Saturday, March 7, 2020

जामखेडमध्ये वाळुचोरांचा प्रताप : मंडलाधिकाऱ्यांचेच केले अपहरण.

जामखेड : ( प्रतिनीधी ) पकडलेला वाळूचा ट्रक जप्त करून तहसील कार्यालयात नेत असताना वाळूचोरांनी ट्रकसह मंडला धिकाऱ्याचेच अपहरण केले. पोलिसांनी त्यांची सुटका गेली. मात्र, नंतर मंडलाधिकारी व तहसीलदारांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. 
महसूल विभागाने कारवाईसाठी वापरलेल्या खासगी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेचा निषेध म्हणून महसूल कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून 'काम बंद' आंदोलन केले. मंडलाधिकारी नंदकुमार गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील किसन आजबे, (रा. जमदारवाडी) व पोपट दिलीप हळनावर (रा. जांबवाडी रोड) आणि अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
तहसीलदार विशाल नाईकवाडे, मंडलाधिकारी गव्हाणे, तलाठी सुखदेव कारंडे, शिवाजी हजारे यांचे पथक जामखेड-अरणगाव रस्त्यावर मध्य रात्री गस्त घालत होते. या वेळी अरणगाव ते खडकत रोडवर वाळू वाहणारा ट्रक (एमएच 16 सीसी 5769) जामखेड कडे येत होता. पथकाने ट्रक अडवून ताब्यात घेतला. आरोपी सुनील आजबेसह ट्रक तहसील कार्यालयात आणत असताना ट्रक मालक पोपट दिलीप हळनावर याने जीपमधून (एमएच 16 बीएच 8251) येऊन ट्रक अडविली. नंतर मालक व चालकाने ट्रक तहसील कार्यालयाकडे न नेता त्यात बसलेल्या मंडला धिकारी गव्हाणे यांच्यासह पळवून नेला. या वेळी त्यांनी ट्रकमधील वाळूही रस्त्यातच टाकून दिली. हा ट्रक गव्हाणे यांना घेऊन आष्टी (जि. बीड)च्या हद्दीत नेला.
तहसीलदार नाईकवाडे यांनी तातडीने जामखेड व आष्टी पोलिसांना माहिती दिली. जामखेड पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून आष्टी हद्दीत ट्रक पकडला व गव्हाणे यांची सुटका केली आणि ट्रक पहाटे पोलिस ठाण्यात आणला.  पोलिसांनी ट्रकचालक पोपट हळनावर यास ताब्यात घेतले आहे. अन्य तीन आरोपी पळून गेले. दरम्यान, या कारवाईत अधिकाऱ्यांनी वापरलेल्या तलाठी शिवाजी हजारे यांच्या मोटारीच्या काचा आरोपींनी फोडल्या.

No comments:

Post a Comment