Monday, June 30, 2025

कांताबाई भीमाशंकर स्वामी (मठपती) यांचे दुःखद निधन.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जंगम गल्ली, परळी वैजनाथ येथील रहिवासी व समाजसेविका श्रीमती कांताबाई भीमाशंकर  स्वामी (मठपती) यांचे रविवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता दुःखद निधन झाले. निधन समयी त्या ७१ वर्षांच्या होत्या.
कांताबाई स्वामी (मठपती) या अत्यंत मनमिळावू, सुस्वभावी आणि सामाजिक कार्यात सक्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून परळीत सर्वपरिचित होत्या. वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता.
त्यांच्या पश्चात एक मुलगा धनंजय स्वामी (मठपती), नातु गणेश , अनुराग , आदित्य , एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
आज सोमवार, दिनांक ३० जून रोजी त्यांच्यावर वीरशैव लिंगायत स्मशानभूमी, परळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीस समाजातील अनेक मान्यवर, नातेवाईक,  आणि हितचिंतक उपस्थित होते. स्वामी कुटुंबीयांच्या दुःखात दैनिक कांतीकारी साथी परिवार सहभागी आहे.

मुलाचा काही तरुणांशी पूर्वीचा वाद.त्याच रागातून टोळके रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरात शिरले.व आई-वडिलांना चाकूच्या धाकावर मारहाण.


बीड (प्रतिनिधी) बीड शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने टोक गाठले आहे. शाहूनगर भागातील गजानन कॉलनीमध्ये तब्बल ३० ते ४० जणांच्या टोळक्याने एका कुटुंबावर मध्यरात्री हल्ला चढवत दगड आणि चाकूचा वापर करून बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दिनकर आडागळे आणि त्यांच्या पत्नी रेणुका आडागळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आडागळे कुटुंबाच्या मुलाचा काही तरुणांशी पूर्वी वाद झाला होता. त्याच रागातून हे टोळके रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात शिरले. "तुमचा मुलगा कुठे लपलाय?" असा जाब विचारत आरोपींनी चाकूचा धाक दाखवून घरातील साहित्याची तोडफोड केली आणि कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. आडागळे यांच्या मुलीवर देखील चाकू उगारण्यात आल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कुटुंबीयांनी आपल्या मुलाच्या जीवाला धोका असल्याची तक्रार करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड हादरून गेला होता. अशातच पुन्हा घडलेली ही घटना कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे बोट दाखवते.

Sunday, June 29, 2025

विद्यार्थिनीचा लैंगिक छळ. पवार, खाटोकर अजूनही मोकाट. बीडचे उमाकिरण संकुल चर्चेत.


बीड (प्रतिनिधी) : शहरातील नावाजलेल्या उमाकिरण शैक्षणिक संकुलात विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन शिक्षकांनी एका अकरावीच्या वर्गातील मुलीचा वर्षभर लैंगिक छळ केला. याप्रकरणात गुरुवारी (दि. २६) रात्री गुन्हा दाखल होताच शुक्रवारी याचे पडसाद उमटले. सकाळी ८ वाजताच पालक क्लाससमोर जमा झाले. गर्दी पाहून क्लासला सुट्टी देऊन कुलूप लावण्यात आले. लोक आक्रमक झालेले पाहून पाेलिसांचा फौज फाटा वाढविण्यात आला होता, तर शिक्षकांना तात्काळ बेड्या ठोका, असे म्हणत काही पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी क्लासच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

बीड शहरातील पांगरी रोडवर आदर्शनगर भागात उमाकिरण शैक्षणिक संकुल आहे. एकाच छताखाली फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ असे विषय शिकवले जातात. याचे वेगवेगळे संचालक आहेत. विजय पवार हा फिजिक्सचा संचालक आहे. त्याच्याकडेच प्रशांत खाटोकर हा शिक्षक होता. पवार हा केवळ आर्थिक व्यवहार पहात असे. याच दोघांनी मिळून १७ वर्षाच्या विद्यार्थिनीचा एक वर्षभर वारंवार लैंगिक छळ केला. तिला बॅड टच करत तिचे नग्न करून फोटो मोबाइलमध्ये काढले. या घटनेत गुरुवारी रात्री गुन्हा दाखल होताच जिल्हाभरात याचे पडसाद उमटले. या घटनेचा निषेध नोंदविण्यासह आरोपींच्या अटकेसाठी आंदोलनेही झाली. काहींनी अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांचीही भेट घेतली होती. त्यांनी आरोपी शिक्षकांच्या शोधासाठी तीन पथके तैनात केल्याचे सांगून लवकरच त्यांना अटक करू, असे अश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

क्लासची वेळ काय?

सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे क्लासेस सुरू असतात. शासन शाळांची वेळ ९ करत असले तरी क्लासेसवाले मनमानी कारभार चालवत असल्याचे यानिमित्ताने चव्हाट्यावर आले.

एका विषयासाठी २२ हजार शुल्क.

उमाकिरण क्लासेसमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एका विषयाला २२ हजार रुपये शुल्क आकारले जात आहे, तर अकरावीच्या १८ हजार. एक रुपयाही हे लोक कमी घेत नाहीत. शुल्क भरायला उशीर झाला तर त्यांना क्लासमधून बाहेर काढले जाते. मुलांना अपमानित केले जात असल्याचा प्रकारही येथे होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एका वर्गात १५० विद्यार्थी.

या क्लासमध्ये पैसे घेऊन जनावरांसारखे विद्यार्थी काेंबून बसविले जातात. एका वेळेला एका बॅचमध्ये १५०च्या जवळपास विद्यार्थ्यांना शिकविले जाते. सर्वात मागे बसलेल्या विद्यार्थ्याला तर काहीच समजत नाही, अशाही प्रतिक्रिया शुक्रवारी ऐकायला मिळाल्या.

क्लासच्या भोवती पोलिसांचा गराडा.

गुन्हा दाखल होताच गुरुवारी रात्रीपासूनच क्लासेसला बंदोबस्त दिला. शुक्रवारी सकाळी गर्दी जमल्याने सर्व बाजूने पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, शीतलकुमार बल्लाळ, किशोर पवार यांच्यासह १०० जवळपास अधिकारी, कर्मचारी येथे शस्त्रांसह तैनात होते.

विद्यार्थ्यांचे पैसे परत करा.

खासगी क्लासमध्ये मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे क्लास बंद करून आमच्या मुलांची फीस परत करा, अशा प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केल्या. केवळ पवारच नव्हे इतर ठिकाणी तरी आमची मुले सुरक्षित राहतील, याची हमी काय, असा सवाल पालकांनी उपस्थित केला. त्यामुळे या सर्वच क्लासला कुलूप लावा, अशा संतप्त भावना ऐकायला मिळाल्या.

आम्ही पूर्ण सहकार्य करू.

उमाकिरण संकुल हे इमारतीचे नाव असून, तेथे चार विषय शिकविले जातात. अकरावी व बारावीचे विद्यार्थी आमच्याकडे आहेत. शुक्रवारी सकाळी ७ वाजताची बॅच सुरूही झाली होती. परंतु ८ वाजता प्रशासनाच्या विनंतीने सोडण्यात आली. या प्रकरणाचा आम्ही निषेध करतो. तसेच पोलिसांनी योग्य तपास करून सत्य बाहेर आणायला हवे. आम्ही पूर्ण सहकार्य करू. शैक्षणिक संकुलाची नकारात्मकता थांबवायला हवी.- प्रा.राम अबदर, संचालक, उमाकिरण संकुल (केमिस्ट्री)

पोलिस तपास करतील.

अशा गंभीर प्रकरणात कोण खरे आणि कोण खोटे, यावर काहीच भाष्य करणार नाही. पोलिस योग्य तपास करतील.- प्रा. चौभारे, अध्यक्ष, प्रोफेशनल टीच असोसिएशन, बीड

विजय पवारचे नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल.

विजय पवार याने मागील काही दिवसांत शिक्षण क्षेत्राच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे. तो प्रोफेशनल खासगी क्लासेस चालवतो. शिवाय, त्याच्या इंग्लिश स्कूलही आहेत. त्याचे राजकीय नेत्यांसोबत नियमित उठ-बस असते. या घटनेनंतर त्याचे राजकीय नेते, प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते आदींसोबतचे फाेटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हेच फोटो पाहून अनेकदा पालक, विद्यार्थी शांत बसत होते, अशी चर्चा शुक्रवारी सकाळी ऐकायला मिळाली.

पोलिस ठाण्यातही जमाव.

शिवाजीनगर पोलिस ठाण्यातही शिक्षण व इतर क्षेत्रातील लोकांचा जमाव जमला होता. प्रशांत खाटोकर हा वडवणीचा मूळ रहिवासी आहे. त्यामुळे वडवणीचे लोकही येथे जमले होते.

राजकीय पुढारी गप्प का?

या प्रकरणात एकाही राजकीय नेत्याने अद्यापर्यंत अधिकृतपणे पुढे येऊन प्रतिक्रिया दिली नाही. दोन्ही आरोपी मोकाट आहेत. पीडिता आणि तिचे कुटुंब दहशतीखाली आहे. एरव्ही किरकोळ कारणांवरून आवाज उठविणारे राजकीय नेते या प्रकरणात गप्प का? असा प्रश्न आहे.

मुलींनो, पुढे या, तक्रार द्या.

यापूर्वीही अशाप्रकारे कोणाचा छळ झाला असेल किंवा त्रास दिला असेल तर मुलींनी पुढे येऊन सांगावे. मुली घाबरत असतील तर पालकांनी यावे. आम्ही महिला कर्मचाऱ्यांमार्फत आधार देऊन वस्तूस्थिती समजून घेऊ. मुलींची तक्रार घेऊन चौकशी करून कारवाई केली करू, असे पिंक पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार लांडगे यांनी सांगितले.

बिहारी कामगारांचे मुले शिकणार बीडच्या जिल्हा परिषद शाळेत; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार.


बीड ( प्रतिनिधी) बिहार येथून रोजगाराच्या शोधा त   येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधकामावर मजूर म्हणून आलेल्या कुटुंबातील तीन बालकांना पोलिस कॉलनीतील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी प्रवेश देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीमुळे दुर्लक्षित घटकांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले. शेख नाजली बेगम मु. नौशाद (इयत्ता तिसरी), शेख शहाजान (इयत्ता दुसरी) व शेख खुशनूरी (इयत्ता पहिली) अशी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते या नवप्रवेशितांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. मुलांशी आपुलकीने संवाद साधत त्यांना नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे आणि अभ्यासात लक्ष घालण्याचे मार्गदर्शन केले. पालकांनाही मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना नियमित शाळेत पाठविण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिले अन् त्यांच्या शिक्षणाचा प्रारंभ झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कामावर बिहार येथील कामगार आहेत. हे कामगार परिसरातच पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. एके दिवशी त्यांची मुले कार्यालय परिसरात खेळताना दिसून आल्याने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी वाहन थांबवून या मुलांच्या पालकांशी चौकशी केली. ही मुले शाळेत नाहीत का? असा प्रश्न विचारून माहिती घेतली. त्यानंतर शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांना कळविले. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी खान समंदर हमीद यांना सूचित केले. त्यानंतर खान यांनी संबंधित मजूर कुटुंबाशी संवाद साधून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आवश्यकता लक्षात घेतली. त्यानंतर पोलिस कॉलनीतील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खेडकर यांच्याशी चर्चा करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने या मुलांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ घडवून आणला.

बीडच्या विमानतळासाठी तीन गावांतील शासकीय व खासगी ३०८ हेक्टर जमीन प्रस्तावित.


बीड (प्रतिनिधी): नियोजित विमानतळाच्या जागेसह अन्य दोन विषयांच्या संदर्भाने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी विकासकामांचा आढावा घेतला. बीड तालुक्यातील नियोजित विमानतळ जागेसाठी शासकीय व खासगी अशी एकूण ३०८ हेक्टर जमीन प्रस्तावित करण्यात आली असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा व्हीसीद्वारे पालकमंत्री पवार यांनी २५ जून रोजी घेतला. या बैठकीस सचिव राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या तीन महत्त्वाच्या कामाची सद्य:स्थिती नमूद केली. बीड येथील नियोजित विमानतळासाठी मौजे कामखेडा, दगडी शहाजानपूर व आहेर चिंचोली या तीन गावांतील ११७.०४ हेक्टर शासकीय जमीन व १९१.२८ हेक्टर खासगी अशी एकूण ३०८.३२ हेक्टर जमीन प्रस्तावित करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी स्वत: जागेची पाहणी केली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी विमानतळासाठीची जागा सुयोग्य आहे का? हे तपासण्यासाठी प्री-फेसिबिलिटी स्टडीची माहिती मागवून घेत याबाबतच्या तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाकडे रुपये ४०.३२ लाख निधी दिला असल्याचे सांगण्यात आले. तसेच रेल्वे मार्ग कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने ट्रॅक्शन सबस्टेशन आष्टी येथील कामाचा आढावा घेण्यात आला. सदर रेल्वे लाईनवरील २३ पैकी १७ मनोऱ्यांचे काम महापारेषण मार्फत करण्यात आले आहे. उर्वरित चार मनोऱ्यांचे काम प्रगतिपथवार असून, १५ जुलैपर्यंत सदरील काम पूर्ण करण्यात येणार आहे.

पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रस्ताव सादर.

परळी तालुक्यातील लोणी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी होत आहे. त्यासाठी लोणी येथील ८.८० हेक्टर व परळी येथे २० हेक्टर अशी २८.८० हेक्टर जमिनीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या जागेची पाहणी पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे. ही जमीन प्रदान करण्यासाठी आवश्यक असणारे ग्रामपंचायतीचे ना-हरकत प्रमाणपत्र व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अभिप्रायसुद्धा शासनाकडे सादर केला आहे. ही जमीन विद्यापीठाकडे वर्ग झाल्यानंतर सदरील ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी सुरू होईल.

मोजणीच्या तारखा निश्चित

अहमदनगर-बीड परळी रेल्वे मार्गाच्या कामांमध्ये प्रामुख्याने रेल्वे विभागाकडून माजलगाव, बीड व परळी उपविभागामध्ये एकूण १३ गावांमध्ये नव्या क्षेत्राचे भूसंपादनाचे प्रस्तावांतर्गत संयुक्त मोजणीचा तारखा जून महिन्याच्या शेवटच्या व जुलै महिन्याचे पहिल्या आठवड्यात निश्चित करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळी नमूद केले. त्याअनुषंगाने सदर मोजणीची कार्यवाही नेमलेल्या तारखेस पूर्ण करावी व त्यानंतर अंतिम निवाड्याची कार्यवाही जलद गतीने पूर्ण करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

Saturday, June 28, 2025

सरपंच श्रीकांत फड यांनी आंदोलनाचा इशारा देताच.परळी-गंगाखेड राष्ट्रीय महा मार्गाचे रखडलेले काम सुरू.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी - गंगाखेड रस्त्याचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दाउतपुरचे सरपंच श्रीकांत (कांताभाऊ) फड यांनी देताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि रखडलेले काम सुरू केले. मागणीला यश आल्याने सरपंच श्रीकांत (कांताभाऊ) फड यांनी दि. 30 जुन रोजीचे रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित केले असुन नागरीकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न सोडल्याबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त केले. 
परळी वैजनाथ ते गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या काही दिवसांपासून बंद होते. यामुळे नागरिक, वाहनधारक, गावकऱ्यांची गैरसोय होत होती. तसेच रूग्णांची ने-आण करण्यासाठीही वाहन चालकाला तारेवरची कसरत करावी लागत होती. मागील वर्षी पुलाचे काम अर्धवट असल्याने सरस्वती नदीला आलेल्या पुरामुळे २ ते ३ वेळा २ दिवस शहराचा संपर्क तुटला होता. याबाबत वेळोवेळी सांगुनही रस्ता आणि पुलाचे काम केले जात नसल्याने दाउतपुरचे सरपंच श्रीकांत (कांताभाऊ) फड यांनी सदरचे काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे अन्यथा दि. ३० जुन २०२५ रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, विभाग लातूर, उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, उपविभाग परळी वैजनाथ यांना दिला होता. याबाबत तहसिलदार व्यंकटेश मुंडे, संबंधित विभागाचे अधिकारी व दाउतपुरचे सरपंच श्रीकांत (कांताभाऊ) फड आणि सहकारी यांच्यात चर्चा झाली. सदरील रस्त्याचे तातडीने सुरू करण्यात आले असून पुलाचे कामही लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधितांनी दिले. ईटके कॉर्नर येथीलही कामास प्रत्यक्षात सुरू करण्यात आले आहे.
     शक्तीकुंज वसाहत गेटजवळ शाळेसाठी विद्यार्थी मोठय़ा संख्येने ये - जा करीत असतात येथे गतीरोधक नसल्याने अपघाताची शक्यता असल्याने तिथे गतिरोधक बसण्याची मागणी सरपंच श्रीकांत फड यांनी केली होती. याबाबतही तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. या भागातील जनतेच्या अतिशय जिव्हाळ्याच्या सर्वच प्रश्नावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन अर्धवट काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आणि काही कामास प्रत्यक्षात सुरुवात केली. त्यामुळे दाऊदपूरचे सरपंच श्रीकांत (कांताभाऊ) फड यांनी उद्या सोमवार दिनांक 30 जून रोजी करण्यात येणारे रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान केलेल्या मागण्यांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात केल्याबद्दल श्रीकांत फड यांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

मराठवाड्यासाठी नव्या औद्योगिक युगाची हाक. विकसित महाराष्ट्र - उद्योग संवाद' कार्यक्रमात भरत गीते यांनी उभारले विकासाचे स्पष्ट चित्र"

मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागातर्फे ‘विकसित महाराष्ट्र – महाराष्ट्र उद्योग संवाद’ या राज्यस्तरीय महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी, मुंबई येथे भव्य स्वरूपात पार पडले. राज्यातील आघाडीचे उद्योजक, धोरणकर्ते व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर या संवादात सहभागी झाले.

या संवादात मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करताना तौरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच 'अ‍ॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे श्री. भरत गीते यांनी आपले अभ्यासपूर्ण, सुसंगत आणि प्रेरणादायी विचार मांडले.

मराठवाडा हा अपार औद्योगिक संधी असलेला प्रदेश आहे. येथे पायाभूत सुविधा, वीज, पाणी, जमीन, प्रशिक्षण आणि धोरणात्मक सहकार्य मिळाल्यास, हा भाग देशातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र ठरू शकतो. यासाठी स्वतंत्र ‘मराठवाडा व्हिजन डॉक्युमेंट’ची गरज आहे. असे भरत गीते यांनी ठामपणे सांगितले.


सिताफळ प्रक्रिया उद्योगासाठी स्वतंत्र युनिट्स – शेतकऱ्यांसाठी मूल्यवर्धनाची संधी तसेच सौर, पवन आणि इथेनॉल प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीचे व्यापक क्षेत्र, नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित पर्यावरणपूरक औद्योगिक धोरणांची आवश्यकता. स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीला प्राधान्य या चर्चासत्रात फक्त अडचणी आणि त्यावरील उपाय त्यास शासनाच्या धोरणात्मक हस्तक्षेपाची आवश्यकता यावर त्यांनी विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान श्री. भरत गीते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशीही सविस्तर चर्चा करत, मराठवाड्यासाठी विशेष औद्योगिक धोरण राबवावे अशी ठाम मागणी केली.

“मी एक भुमिपुत्र आहे. माझ्या प्रत्येक प्रयत्नामागे मराठवाड्याच्या युवकांसाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करण्याचा हेतू असतो,” असे त्यांनी भावनिक शब्दांत नमूद केले.

भरत गीते यांचे भाषण ‘विकसित महाराष्ट्र’ या संवादामधील एक ठळक व प्रेरणादायी क्षण ठरले. त्यांनी मांडलेले मुद्दे मराठवाड्याच्या औद्योगिक भविष्यासाठी नव्या दिशेचा प्रारंभ ठरू शकतात.

Friday, June 27, 2025

८० हजारांची लाच घेताना पाणीपुरवठ्या चा उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहायक रंगेहाथ पकडले.


बीड (प्रतिनिधी) घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजनेच्या अंतिम बिलावर सही करून ते मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागणारा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा उपकार्यकारी अभियंता आणि वरिष्ठ सहायकाला बीडच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई २५ जून रोजी जिल्हा परिषदेच्या परिसरात केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय तक्रारदाराच्या पिंपळवंडी (ता. पाटोदा) येथील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजनेंतर्गत भूमिगत नालीचे काम पूर्ण झाले होते. या कामाचे अंतिम बिल मंजुरीसाठी पाठवायचे होते. यासाठी उपकार्यकारी अभियंता मुकुंद चंद्रसेन आंधळे (वय ३३, रा. सारडानगरी, बीड) आणि त्याचा कार्यालयातील वरिष्ठ सहायक किरणकुमार महादेवराव हिवाळे (४५, रा. शिंदेनगर, बीड) यांनी तक्रारदाराकडे ८५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती.

यापैकी ३५ हजार नवीन कामासाठी, तर ५० हजार जुन्या कामासाठी मागण्यात आले होते. ‘एसीबी’ने तक्रारीची पडताळणी केली असता, आंधळे आणि हिवाळे यांनी ८० हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम किरण हिवाळे याच्यामार्फत स्वीकारण्याचे मान्य केले. पथकाने बुधवारी सापळा रचून हिवाळे याला तक्रारदाराकडून ८० हजारांची लाच स्वीकारताच पकडले. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आई सोडून गेली, बापही झाला वैरी.१४ वर्षांच्या मुलीचा ‘वनवास.चाइल्ड हेल्प लाइनने केली मदत.


बीड (प्रतिनिधी) आई गेली आणि दारूच्या व्यसनाने वडिलांना ग्रासले. चौदा वर्षांच्या मुलीच्या नशिबी आलेला वनवास काळज चिरणारा आहे. तिला वडिलांकडून फक्त मारहाण केली जात होती. जेव्हा ‘चाइल्ड लाइन’ मदतीला धावली, तेव्हा त्याच बापाने ‘माझ्या मुलीला घेऊन जा आणि तिकडेच फेकून द्या’, असे सांगितले. पण, या भीषण परिस्थितीत, ‘चाइल्ड लाइन’ने मदत करत तिला बालगृहाचा आधार दिला.

बीड तालुक्यातील एका कुटुंबात पती-पत्नी, त्यांच्या दोन मुली आणि एक चुलता राहत होते. कोविड काळात दोन्ही मुलींना सोडून त्यांची आई घर सोडून निघून गेली. या घटनेमुळे मुलींचे वडील तणावाखाली आले आणि दारूच्या आहारी गेले. त्यांच्या दोन मुलींपैकी एक मुलगी मुंबईतील आजीकडे गेली, तर १४ वर्षीय मुलगी वडिलांसोबतच थांबली. पण दारूड्या वडिलांकडून तिला मारहाण होऊ लागली. चुलत्याला बोलता येत नसल्याने, वडील त्यालाही मारहाण करत असे. वडिलांच्या मारहाणीमुळे पीडित मुलगी नातेवाइकांकडे निघून गेली. काही दिवसांनी ती परत आल्यानंतरही तिला पुन्हा मारहाण झाली. हेच चाइल्ड लाइनला समजले आणि त्यांनी तातडीने धाव घेत हेल्प केली. जिल्हा महिला बालविकास अधिकारी एफ.एम. शेख आणि जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रकल्प समन्वयक अश्विनी जगताप, सुपरवायझर प्रसाद पवार, स्वप्नील कोकाटे, विजया जाधव आणि पोलिस कर्मचारी रंजना बरडे यांनी ही कारवाई केली.

बाप म्हणतो, मुलीला घेऊन जा अन् तिकडेच फेकून द्या.

चाइल्ड हेल्प लाइनच्या टीमने बालिकेच्या घरी धाव घेतली. मुलीच्या आजीसह इतरांचे जबाब घेतले. यावेळी बापाने ‘माझ्या मुलीला घेऊन जा आणि तिकडेच फेकून द्या’, असे बेजबाबदार वक्तव्य केले. हे ऐकून मुलगी घरात असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

चाइल्ड लाइनचा पुढाकार, बालिका बालगृहात.

चाइल्ड हेल्प लाइनच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांच्या मदतीने १४ वर्षीय पीडित मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर केले. बीड जिल्हा बालकल्याण समितीने मुलीची व्यथा समजून घेतली आणि बालगृहामध्ये दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार, या बालिकेला बीडमधील एका बालगृहात दाखल करण्यात आले असून, तिचे भवितव्य सुरक्षित करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यात आले आहे

खाजगी कोचिंग क्लास घेणाऱ्या दोन शिक्षकांनी केले.सतरा वर्षीय विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण.पोलीस आरोपीच्या शोधात.


बीड (प्रतिनिधी) शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात खाजगी कोचिंग क्लास घेणाऱ्या विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोन शिक्षकांनी केलेल्या गैर कृत्याच्या नंतर पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे पोलीस प्रशासनाने उमाकिरण संकुलाला कुलूप ठोकले असून सर्व क्लासेसला सुट्टी देत या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उमाकिरण शैक्षणिक संकुलात फिजिक शिकवणारे प्राध्यापक प्रशांत खटावकर आणि प्राध्यापक विजय पवार या दोघांनी एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीचे गेल्या एक वर्षापासून लैंगिक शोषण केले अशी फिर्याद या विद्यार्थिनीने दिल्यानंतर शिवाजीनगर पोलिसात या दोघांविरुद्ध पोस्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला.

1002076744

उमाकिरण शैक्षणिक संकुलात बीड जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी क्लास साठी येतात याच ठिकाणी असे घृणास्पद कृत्य उघडकीस आल्यामुळे पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना उघड झाल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी देखील याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

1002076745
या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या नातेवाईकांना चौकशीसाठी पोलिसांनी ठाण्यात बोलावून घेतले आहे तर दुसरीकडे उमाकिरण शैक्षणिक संकुल सील करण्यात आले असून सर्व क्लासेसला सुट्टी देण्यात आली आहे.
1002076746

या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्याचे दिसून आले.

Wednesday, June 25, 2025

ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थाचा क्रांतिकारी निर्णय. घेतला आहे. जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश घ्या. विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी, नळपट्टी माफ.


बीड (प्रतिनिधी) : 'रौळसगाव ग्राम पंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद शाळेत पूर्व प्राथमिक, प्राथमिक शिक्षण आणि अंगणवाडी विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी, नळपट्टी माफ करण्याचा ठराव करण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी घेतली प्रतिज्ञा

पालक सभेत उपस्थित गावातील महिला, पुरुष तरुणांनी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या तळमळीला साथ देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भात प्रतिज्ञा घेतली.

गावातील एकही विद्यार्थी बाहेरगावी शाळेत जाणार नाही

रौळसगाव येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत २० जूनला झालेल्या पालकसभेत ग्रामस्थांनी घटत्या पटसंख्येविषयी चिंता व्यक्त केली.

जिल्हा परिषद शाळेतील सुविधा, शैक्षणिक गुणवत्तेबाबत शिक्षण विस्तार अधिकारी प्रणिता गंगाखेडकर, केंद्रप्रमुख आंधळे, ज्ञानप्रकाश फाउंडेशनचे उजगरे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही मुख्याध्यापक महेश मोटेंनी दिली.

 गावातील इयत्ता पहिली ते सातवीतील एकही विद्यार्थी गावाबाहेरील शाळेत न जाता रौळसगावच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेईल. ज्यांनी बाहेर प्रवेश घेतले आहेत, त्या विद्यार्थ्यांना परत गावातील शाळेत आणण्याचे प्रयत्न करण्याबाबतही सूर उमटला

परभणी राष्ट्रीय महामार्गावर भेगांबरोबर काटेरी बाभळीचे प्रस्त वाढले..!सिमेंट रस्त्याबरोबर साईड पट्ट्यालाही पडल्या भेग.ा


परभणी (प्रतिनिधी) : गंगाखेड येथून परभणीकडे जाणाऱ्या बहूचर्चित गंगाखेड परभणी राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट रस्त्याला जागोजागी पडलेल्या भेगांबरोबर आता साईड पट्ट्यालाही भेगा पडल्याने व काटेरी बाभळीचे प्रस्त ही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी वाहन धारकांतून केली जात आहे. 

निर्मितीपासूनच या ना त्या नाना विविध कारणाने चर्चेत असलेल्या गंगाखेड परभणी या  राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट रस्त्यावर काम सुरु असतांनाच अनेक ठिकाणी भेगा पडल्या होत्या त्याची डागडुजी संपत नाही तोपर्यंत दुसऱ्या ठिकाणी भेगा पडत असल्याने रस्त्यावर सर्वत्र भेगाच भेगा पहावयास मिळत असल्यामुळे या महामार्ग कामाच्या गुणवत्तेवर अनेकवेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले.

गंगाखेड परभणी महामार्गावर रस्त्याला जागोजागी पडलेल्या भेगामुळे अपघात घडल्याने अनेक दुचाकी स्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहे. रस्त्यावर पडलेल्या भेगा बुजविण्याचे काम चालू असले तरी रस्त्याच्या बाजूने साईड पट्ट्यावर भरलेल्या मुरूमाच्या भरावालाही भेगा पडत आहे. या भेगांच्या संकटाबरोबर या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने मोठ्या प्रमाणात वाढलेल्या काटेरी बाभळीच्या झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्याने या फांद्याचा फटका ही दुचाकी स्वारांना बसत आहे. विशेषत रात्रीच्या वेळी याचा त्रास अधिक प्रमाणात होत असून  राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने वाढलेली काटेरी बाभळीच्या फांद्या रस्त्यावर आल्या असतांना ही याकडे महामार्गाचे अधिकारी किंवा याचे काम करणाऱ्या कंपनीचे लक्ष आहे का असा संतप्त सवाल वाहन धारकांतुन उपस्थित केल्या जात आहे.

रस्त्यावर पडलेल्या भेगा बुजविण्यासाठी सततच सुरु असलेल्या डागडुजीच्या कामामुळे रस्त्यावर पडलेल्या भेगा बुजविण्याचे नाटक न करता या भेगा कायमच्या बुजवाव्या अशी मागणी वाहन धारकांतुन केली जात आहे. सतत सुरु असलेल्या कामामुळे गंगाखेड परभणी राष्ट्रीय महामार्गाचे काम संपले की सुरू आहे हे अद्यापही वाहन धारकांना समजले नाही. वारंवार रस्त्यावर भेगा पडत असल्यामुळे या रस्त्याच्या गुणवत्तेविषयी शंका उपस्थित करून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील भेगा बुजविण्याबरोबर रस्त्यावर पसरलेल्या काटेरी बाभळीच्या फांद्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कारवाई करणार का?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात सिमेंट रोडची संकल्पना राबवली जात आहे. देशात सगळीकडे  राष्ट्रीय महामार्ग सिमेंटचे बनवले गेले मात्र या महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या कंपनीवर कोणाचेच नियंत्रण ठेवले नाही. एखाद्या लोकप्रतिनिधीने कामाच्या दर्जाबाबत आग्रही घेतली असेल तर नितीन गडकरी यांनी त्या लोकप्रतिनिधींवर लाच मागत असल्याचा ठपका ठेवल्यामुळे या कामांवर लोकप्रतिनिधीनी फारसे लक्ष दिले नाही.

याचाच फायदा घेत कंत्राटदार कंपन्यांनी  राष्ट्रीय महामार्गाची कामे अतिशय सुमार दर्जाची केल्याचे गंगाखेड परभणी रस्त्याची अवस्था पाहून समोर येत आहे. याला जबाबदार कोण जनतेच्या पैशाचा हिशोब कोणाकडे मागायचा ? अशा बोगस काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या कंपन्यांवर तसेच यावर नियंत्रण ठेवणाऱ्या राष्ट्रिय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कारवाई करणार का ? असा सवाल ही नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

मोठी बातमी! लातूरमधील नारायणा इ-टेक्नो स्कुलला ठोकलं टाळं; लाखो रुपये फी भरलेले पालक चिंतेत.


लातूर (प्रतिनिधी) नारायणा इ -टेक्नो स्कूलला शिक्षण विभागाने सिल केल्याने लातूर  जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे येथील शाळेच्या  प्रिन्सिपलने पळ काढला असून उद्यापासून शाळा बंद राहणार आहे. त्यामुळे, या शाळेत प्रवेशासाठी लाखोंची फीस देणारे पालक चिंतेत आहेत. नारायणा इ-टेक्नो स्कूलच्या देशभरामध्ये ब्रांचेस आहेत. मागील दोन वर्षांपासून लातूर शहरातील विना परवाना सुरू असलेल्या नारायणा इ टेक्नो स्कूलला आज शिक्षण  विभागाने सील केले. याबाबत कारवाई करण्यापूर्वी शिक्षण विभागाचे कर्मचारी पोलिस कर्मचारी शाळेत दाखल झाले होते. शाळेला सील करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच या शाळेच्या प्रिन्सिपलने तिथून काढता पाय घेतला. 
     
लातूर शहरात मागील दोन वर्षापासून सुरू असलेली नारायण इ-टेक्नो स्कूल ही विनापरवाना अनधिकृत असलेली शाळा चालू असल्याबाबत वेळोवेळी शिक्षण विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. पालकांनी आणि त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना आणि पक्षांनी शाळेसमोर आंदोलन देखील केली होती. परवानगी नसताना शाळा सुरू केली, यामुळे शाळा तात्काळ बंद करावी जितके दिवस शाळा चालू असेल तितका आर्थिक दंड द्यावा अशा स्वरूपाची कारवाई शिक्षण विभागाने केली होती. मात्र, दंडाची रक्कम असेल किंवा कागदपत्रांची पूर्तता नारायण इ टेक्नो स्कूल मार्फत होत नव्हती. त्यामुळे, शिक्षण विभागाने आज शाळेला सील ठोकण्याची कारवाई केल्याने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

शिक्षण विभागातील कर्मचारी पोलीस, कर्मचारी आज दिवसभराची शाळा झाल्यानंतर शाळेत दाखल झाले. सर्व विद्यार्थी शाळेतून बाहेर गेल्यानंतर शाळेवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. संपूर्ण शाळा आणि त्यातील वर्ग खोल्या यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आलं आहे. याबाबत शाळेच्या प्रिन्सिपल यांच्यासोबत चर्चा सुरू झाल्यानंतर काही वेळानंतर प्रिन्सिपल यांनी शाळेतून धूम ठोकली. तर, शाळेतील कर्मचारी या सर्व प्रकारामुळे अचिंबित झाले आहेत. 

पालक चिंतेत, काय म्हणाले शिक्षणाधिकारी

शिक्षण विभागाने या शाळेला वेळोवेळी नोटीसा दिल्या आहेत. आर्थिक दंड आकारण्यात आला असताना सुद्धा शाळा प्रशासन मनमानी करत होतं. पालकांकडून लाखो रुपयांची फीस घेण्यात आली आहे. मात्र, उद्यापासून ही शाळा बंद असणार आहे, त्यामुळे आता पालकांना लक्षात येत नाही काय करावे. काही कालावधी गेल्यानंतर या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये समायोजन करण्याबाबतची प्रक्रिया शिक्षण विभाग करेल, असे संकेतही शिक्षणाधिकाऱ्यांकडून मिळत आहेत. आम्ही वेळोवेळी शाळा प्रशासनाला नोटिसा दिल्या, माहिती दिली, तुमची परवानगी नसताना शाळा चालू ठेवणे बेकायदेशीर असल्याची सूचनाही केली. पत्र दिली मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे आज ही कारवाई करण्यात आल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी शेख यांनी दिली आहे

Tuesday, June 24, 2025

शक्तिपीठ महामार्ग वरुन बीडमध्ये घमा सान मोजणीसाठी आलेले अधिकारी पोलिसांकडून शेतकऱ्यांना अरेरावी!


बीड (प्रतिनिधी) वर्धा ते गोवा दरम्यान होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली तरी त्याला ठिकठिकाणी विरोध होत असल्याचं चित्र आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी आम्ही जमीन देणार नाही अशी भूमिका बीडमधील शेतकऱ्यांनी घेतल्याचं दिसून आलं. दरम्यान, अंबाजोगाईमध्ये मोजणीसाठी आलेले अधिकारी आणि पोलिसांनी शेतकऱ्यांना अरेरावी केल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाने केल

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात आज शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी अधिकारी आले होते. त्यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांकडून शेतकऱ्यांना अरेरावी करण्यात आल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाकडून करण्यात आला.

राज्य सरकार जर महामार्गासाठी बळजबरीने जमिनी घेतल्या जात असतील तर आम्ही हे होऊ देणार नाही. गरज नसताना शक्तिपीठ महामार्ग लादला जात आहे. या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाकडून देण्यात आला आहे.

जमीन न देण्याची बीडमधील शेतकऱ्यांची भूमिका

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला बीड मधील शेतकऱ्यांनी पुन्हा विरोध केला.अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी आलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला.

दरम्यान पोलिस बंदोबस्तात ही मोजणी करण्याचा प्रयत्न केला गेला. यालादेखील शेतकऱ्यांनी विरोध करत जमीन न देण्याची भूमिका कायम ठेवल्याचे दिसून येत आहे. याआधी एप्रिल महिन्यातदेखील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध केला होता.

शक्तिपीठसाठी भूसंपादनाला मंजुरी

वर्धा ते गोवा दरम्यान होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. मात्र काही मंत्र्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवल्यानं कॅबिनेटमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळालं. प्रामुख्यानं कोल्हापुरातील मंत्री म्हणजे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्षेप नोंदवला. 

शक्तिपीठ महामार्गाच्या निर्णयामुळे विधानसभा आणि लोकसभेत महायुतीला फटका बसल्याची आठवण या दोन्ही मंत्र्यांनी करून दिली. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर या निर्णयामुळे फटका बसू शकतो अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवल्याचं कळतंय. मात्र महायुतीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन सुरू करण्याच्या निर्णयावर सरकार ठाम आहे. दरम्यान महामार्गाला विरोध करणाऱ्या लोकांशी संवाद साधा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिली आहे.  

सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला तीव्रविरोध केला. शेतीची मोजणी करण्यासाठी दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. दरम्यान विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर दुसरीकडे धाराशिवमधील शेतकऱ्यांचाही शक्तिपीठ महमार्गाला विरोध आहे. सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप धारशिवमधील शेतकऱ्यांनी केला. 

माजलगावातील देपेगाव येथे राशनवरील धान्य तीन किलोने कमी गोडाऊनमध्येच मापात पाप असल्याचे दुकानदारांचे म्हणणे.


माजलगाव (प्रतिनिधी) : स्वस्त धान्य दुकानातील बॅगमध्ये निर्धारित पेक्षा धान्याचे वजन कमी असल्याचे तालुक्यातील देपेगाव येथे ग्रामस्थांना निदर्शनास आले आहे. दोन ते तीन किलो धान्य कमी मिळत असल्याचे वजन केल्यानंतर स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत धान्य घोटाळा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आली. याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड. नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारात दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

तालुक्यातील देपेगाव ग्रामस्थांनी राशन कमी मिळत असल्याबाबत तक्रारी करूनही पुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड. नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वात राशन दुकानावरील धान्यांच्या बॅगच्या वजनाबाबत जाब विचारला. यावेळी दुकानदार गंगाधर गिरी यांनी सांगितले की, आम्हाला गोडाऊन मधूनच अडीच ते तीन किलो धान्य कमी येते, आम्ही काही बोलायला गेलो तर आम्हाला धान्य दिले जात नाही. यामुळे माहित असूनही आम्हाला गप्प बसण्याची वेळ येते असल्याचे स्पष्टीकरण गिरी यांनी दिले.

 दोन ते तीन किलो धान्य कमी.

यावेळी इलेक्ट्रिक वजन काट्यावर राशनच्या गहू आणि तांदळाच्या बॅगचे वजन ग्रामस्थांनी केले. अनेक बॅगमध्ये दोन ते तीन किलो पेक्षा कमी माल असल्याचे निदर्शनास आले. याबाबत तहसील प्रशासनातील  अधिकारी विकास बळवंत यांच्याशी ॲड.  गोले  यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. कमी असलेले राशन पुढच्या खेपेला देऊ असे बळवंत यांनी सांगितले. यावर जर तुम्ही कमी पडलेले धान्य देत असाल तर तुम्ही काढून घेतले आहे.. तुम्ही देणार नसाल तर ते नेमके कुठे गेले आहे..? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

फौजदारी गुन्हे दाखल करावेत 

माजलगाव तहसील अंतर्गत मोठ्या प्रमाणात राशन घोटाळा सुरु असल्याचे दिसून येत आहे. तहसीलदार यांनी ही बाब हसण्यावर नेली. घोटाळा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.- ॲड. नारायण गोले पाटील ,नेते शेकाप

अहवाल देण्यास सांगितले.

माझ्याकडे काही लोकांच्या तक्रारी आल्या होत्या. पुरवठा विभागाच्या तहसीलदार प्राची ठाकूर यांना अहवाल देण्यास सांगितले आहे. - संतोष रुईकर , तहसीलदार, माजलगाव

नीट परिक्षातील यशाबद्दल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान च्या वतीने कु. सिद्धी टिंबे चा गौरव.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेत परळी वैजनाथ चे नाव देश पातळीवर गाजवत परळीच्या मानात यशाचा तुरा रोवला. परळीतील जुन्या परळी भागातील प्रसिद्ध डॉ. आनंद टिंबे व डॉ. सुवर्णा टिंबे ताई यांची मुलगी कु. सिद्धी टिंबे हिने जिद्द आणि परिश्रमातून एम.बी.बी.एस. (MBBS) प्रवेश पूर्व परीक्षा नीट (NEET) मध्ये 557 मार्क घेत राष्ट्रीय स्तरावर 9549 रँक मिळवत यश संपादन केले तिच्या या यशाबद्दल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान परळी वै. च्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Monday, June 23, 2025

शिक्षण क्षेत्रात खळबळ ! पुण्याच्या प्रसिद्ध पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजवर 10 वर्षांची बंदी ?

पुणे (प्रतिनिधी) : वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने मोठ्या गैरप्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, या कॉलेजवर कडक कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून रात्रीच्या अंधारात पुन्हा उत्तरपत्रिका लिहून घेणे ही घटना शिक्षण क्षेत्रात खळबळ माजवणारी ठरली आहे.

या प्रकरणात आरोप असा आहे की, परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी लिहिलेली उत्तरपत्रिका स्ट्रॉंगरूममधून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर त्या उत्तरपत्रिका रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांना परत देण्यात आल्या आणि त्यांना पुन्हा उत्तर लिहिण्यास सांगितले गेले. हा प्रकार पैसे कमावण्याच्या हेतूने काही प्राध्यापकांनी आणि कर्मचाऱ्यांनी केला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

विद्यापीठाची तत्काळ कारवाई

प्रकेकेकाराची माहिती मिळताच पुणे विद्यापीठाने एक सत्यशोधन समिती नेमली. या समितीचे नेतृत्व विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य देविदास वायदंडे यांनी केले. समितीत डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सुनील ठाकरे, डॉ. सुनीता आढाव आणि समीर भोसले यांचा समावेश होता. या समितीने संबंधित कॉलेजला भेट देऊन सखोल चौकशी केली आणि विद्यापीठाकडे सविस्तर अहवाल सादर केला.

कॉलेजवर मोठी कारवाई

या अहवालात कॉलेजवर मोठी कारवाई सुचवण्यात आली आहे. त्यामध्ये: कॉलेजचे परीक्षा केंद्र १० वर्षांसाठी बंद ठेवण्याची शिफारस, संस्थेला ३ लाख रुपयांचा दंड, संबंधित प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर ३ वर्षांसाठी परीक्षा कामांपासून दूर ठेवण्याची शिफारस अहवाल विद्यापीठाच्या अधिकार मंडळासमोर सादर केला जाणार आहे, आणि त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

सुधारणा कुठे आवश्यक?

फक्त परीक्षा गैरप्रकारांवर कारवाई करून शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यापीठाने संबंधित कॉलेजमध्ये पूर्णवेळ प्राचार्य आणि अधिकृत प्राध्यापकांची नेमणूक होणे आवश्यक असल्याचे मानले आहे. यामुळे अशा प्रकारचे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची खात्री करता येईल. विद्यापीठ यासंदर्भात काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हा प्रकार म्हणजे शिक्षण क्षेत्रासाठी एक गंभीर इशारा आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी अशा घटनांवर वेळेवर आणि कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. विद्यापीठाचा पुढील निर्णय हा इतर महाविद्यालयांसाठीही एक बोध देणारा ठरू शकेल

आमदाराच्या PA ने सरपंचाच्या पतीला घातला गंडा बीड मध्ये गुन्हा दाखल.


बीड (प्रतिनिधी): राष्ट्रवादीचे छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांचे स्वीय सहाय्यक नयन शेजुळ याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. बीड तालुक्यातील सरपंच पती उत्तरेश्वर खताळ यांची तब्बल 6 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप शेजुळवर आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नयन शेजुळ याने आमदार निधीतून किंवा जिल्हा परिषदेमार्फत काम मिळवून देतो, असे सांगून सरपंच पती उत्तरेश्वर खताळ यांच्याकडून 6.70 लाख रुपये घेतले. मात्र, पैसे मिळाल्यानंतरही शेजुळ याने कोणतेही काम न देता सतत टाळाटाळ केली. फसवणुकीदरम्यान शेजुळ याने बनावट ई-मेल तयार करून त्याद्वारे खताळ यांना विश्वासात घेतले. या ई-मेलमध्ये काम मंजूर झाल्याचे खोटे दाखवून त्यांनी रकमेची मागणी केली होती. विश्वास ठेवून खताळ यांनी पैसे दिले, मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम मंजूर झाले नव्हते, हे पुढे उघडकीस आले.

पोलिसांत गुन्हा दाखल

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उत्तरेश्वर खताळ यांनी बीड शहर पोलीस ठाणे गाठले आणि शेजुळविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली असून, अधिक तपास सुरू आहे. या प्रकारामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदाराच्या स्वीय सहाय्यकावरच फसवणुकीचा आरोप झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, आमदार विक्रम काळे यांची या प्रकरणावर भूमिका काय असेल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

वैद्यनाथ विद्यालय परळीच्या 25 वर्षां पूर्वीच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा उत्साहात संपन्न.


स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा, माजी शिक्षकांचा भावनिक सन्मान. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- श्री वैद्यनाथ विद्यालय, परळी येथील सन 2000 सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी 25 वर्षांनंतर एकत्र येत स्नेहमेळावा आयोजित केला. आज रविवार, दिनांक 22 जून 2025 रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या या खास कार्यक्रमात जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. एकेकाळी एकत्र शाळेच्या बाकावर बसणारे वर्गमित्र, आज विविध क्षेत्रात स्थिरावलेले असून, अनेकांनी व्यवसाय, पत्रकारिता, शासकीय सेवा, शिक्षण, वैद्यकीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते माजी शिक्षकांचा सन्मान समारंभ. विद्यार्थ्यांनी आपल्या आदरणीय शिक्षकांना शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला. शिक्षकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा समोर पाहून, आज पुन्हा वर्ग भरल्यासारखे वाटले, असे भावनिक उद्गार काढले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर सामूहिक प्रार्थना व स्वागतगीत सादर करण्यात आले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपापली ओळख, सध्याची व्यावसायिक स्थिती व शालेय काळातील आठवणी शेअर करताना वातावरण अगदी भावनिक झाले. वर्गातील काही विद्यार्थ्यांनी शाळेतील विनोदी प्रसंग, गमतीदार आठवणी रंगवून सांगितल्या, ज्यामुळे उपस्थितांमध्ये हास्याचे क्षण रंगले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही विदेशात कार्यरत असून, त्यांनी ऑनलाइन स्वरूपात सहभागी होत आपले मनोगत व्यक्त केले. हे पाहून स्नेहमेळाव्याचे आयोजन अधिक संस्मरणीय ठरले.
या मेळाव्यासाठी विशेष आकर्षण म्हणून शाळेचा वर्गजमवून ‘क्लासरूम सीन’ तयार करण्यात आला होता. काही माजी शिक्षकांनी त्या वर्गात पुन्हा एकदा थोडक्यात शिकवणी सत्र घेतले, जे क्षण अक्षरशः सर्वांच्या आठवणीत कायमचे कोरले गेले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेत एकमेकांशी पुन्हा संवाद साधला. या स्नेहमेळाव्यामुळे आपल्या सर्वांच्या नात्यांना नव्याने बहर मिळाला, असे अनेकांनी व्यक्त केले. भविष्यात अशाच प्रकारचे उपक्रम दर 5 वर्षांनी आयोजित करण्यात यावेत, असा निर्धार या सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात आला.
या यशस्वी आयोजनामागे आयोजन समितीतील श्री.श्रीकांत रंगनाथ खके, सौ.रुपाली सूर्यकांत कापसे (वाकडे ) श्री.सचिन  बापुराव डाके यांचा मोलाचा सहभाग होता. सर्व उपस्थितांनी एकमुखाने या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले.
दरम्यान, या स्नेहमेळाव्यात 2000-2001 बॅचच्या मयत झालेले गुरूवर्य शिक्षक व सहकारी मित्र यांना उपस्थित शिक्षकवृंद व माजी विद्यार्थ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

राजपूत रजक समाजासाठी सभागृहाच्या बांधकामाचे आ.हेमंत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन .

नांदेड (प्रतिनिधी) रविवार, दिनांक २२ जून रोजी राजपूत रजक समाजासाठी स्वतंत्र सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन गाडीपुरा नांदेड येथे नांदेड दक्षिणचे मा. आमदार हेमंत पाटील यांच्या शुभहस्ते विधीवत पार पडले. 
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून  आमदार आनंदराव बोढारकर, मनपा विरोधी पक्षनेते श्री. दीपक रावत, परळीचे माजी नगराध्यक्ष  तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर उपस्थित होते.
कार्यक्रमास राजपूत समाजाचे सतीश परदेशी, राजू परदेशी, सुरज परदेशी यांच्यासह  संजय सोमाणे, सामाजिक कार्यकर्ते कारभारी शिंदे, शिवसेना उपशहरप्रमुख किसन बुंदेले यांची विशेष उपस्थिती होती.
या सभागृहाच्या उभारणीमुळे राजपूत रजक समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना मोठा आधार मिळणार असून समाजबांधवांनी एकत्र येऊन सदर उपक्रमाचे स्वागत केले.कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले असून समाजबांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Saturday, June 21, 2025

परळी येथील जिजामाता उद्यान येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहात साजरा.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  परळी वैजनाथ येथे आज दिनांक 21जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. 
21जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन संपुर्ण जगात साजरा करण्यात येतो. या दिवसाची संकल्पना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींजी नी मांडली आणी ती प्रत्यक्षात उतरवली.त्याच निमित्ताने हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता ना. 
परळी येथील  जिजामाता उद्यान येथे पंतजली योग समिती जिजामाता गार्डन क्लब तसेच वैद्यनाथ बँक व इनर व्हिल क्लब  यांच्या सर्वच्या सहकार्य व संयुक्त विद्यमाने अंतर राष्ट्रीय योग्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी योगासने चे प्रात्यक्षिक सौ सरला भाभी उपाध्याय यांनी करून दाखवत उपस्थितांना योगाचे व विविध योग आसनांचे धडे दिले.
यावेळी झालेल्या या कार्यक्रमात पतंजली योग समिती व जिजामाता गार्डन क्लब व वंदना प्रतिष्ठान यांच्या वतीने सोमेद्र शास्री भाजप शहर अध्यक्ष सौ उमा समशेट्टी यांच्या सह मान्यवरचा सत्कार करण्यात आला. तर  ना. पंकजाताई मुंडे यांच्या वतीने. योग शिक्षिका सरला उपाध्याय. छाया बुरांडे. शालिनी बोधे यांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच राजु पारसेवार काकांनी सर यांचाही सन्मान करण्यात आला. 

वेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री त्रिंबक कांबळे साहेब तसेच उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे सर यांच्या विशेष उपस्थिती तसेच सर्व संस्थेचे पदधिकारी. नागरीक योगा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Thursday, June 19, 2025

बीड जिल्हा परिषदेचे नूतन सिइओ जितीन रहमान यांनी पदभार स्वीकारला.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी स्वागत केले.


बीड (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेचे नूतन सिइओ जितीन रहमान यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी त्यांचे स्वागत केले.

बीड जिल्हा परिषदेचे सिइओ आदित्य जिवने यांची मागील आठवड्यात बदली झाली. त्यांच्या जागी नियुक्ती झालेले एम मुरुंगनाथम यांनी येण्यासाठी नकार दिला

त्यानंतर वर्धा जिल्हा परिषदेचे सिइओ जितीन रहमान यांची नियुक्ती करण्यात आली. रहमान यांनी गुरुवारी 19 जुन रोजी पदभार स्वीकारला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांनी त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.

थकीत बिल काढण्यासाठी १० हजारांची लाच घेताना ग्रामसेवक रंगेहाथ अटकेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.


छत्रपती संभाजीनगर  (प्रतिनिधी) वैजापूर तालुक्यातील भायगाव ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक विजयकुमार क्षीरसागरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई आज, बुधवारी दुपारी जरूळ फाटा येथे सापळा रचून करण्यात आली.

तक्रारदार हे भायगावचे उपसरपंच असून त्यांच्या गावी स्मशानभूमीचे काम जनसुविधा योजनेअंतर्गत पूर्ण झाले आहे. या कामासाठी मंजूर झालेल्या ६ लाख ९६ हजार रुपयांच्या बिलांपैकी उर्वरित ९४ हजार रुपये अदा करण्यासाठी आवश्यक एनओसी त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये सादर केली होती. मात्र, ग्रामसेवक विजयकुमार क्षीरसागर याने या उर्वरित रकमेसाठी चेकवर सही करण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदार यांनी लाच देण्यास नकार देत थेट छत्रपती संभाजीनगरलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार १७ जून रोजी प्राथमिक पडताळणी करण्यात आली. त्यानंतर १८ जून रोजी पंचासह झालेल्या चर्चेत आरोपीने तडजोडीत १० हजार रुपयांची लाच मागीतल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज तक्रारदारांनी ग्रामसेवक क्षीरसागरने सांगितल्यानुसार जरूळ फाट्यावरील चैतन्य टी हाऊस येथे भेट दिली. क्षीरसागरने तक्रारदाराकडून दहा हजार रुपये पंचसाक्षीदारांसमक्ष स्वीकारले. त्याच वेळी एसीबीच्या पथकाने कारवाई करत आरोपीला लाचेसह अटक केली.

कारवाईदरम्यान आरोपीकडून एक मोबाईल, पाकीट, ओळखपत्रे, ७०० रु रोख रक्कम व दुचाकी चावी जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव, पो. उप अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संगीता पाटील यांच्या नेतृत्वात पोह. राजेंद्र सिनकर, पोअं. विलास चव्हाण आणि सी.एन. बागुल यांच्या पथकाने केली.

महाराष्ट्रातील ३० मेडिकल कॉलेजमधील 'एमबीबीएस' जागा संकटात !एन.एम सी कडून गंभीर त्रुटींची नोंद.


नागपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील एकूण ३० शासकीय वैद्यकीयमहाविद्यालये आणि त्यांच्या एमबीबीएसच्या जागांवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून (एनएमसी) संकटाची टांगती तलवार आहे. या महाविद्यालयांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण त्रुटी आढळल्याने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी एमबीबीएसच्या जागांच्या वार्षिक नूतनीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'एनएमसी'ने या गंभीर बाबीची दखल घेत, बुधवारी (दि. १८) यावर सुनावणी ठेवली आहे.

एनएमसी'च्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाने राज्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे मूल्यांकन केले होते. हे मूल्यांकन महाविद्यालयांनी सादर केलेली स्व-प्रमाणित घोषणा पत्र, आधार-सक्षम बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीतील प्राध्यापकांची उपस्थिती, क्लिनिकल मापदंड आणि पायाभूत सुविधा यावर आधारित होते. मात्र, अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विविध मापदंडांवर गंभीर त्रुटी आढळल्या. महत्त्वाचे म्हणजे, निदर्शनास आणलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी संस्थांकडून कोणतेही प्रयत्न झाले नसल्याचे निरीक्षणही 'एनएमसी'ने नोंदवले आहे, तसे पत्र १३ जून रोजी सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे. 

या महाविद्यालयांमधील एमबीबीएसच्या जागा धोक्यात.

विदर्भातील आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसोबतच डॉ. वैशंपायन मेमोरियल मेडिकल कॉलेज, सोलापूरसह बारामती, अंबरनाथ, रत्नागिरी, उस्मानाबाद, सातारा, मुंबई, बुलढाणा, जालना, वाशिम, अलिबाग, हिंगोली, जळगाव, मिरज, नंदुरबार, परभणी, सिंधुदुर्ग, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे, आई फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड व लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई येथील एमबीबीएसच्या जागा धोक्यात आल्या आहेत.

'शो कॉज' नोटीसकडेही दुर्लक्षित

  • प्रत्येक महाविद्यालयाचे सखोल मूल्यांकन केल्यानंतर, 'एनएमसी'ला आढळलेल्या त्रुटींबाबत 'शो कॉज नोटीस' जारी करण्यात आल्या होत्या.
  • या नोटीसला संबंधित संस्थांनी सादर केलेले अनुपालन अहवाल तपासकांनी तपासले. मात्र, तपासकांना ते समाधानकारक आणि पटण्यासारखे आढळले नसल्याचे पत्रात नमूद आहे.

आज होणार सुनावणी.

नियामक मानकांचे उल्लंघन झाल्याने 'एनएमसी'ने बुधवारी (दि. १८) वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि संचालकांना सुनावणीसाठी दिल्लीतील मुख्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

विदर्भातील तब्बल आठ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्रुटी.

राज्यातील ज्या ३० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 'एनएमसी'ला त्रुटी आढळून आल्या त्यात विदर्भातील तब्बल आठ महाविद्यालये आहेत. यात नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह (मेयो), अकोला, भंडारा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचा समावेश आहे.

ऊसतोड कामगार महिलांची गर्भपिशवी काढण्याचे वाढते प्रकार, 'आरोग्य मित्र' संकल्पना राबवणार! - महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर


बीड (प्रतिनिधी) : महिलांवरील अन्याय, अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी, तसेच त्यांना तक्रारी दाखल करण्यासाठी योग्य मंच देण्याकरिता महिला आयोग कायम आपल्यासोबत आहे. ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 'आरोग्य मित्र' उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मंगळवारी दिला. 

ऊसतोड महिलांची गर्भपिशवी काढण्याच्या प्रकाराबाबत चाकणकर यांनी नाराजी व्यक्त केली. महिलांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही रूपाली चाकणकर यांनी सांगितले. ऊसतोड कामगार महिलांची गर्भपिशवी काढणे, आरोग्य समस्या,बालविवाह याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. यावेळी आयोगाच्या उपसचिव डॉ. पद्मश्री वैनाडे, विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, बीड जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. विभागीय महिला व बालविकास उपायुक्त रेश्मा चिमंद्रे यांनी विभागातील महिलांविषयक उपक्रमाबाबत माहिती दिली. सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांची महत्त्वाची भूमिका असून, नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बालविवाह आदी 'कु'प्रथा रोखण्यासाठी संकल्प करावा, असे आवाहन केले. 

बीड जिल्ह्यात २०१९ पूर्वी ५७६ आणि नंतर २६७ ऊसतोड महिलांच्या गर्भपिशवी शस्त्रक्रिया केल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर १६ जून रोजी जिल्ह्यातील बालविवाहाचा मुद्दाही चव्हाट्यावर आणला होता. या दोन्ही संवेदनशील वृत्तांची दखल घेत महिला आयोगाने दखल घेत तातडीचे बैठक घेतली. त्यात बालविवाह, गर्भलिंग निदान चाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा, एकल महिला यांच्या समस्या आदींबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगत बालविवाह रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला.

जॉन्सन यांची संकल्पना.

बीडसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत ऊसतोड महिला कामगार स्थलांतर करतात. त्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या समोर आल्या आहेत. यासाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या संकल्पनेतून यावर्षी 'आरोग्य मित्र' उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांसाठी त्याच समूहातील एकाची आरोग्य मित्र म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. आरोग्य मित्र आरोग्याच्या समस्यांबाबत आशासेविका, अंगणवाडी सेविकांच्या संपर्कात असेल.

कष्टाचे नऊ लाख रुपये गेवराईतील छत्रपती मल्टिस्टेटमध्ये ठेवले दिवसभर बसूनही ठेवी दिल्या नाहीत.शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!


बीड (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील शेतकऱ्याने कष्टाचे नऊ लाख रुपये गेवराईतील छत्रपती मल्टिस्टेटमध्ये ठेवले होते. त्या ठेवी परत मिळाव्यात, यासाठी अनेकदा खेटे मारले. मंगळवारी दोघे नवरा-बायको दिवसभर कार्यालयाबाहेर बसले. पण, एक रुपयाही मिळाला नाही. रात्री पत्नी मल्टिस्टेटमध्येच झोपली, तर पतीने बुधवारी पहाटे मल्टिस्टेटच्या समोरच गळफास घेत आत्महत्या केली.

सुरेश आत्माराम जाधव (वय ४६, रा. खळेगाव, ता. गेवराई) या शेतकऱ्याने २०२० साली छत्रपती मल्टिस्टेटमध्ये ११ लाख ५० हजार रुपये ठेवले होते. मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम काढण्यासाठी सुरेश जाधव हे गेल्या दोन वर्षापासून मल्टिस्टेटमध्ये चकरा मारत होते. मात्र, त्यांना पैसे दिले नाहीत. वारंवार पैसे मागूनही मिळत नसल्याने सुरेश जाधव यांनी बुधवारी पहाटे टोकाचे पाऊल उचलल्याची फिर्याद पत्नी कविता यांनी पोलिसांत दिली.

दोन मुलांसह नवरा-बायको दिवसभर ताटकळले.

पैशांसाठी सुरेश जाधव, पत्नी कविता, मुलगी साक्षी व मुलगा शुभम हे दिवसभर मल्टिस्टेटमध्येच बसून होते. रात्री कविता या तेथेच झोपल्या. तर सुरेश जाधव हे मुलांसोबत घरी गेले. सुरेश जाधव हे पहाटे ३ वाजेच्या सुमारास परत आले आणि त्यांनी मल्टिस्टेटसमोरील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस आल्यावर त्यांनी शटर वाजवून कविता यांना उठविले. पतीला लटकलेले पाहून त्यांनी हंबरडा फोडला.

६ महिन्यांपूर्वीही एकदा प्रयत्न.

साधारण सहा महिन्यांपूर्वीही पैशांसाठी सुरेश जाधव यांनी विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी चेअरमन संतोष भंडारी यांनी त्यांना २ लाख ५० हजार रुपये दिले. उर्वरित २ लाख रुपये दोन महिन्यांत देतो म्हणाले होते.

संतोष भंडारीविरोधात गुन्हा दाखल.

छत्रपती मल्टिस्टेटचा चेअरमन संतोष ऊर्फ नाना बसंता भंडारी याच्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने आत्महत्या केल्याची फिर्याद कविता जाधव यांनी गेवराई पोलिस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक लंके हे करत आहेत.

Wednesday, June 18, 2025

सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा महात्मा फुले विचार रत्न पुस्काराने सन्मान.

नागपूर (प्रतिनिधी) नागपूर संत कबीर जयंती निमीत्ताने श्रीगुरुदेव सेवामंडळ, नागपूर च्या वतिने दि.12 जून 25 रोजी रात्री 8 वाजता  राष्ट्र संत तुकडोजी महाराज सभागृहात महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य करणाऱ्या पुणे येथील सत्यशोधक रघुनाथ दादा ढोक यांचा  सन्मानचिन्ह ,राष्ट्र. संत तुकडोजी महाराज ग्रंथ व  पुष्पगुच्छ  आचार्य  हरीभाऊ वेरुळकर यांचे शुभहस्ते देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. महात्मा फुलेंच्या वेषात रघुनाथ ढोक सत्यशोधक पद्धतीने लग्न व  वास्तुसोहळे पार पाडीत इतर ही सामाजिक क्षेत्रात गेली 34 वर्ष काम करीत आहेत.त्यांनी गेल्या 5 वर्षात महात्मा फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीने  महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात एकूण 53 जातीय, आंतरजातीय ,  विधवा, विधुर,  घटस्पोटीत, विकलांग विना मोबदला  विवाह लावले आहेत. त्यातील 7 विवाह स्वतःचे घरात लावले आहेत.तसेच मोफत 14 वास्तू सोहळे देखील पार पाडले आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आचार्य हरिभाऊ वेरुळकर, होते. ते म्हणाले की रघुनाथ ढोक यांचा सत्कार म्हणजे मानवतावादी विचारांचा सत्कार असे मत मांडले. सत्कारमुर्ती रघुनाथ ढोक यांनी माझा सत्कार नसुन फुलेंच्या विचारांचा गौरव आहे. सत्कारामुळे फुलेंच्या विचाराप्रती माझी जबाबदारी वाढली असे मत व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक यावले यांनी संत कबीरांचा फुंलेच्या विचारांमुळे सामाजिक बंध आणखी घट्ट होतात असा विचार दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुरेंद्र बुराडे यांनी तर सूत्रसंचालन राजेश कुंभलकर यांनी केले. कार्यक्रमाला ज्ञानेश्वर रक्षक , सावित्रीबाई  फुलेंचे वारस डाँ.दिलीप नेवासे,सातारा, माजी न्यायाधीश शिवदास महाजन, पुणे,जेष्ठ साहित्यिक कवी मधू बावलकर,तेलंगणाचे ,माजी नगराध्यक्ष मायाताई चवरे , उपस्थित होत्या. दिलीप सुरमाजीकार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव विठ्ठलराव पुनसे,संगीता जावळे, प्रभा ठवकर प्रा.रामदास टेकाडे,रुपराव वाघ, मुरलीधर नरड,सियाराम चावके,आंनद माथने बहुसंख्य पुरोगामी विचारवंत उपस्थित होते.

परळी वैजनाथ येथे २५ जून रोजी संत नामदेव महाराज पालखी रिंगण सोहळा. अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाचा उपक्रम.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी): संतशिरोमणी श्री नामदेव महाराज पालखी सोहळा, नरसी नामदेव ते पंढरपूर असा पायी मार्गक्रमण करत असून, २५ जून २०२५ रोजी पालखी परळी वैजनाथ येथे मुक्कामी येणार आहे. या पावन सोहळ्यानिमित्त, परळी नगरीत रिंगण सोहळ्याचे दिव्य आयोजन करण्यात आले आहे.
या रिंगण सोहळ्याचे आयोजन बुधवार, दि. २५ जून रोजी सायंकाळी ४ वाजता, नाथ रोडवरील जत्रा मैदानावर करण्यात आले असून, अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.
परळीतील भाविक भक्त, महिला भजनी मंडळे आणि पंचक्रोशीतील वारकरी बांधव मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. टाळ, मृदंग, अभंगगायन आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे.
या वर्षी रिंगण सोहळ्याचे सलग चौथे वर्ष असून, परळीतील भाविक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
नामदेव महाराजांच्या पादुकांची वारी, वारकऱ्यांचे सामूहिक गजर, भक्तिभावात न्हालेलं वातावरण आणि संतांच्या सेवेसाठी समर्पित परंपरा — हे सर्व परळीतील रिंगण सोहळ्यात अनुभवता येणार आहे.
परळीकरांसाठी ही एक आध्यात्मिक पर्वणीच ठरणार असून, भक्तिभावाने सजलेल्या या सोहळ्यात सहभागी होऊन संत नामदेव महाराजांच्या कृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांच्यासह  तालुका अध्यक्ष विश्वंभर महाराज उखळीकर शहराध्यक्ष अशोक महाराज कराळे तालुका संपर्प्रमुख मंगेश महाराज मुंडे, बीड जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा राधिकाताई जायभाये, जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख चेतनाताई गौरशेटे, तालुकाध्यक्ष शोभाताई भास्करराव चाटे, शहराचे अध्यक्ष सुरेखाताई विजयकुमार मेनकुदळे, स्वातीताई ताटे अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाच्या सर्व पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत प्रत्येक शाखेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान तालुकाध्यक्ष शोभाताई भास्करराव चाटे यांनी केले आहे.
सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

केज येथे सराफ दुकानात चोरी चार महिला ताब्यात.पोलिसांनी मुद्देमाल केला हस्तगत चौघींना एक दिवसाची पोलिस कोठडी.


केज (प्रतिनिधी) सराफ दुकानात चेन खरेदी करण्याच्या बहाण्याने गिऱ्हाईक बनून आलेल्या चार महिलांनी दुकानातील ५८ हजार किमतीची चांदी चोरून नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने चारही महिलांना ताब्यात घेतले. तसेच त्यांनी चोरलेला मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

दि. ११ जून रोजी दुपारी १:०० वाजताच्या सुमारास केज येथील कानडी रोडवरील कुंदन बालासाहेब जोगदंड यांच्या श्री ज्वेलर्स नावाच्या दुकानात अनोळखी चार महिला आल्या. त्यांनी पायातील चांदीची चेन खरेदी करण्याच्या बहाण्याने कुंदन जोगदंड यांची नजर चुकवून ७ जोड लांबविले. त्या महिला दुकानातून निघून गेल्या नंतर चोरीचा प्रकार कुंदन जोगदंड यांच्या लक्षात आला. दरम्यान, कुंदन जोगदंड यांनी दिलेल्या तक्रारीवर त्या चार अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुपके आणि त्यांच्या पथकाने या चोरी प्रकरणी बीड तालुक्यातील मुर्शदपूर येथून सुमन पोपट येळवे, (वय,५२ वर्षे), कलावती मोतीराम केंगारे, (वय,५६ वर्ष), बबीता भाऊराव केंगारे, (वय,६१ वर्षे), द्वारकाबाई सतिष बोराडे (वय,४० वर्ष) या चौघींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्यांनी चोरलेला मुद्देमाल ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. १८ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे हे करीत आहेत.

सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात, यासाठी आता टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना एसटीसोबत संयुक्तपणे सहली आयोजित करता येणार.


सोलापूर (प्रतिनिधी) सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात, यासाठी आता खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना एसटीसोबत संयुक्तपणे सहली आयोजित करता येणार आहेत. जेणेकरून सामान्यांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या या योजनेत राज्यातील सर्व टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या सहभागी होतील, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या मुख्यालयात नुकतीच बैठक पार पडली. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील गोर-गरीब जनतेला धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता यावा, हा या योजनेचा मुख्य हेतू असणार आहे. परिवहन महामंडळाच्या मदतीने खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी कमी गर्दीच्या दिवसात सहलीचे आयोजन करावे. यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक पर्यटकांना स्वच्छतागृह व निवास व्यवस्था (जिथे उपलब्ध असेल तिथे) निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

श्रावण महिन्यापासून योजनेची सुरवात

कमी गर्दीच्या हंगामामध्ये विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी एसटीला प्रवासी भारमान कमी असते. त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. अशावेळी एसटीने खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी धार्मिक पर्यटनस्थळी सहली आयोजित केल्यास त्यातून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढेल, तसेच सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरात पर्यटनाचा आनंद लुटता येईल, असा या योजनेचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने खाजगी टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कमी गर्दीच्या दिवशी पर्यटकांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन, तुळजापूर- पंढरपूर- अक्कलकोट दर्शन, ज्योतिर्लिंग दर्शन, त्रंबकेश्वर- नाशिक दर्शन अशा धार्मिक सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात येत्या श्रावण महिन्यापासून करण्यात येणार आहे.

Tuesday, June 17, 2025

गंगाखेड शहरातील वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी सवंगडी कट्टा सज्ज! सेवेचे 10 वे वर्ष!


गंगाखेड (प्रतिनिधी) : परभणीतील गंगाखेड तालुक्यातील प्रतिवर्षी प्रमाणे शहरातील संत जनाबाई मंदिर व परिसरात पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी विदर्भ व उत्तर मराठवाड्यातून निघालेल्या पायी दिंड्या रात्रीच्या मुक्कामी थांबतात. थकल्या भागलेल्या वारकऱ्यांसाठी गंगाखेड शहरातील सवंगडी कट्टा समूह वारकरी आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन करणार आहे. सेवेचे हे त्यांचे 10 वे वर्ष असून सर्व महिला व पुरुष सवंगडी वारकऱ्यांची सेवा करण्यास सज्ज झाले आहेत.

वारकरी बांधवांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार!

आषाढी एकादशी निमित्य विदर्भातून पायी पंढरपूरकडे जाणाऱ्या बहुतांश दिंड्या संत जनाबाईचे जन्मस्थान असलेल्या गंगाखेड येथे मुक्कामी थांबतात. येथील त्यांचा विसावा आनंदात जावा व पुढील प्रवासासाठी नवचैतन्य मिळावे. यासाठी शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत पुरुष व महिलांनी एकत्र येत स्थापन केलेल्या सवंगडी कट्टा समुहाच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे वारकरी सेवा आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. यात शहरातील तज्ञ डॉक्टरांसह सेवांकुर संस्थेच्या डॉक्टरांच्या टीमकडून पायी दिंडीत सहभागी वारकरी बांधवांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करत त्यांच्या हाता-पायाची इलेक्ट्रिकल मशीन तसेच हाताने मसाज केली जाते. मसाज करण्यासाठी महिला व पुरुष अशा दोन वेगवेगळ्या टिमसह सवंगडी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सज्ज झाले आहे. या आरोग्य सेवा शिबिराची सुरुवात बुधवार 18 जून रोजी होत असून, सांगता 24 जुन रोजी होणार आहे. आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचे उदघाटन प. पू. यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुशील राठी, डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. केदार खटिंग, डॉ. हेमंत मुंढे, डॉ. किशन गारोळे, डॉ. बागेश्री भरड, घनश्याम मालपाणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. गंगाखेड येथे मुक्कामी येणाऱ्या हजारो वारकऱ्यांना या आरोग्य सेवा शिबिराचा लाभ होणार असून संत जनाबाईच्या पावन भूमीतील वारकऱ्यांचा मुक्काम अविस्मरणीय होणार आहे. प्रतिवर्षी प्रमाणे कट्टयातील सदस्यांनी वर्गणी करून वारकऱ्यांसाठी भरपूर औषधीसाठा उपलब्ध केला असुन, दिंडीत सहभागी सर्व वारकऱ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक प्रकाश घन, रमेश औसेकर, मनोज नाव्हेकर आदींनी केले आहे.

कट्टा समूहातील शिबीर यशस्वीतेसाठी सवंगडी!

शिबीर यशस्वीतेसाठी सवंगडी कट्टा समूहातील डॉ. किशोर कुगणे, डॉ. योगेश मल्लूरवार, डॉ. देविदास चव्हाण, डॉ. संजय भरड, डॅा. अनिल बर्वे, डॉ. सौ. शोभा काबरा, डॉ. सौ. बागेश्री भरड, अतुल तुपकर, संतोष तापडीया, नागेश पैठणकर, गजानन महाजन, ॲड. पंकज भंडारी, अक्षय जैन, नंदकुमार सोमाणी, सचिन नाव्हेकर, कारभारी निरस, संदीप कोटलवार, नागेश कोनार्डे, गोविंद रोडे, गजानन भारती, ऋषी काबरा, पुरुषोत्तम भंडारी, जगदिश तोतला, गोपाळ मंत्री, मकरंद चिनके आदी परिश्रम घेत आहेत.