Thursday, December 17, 2020

कै.शंकरराव गुट्टे महाविद्यालय धर्मापुरीत सम्यक प्रतिनीधीक कविता संग्रहाचे प्रकाशन संपन्न.यानिमित्त पडला खादी सत्काराचा पायंडा.

धर्मापुरी ;- (प्रतिनीधी) पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या सत्काराला थोडेसे बाजूला ठेवून सत्काराला शाल न वापरता, खादीचा रुमाल ( गमजा ) वापरून कार्यक्रमाच्या ' आधी सत्काराला' ,' खादी सत्कारात ' रुपांतरीत करण्याचा छोटासा पायंडा येथील कै शं गु महाविद्यालयात परवा एका छोटेखानी कार्यक्रमात पडला आहे.यासाठी अहमदपूर येथील खादी भांडारातून १४० रु किंमतीचे रुमाल आणले होते.
          निमित्त होते, प्रा ज्ञानेश्वर गायकवाड, कुरुळेकर संपादित ' सम्यक ' या प्रातिनिधिक कविता संग्रहाच्या प्रकाशनाचे. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात हा छोटेखानी प्रकाशन सोहळा दि १४ डिसें २० रोजी म्हणजे ' आधुनिक वाल्मिकी ' गीतरामायणकर्ते गदिमांच्या पुण्यस्मरण दिनी आयोजित करण्यात आला होता.कै शं गु महाविद्यालयातील कवी प्रा भगवान आमलापूरे यांच्या सम्यक या प्रातिनिधिक कविता संग्रहालयात १० कवितांचा समावेश आहे.
         महाविद्यालयातील तत्कालीन रासेयो कार्यक्रम अधिकारी  program officer,समन्वयक coordinator, प्रा डॉ सीरसाट डी बी सर यांनी त्यांच्या कार्यकाळात सलग तीन वर्षे, प्रत्येक सत्कार प्रसंगी पुष्पहाराऐवजी झाडाचे रोपटे देण्याचा पायंडा पाडला होता. त्या पायंड्यास या खादी सत्कारामुळे उजाळा मिळाला.व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ टी एल होळंबे तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यालयीन अधिक्षक ( Office superintendent ) संभाजीराव अंबेकर सर उपस्थित होते.कवी प्रा भगवान आमलापूरे यांचीही उपस्थिती होती.
         प्रास्ताविकात प्रा मामडगे पी डी म्हणाले की मराठीतील आघाडीचे गझलकार प्रदिप निफाडकर यांच्या कल्पनेतून गदिमांच्या पुण्यस्मरण दिनी म्हणजे आज दि  १४ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, देशातील ०५ राज्य आणि ०६ देशात एकाच वेळी गदिमांच्या गीत, कवितांचा जागर करून अनोखे आंदोलन केले जाते आहे. या पाठीमागे उद्देश हा आहे की शासनाने त्यांचे यथोचित स्मारक उभारावे. आणि गझलकार प्रदिप निफाडकर यांच्या हाकेला ओ देत या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय कवी स्वतःच्या प्रतिभेने इतरांना जे दिसत नाही ते पाहतात. म्हणून जे न देखे रवी ते देखे कवी, असे म्हणतात. निश्चितच या संग्रहातील १० पैकी बऱ्याच कविता वाचनीय आहेत. मला आवडलेली एक कविता मी वाचून दाखवितो असे म्हणून ,संसारिक संत ही कविता वाचून दाखवली.
      आपण विल्यम शेक्सपिअरने नाटके लिहली असे म्हणतो, पण तो कवी सुद्धा होता. नाटकातील भाषा काव्यमय होती. शेक्सपिअरने काही सुखांत नाटके, commedes,काही दुखांत नाटके , tragedies लिहल्या, तर आयुष्याच्या शेवटी काही tragi - commedies लिहल्या. म्हणून माझ्या महाविद्यालयीन जीवनात प्राचार्य डॉ मिरजगावकर सर म्हणायचे की माणसाचे आयुष्य हे सुखदुःख यांचा घटनक्रम आहे. कदाचित मानवी जीवनाचे हे वास्तव लक्षात घेऊनंच एक धागा सुखाचा, शंभर धागे दुखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा ,तुझया आयुष्याचे. हे मराठी भावगीत अजरामर झाले आहे.
          प्रा गजलवार आर के यांनी या प्रकाशन सोहळ्यात गदिमांच्या ' माहेर ' या कवितेचे अभिवाचन करून कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.याच कार्यक्रमात ग्रंथपाल दराडे जी एस यांचा यथोचित सत्कार करून दोन कविता संग्रह ग्रंथालयात समाविष्ट करून घेण्यासाठी देण्यात आले.
कवी प्रा भगवान आमलापूरे यांनी पण मनोगत व्यक्त केले.आणि संपादक प्रा ज्ञानेश्वर गायकवाड यांचे आभार मानले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ टी एल होळंबे म्हणाले की कविता करणे हा कविचा छंद आहे. संकलन महत्त्वाचे आहे.या नवनिर्माणासाठी वेळ  द्यावा लागतो.काही गोष्टीचा त्याग करावा लागतो. प्रकाशनासाठी पैसा लागतो. वाचन ,मनन आणि चिंतन लिखाणासाठी आवश्यक असते. या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणजे हा कविता संग्रह होय.
        दरम्यान प्राचार्य डॉ टी एल होळंबे, प्रा गजलवार आर के आणि प्रा मामडगे पी डी यांनी कविचे अभिनंदन करून पुढील वाङमयीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  सुत्रसंचालन आणि आभार प्रा मामडगे पी डी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लोकनेते स्व गोपीनाथराव मुंडे आणि गदिमांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

No comments:

Post a Comment