चौसाळा येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालय पाच वर्षांपासून बंद. दलाला मार्फत चालवतात कारभार.

बीड (प्रतिनिधी) एकीकडे आधुनिक ज्ञान तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी पालकमंत्री तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यात कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.तर दुसरीकडे त्यांच्याच खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून बळीराजाची वाट लावली जात आहे. चौसाळ्यातील मंडळ कृषी अधिकारी कार्यालय तब्बल गेल्या पाच वर्षापासून अक्षरश: बंद आहे.या ठिकाणी 17 पद असली तरी एकही कर्मचारी कार्यालयाकडे फिरकतही नाही.अशी स्थिती राहिली तर मुख्यमंत्र्यांच्या शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाची घोषणा चुनावी जुमलाच ठरणार आहे.

( दोन वर्षांपूर्वी देखील हे कार्यालय असेच बंद होते. त्या वेळेसचे हे छायाचित्र)
चौसाळा मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी हे “आम्ही मुख्यमंत्र्यांचे भाऊ कोपरापर्यंत ओघळ येईपर्यंत खाऊ” असं म्हणत निलाजऱ्या सारखं शेतकऱ्यासह सरकारला ‘गंडे’ घालण्याचे काम गेल्या पाच वर्षापासून करत आहेत.तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार केली तरी नावाप्रमाणेच कसे तक्रारदाराला “गंडे” घालून आपले फंडे कायम ठेवायचे यात ते वाकबगार आहेत. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 17 सप्टेंबर, एक मे या दिवशी ध्वजारोहणा पूरतच कार्यालय उघडल जातं.मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात 17 पदं असली तरी एकही कर्मचारी कार्यालय उघडून बसण्याची तसदी घेत नाही. सर्वच शेतकऱ्यांपर्यंत कृषी सहाय्यक पोहोचलेच नाहीत. कृषी सहाय्यकांनी प्रत्येक गावात आपले दलाल निवडले आहेत. या दलाला मार्फत सर्व कामकाज केले जाते. योजनांचा लाभ त्यांची माहिती देखील त्यांनाच होते.त्यामुळे शेतकऱ्यांना पिकावर पडलेल्या रोगराई संदर्भात मार्गदर्शन मिळत नाही. नॅनो युरिया डीएपी घ्यायचं म्हटलं तरी कामधंदा सोडून पैसा खर्चून बीडला जावं लागतं. बीडला गेलं तरी तेथेही कृषी सहाय्यक भेटेल याची शाश्वती नाही. अर्थात ते शेतकऱ्यांच्या बांधावरही नाहीत व कार्यालयातील खुर्चीवर देखील सापडत नाहीत. दुर्दैवाने एखादा कृषी सहाय्यक बीडमध्ये भेटलाच तर त्याच्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. दोन दोन चार चार चकरा बीडला माराव्या लागतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अर्जव करावी लागते .मंडळ कृषी अधिकारी चौसाळ्यात नसल्याने बळीराजाच्या नशिबी नुसतच घुमऽऽरे! येत आहे.त्यामुळे सरकारचं फुकटचं घ्यायचं म्हटलं तरी “भीक नको पण कुत्रा आवर”असं म्हणण्याची वेळ चौसाळा परिसरातील बळीराजावर येऊन ठेपली आहे. गावोगावी नियुक्त केलेल्या अ(न)मोल दलाला मुळे कृषी कार्यालयाचा कारभार ग्रामीण भागात सडकी ढेप बनला आहे.
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी. ते ज्ञान त्यांना सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने बीड सारख्या मागासलेल्या जिल्ह्यात कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले. देशाचे कृषिमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी शेतकरी आमचा लाडका भाऊ असं म्हटलं असलं. शेतकऱ्यांचा उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा केल्या असल्या तरी त्या किती जनतेला मूर्ख ठरवणाऱ्या आहेत. हे कृषी विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे उघडकीस आले आहे. किमान जनतेच्या तक्रारींची दखल घेऊन मंडळ कृषी कार्यालय पूर्ववत चालू करावं, मुजोर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हकालपट्ट्या करण्यात याव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
No comments:
Post a Comment