पडणारे शब्द देखील लाजतील अशी स्थिती बीडची करून ठेवली. शेवटी धनसंचय झाला असला तरी जनतेच्या तळतळाटाचं मोठं ओझं डोक्यावर घेत नंदकुमार ठाकूर यांची बीड मधील कारकीर्द संपुष्टात आली.
बीडला कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक म्हणून नावाजलेले अविनाश बारगळ अमरावती येथून येत आहेत. अमरावती मध्ये त्यांनी पोलीस विभागात चार वेळा विविध पदावर पोलीस दलात सेवा बजावली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक तसेच सीआयडी चे अधीक्षक म्हणून अमरावती मध्येच काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. अमरावतीच्या सीआयडी अधीक्षक पदावरून ते बीड ला पोलीस अधीक्षक म्हणून येणार आहेत.
No comments:
Post a Comment