Thursday, December 8, 2022

कर्नाटकात सामील होणाचा ठराव करणार्‍या ग्रामसेवक आणि सरपंच सदस्यांवर होणार कारवाई.!


*जिल्हाधिकार्‍यांनी मागितला अहवाल...

सोलापूर (प्रतिनिधी) अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांवर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केल्यानंतर; अक्कलकोट तालुक्यातील सीमावर्ती भागातील काही गावांना बळ मिळाले होते. त्यानंतर 'सुविधा द्या, नाहीतर कर्नाटकात जाण्याची परवानगी तरी द्या.! अशा मागणीचा ठराव करून, ११ ग्रामपंचायतींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते. परंतु, आता या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे प्रशासनाने निर्णय घेताच; ११ पैकी ६ ग्रामपंचायतींनी पळ काढला आहे. तर दिलेले निवेदन आणि केलेले ठराव रद्द करत असल्याचे सांगून, त्यांनी आंदोलनातून माघार घेतली आहे. तसेच ठरावाचा अजेंडा काढणाऱ्या त्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा परिषदेला दिल्या असल्याची माहिती देण्यात आलीय.

कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्न पेटलेला असतानाच.! अक्कलकोट तालुक्यातील ११ गावांनी सुविधा द्या; अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, अशा आशयाचे ठराव ग्रामपंचायतीमध्ये मंजूर करून, त्यासंदर्भातील निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर ही गावे चर्चेत आली होती. संबंधित गावांची इच्छा कर्नाटकात जाण्याची असेल तर महाराष्ट्राने त्यांना अडवू नये असे विधान कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून आल्यानंतर या गावांना आणखी बळ मिळाले होते. त्यावरून सीमावर्ती भागात महाराष्ट्र विरोधात आणि कर्नाटकाच्या समर्थनाचे वातावरण निर्माण झाले होते. यावरून सीमा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगरताच या भागात खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment