Sunday, March 31, 2024

बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस. वीज पडून मुलाचा मृत्यू, तर आष्टी तालुक्यात बैलजोडी ठार.

बीड (प्रतिनिधी) : हवामान खात्याकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून बीड जिल्ह्यातील काही भागात आज सकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या दरम्यान वीज पडल्याने गेवराई तालुक्यात एका मुलाचा तर आष्टी तालुक्यात बैलजोडी ठार झाली आहे.
राज्यात येत्या काही दिवसात जोरदार अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बीड जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. या दरम्यान जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरु असताना विजांचा कडकडाट  देखील झाला. यात गेवराई तालुक्यात वीज पडून एका मुलाचा तर आष्टी तालुक्यातील गौखेल येथे बैल जोडीचा मृत्यू झाला आहे.

आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज 

अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे आंब्यालाही फटका बसला असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

Saturday, March 30, 2024

ख्रिश्चन समुदायामध्ये खास मानला जातो.गुड फ्रायडे ‘ म्हणजे काय ? या दिवशी नेमकं काय झालं होतं ? वाचा.

(कांतीकारी साथी) - गुड फ्रायडेच्या दिवशी येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले अशी मान्यता आहे. त्यांनी मानवतेसाठी केलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ जगभरातील ख्रिश्चन नागरिक गुड फ्रायडे हा दिवस साजरा करतात. हा दिवस ब्लॅक फ्रायडे म्हणूनही ओळखला जातो. इस्टर संडेच्या आधी गुड फ्रायडे साजरा केला जातो आणि ख्रिश्चन समुदायामध्ये हा दिवस सर्वात खास मानला जातो. ख्रिश्चन नागरिकांच्या श्रद्धेनुसार, या दिवशी येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगातून वाईटाचा नायनाट करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.

ख्रिश्चन नागरिक या दिवशी उपवास करतात. तसेच या दिवशी लोक येशू ख्रिस्ताचे स्मरण करण्यासाठी चर्चमध्ये जातात आणि प्रार्थना करतात. गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभु येशूवर (Yeshu) जे आत्याचार झालेत ते पाहता हा दिवस आनंदाचा दिवस मानला जाऊ शकत नाही. मग या दिवसाला गुड फ्रायडे का म्हटलं जातं ? चला जाणून घेऊया.

गुड फ्रायडेला होली डे, ग्रेट फ्रायडे आणि ब्लॅक डे असेही म्हणतात. यावेळी गुड फ्रायडे 29 मार्च, शुक्रवार म्हणजेच आज आहे. तर 31 मार्च रोजी ईस्टर संडे आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार, दरर्षी गुड फ्रायडे वेगवेगळ्या तारखेला येतो. 

गुड फ्रायडेचा इतिहास

लोकांमध्ये येशू ख्रिस्ताची वाढत्या लोकप्रियतेमुळे तिथल्या दांभिक धर्मगुरूंना चीड आली. त्यांनी येशूबद्दल रोमन शासक पिलातकडे तक्रार केली. त्याने पिलातला सांगितले की देवाचा पुत्र असल्याचा दावा करणारा हा तरुण केवळ पापीच नाही तर देवाच्या राज्याविषयीही बोलतो. ही तक्रार आल्यानंतर येशूवर देशद्रोह आणि धर्माचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर येशूला सुळावर चढवून मृत्यूदंड देण्याचा आदेश जारी करण्यात आला. जेव्हा येशू यांना क्रॉसवर लटकवून त्यांचा जीव घेण्याचा आदेश दिला तेव्हाही येशू यांनी त्या लोकांच्या अज्ञानतेसाठी देवाकडे प्रार्थना केली की, यांना माफ करा, कारण, यांना नाही माहित की हे काय करत आहेत, असे त्यांनी म्हटले. दिवशी त्यांना क्रॉसवर लटकवण्यात आले होते, त्या दिवशी फ्रायडे म्हणजेच शुक्रवारचा दिवस होता. म्हणून या दिवसाला गुड फ्रायडे असे म्हटले जाते.

कसा साजरा करतात गुड फ्रायडे ?

गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चमध्ये जाऊन विशेष प्रार्थना केली जाते. ख्रिश्चन नागरिक प्रार्थनेत सहभागी होतात. या दिवशी येशू ख्रिस्ताच्या शेवटच्या क्षणांचे आणि बलिदानाचे स्मरण केले जाते. येशू ख्रिस्ताची शिकवण वाचली जाते. त्यांनी सांगितलेले संदेश आणि शिकवण स्वतःच्या आयुष्यात आचरणात आणण्याचा प्रयत्न केला जातो.


पंकजा मुंडेंची गाडी आडविल्या प्रकरणी ५० मराठा आंदोलंकांवर गुन्हा दाखल.

केज (प्रतिनिधी) केज तालुक्यातील औरंगपुर येथे असलेल्या पावनधाम येथे तुकाराम बीज निमित्त दर्शनासाठी आलेल्या भाजपाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मराठा आरक्षण समर्थक आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करून त्यांचा ताफा अडविल्या प्रकरणी सुमारे ५० ते ५५ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
दि. २७ मार्च रोजी दुपारी १:३० वा. च्या सुमारास भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे या केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबाजोगाई-कळंब रोडवर असलेल्या औरंगपूर येथील पावनधाम येथे तुकारामबिज निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यांनी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतल्या नंतर त्या शेजारच्या सभा मंडपात मठाधिपती ह.भ.प. महादेव महाराज बोराडे यांचे सूरु असलेले कीर्तन ऐकण्यासाठी जात असताना मराठा आरक्षण समर्थक जमावातील कार्यकर्त्यानी त्यांना काळे झेंडे दाखवून एक मराठा लाख मराठा आशा घोषणा दिल्या. त्यामुळे तेथे काही काळ गोंधळाची व तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी घोषणाबाजी करणार्‍या कार्यकर्त्यावर सौम्य लाठीमार केला होता.

त्या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गोपनीय शाखेचे पोलीस शिपाई योगेश समुद्रे यांच्या फिर्यादी वरून जवळबन येथील दिपक दिगांबर करपे, गणेश विठठल करपे, शिवाजी ऊर्फ सतिष सुंदरराव करपे, संदीप अंकुश करपे, निलेश वसंत करपे, भैय्या संजय गायकवाड, अक्षय जनक करपे, अमोल श्रीराम करपे, अभिषेक अविनाश करपे, श्रीराम राजाभाऊ गायकवाड, नानासाहेब राजाभाऊ मोरे, बालासाहेब बाबासाहेब रंदवे, प्रशांत शिवाजी करपे, विकास राजाभाऊ करपे, ओमकार दत्तात्रय करपे, राहुल श्रीराम करपे, विकास बाबुराव करपे, अमोल शिवाजी करपे तसेच कैलास चव्हाण (रा. पळसखेडा), मधुकर साखरे (रा. कानडी बदन), योगेश संभाजी मस्के आणि सचिन मस्के दोन्ही (रा. सावळेश्वर) गोविंद बालासाहेब गायकवाड आणि रवि गायकवाड दोन्ही (रा. आनंदगाव) या चोवीस जणांसह इतर २५ ते ३०अशा ५० ते ५५ जणांच्या जमावांनी मा. जिल्हा दंडाधिकारी यांच्या महाराष्ट्र पोलिस कायदा जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून पंकजा मुंडे यांचे गाडीचे समोर येऊन त्यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीचे संदर्भाने एक मराठा; लाख मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच ! अशा घोषणा दिल्या.
जमावाने जिल्हा दंडाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लघंन केले म्हणुन त्यांच्या विरुध्द गु र नं ७२/२०२४ भा दं वि ३४१, ३४३, १४७, १४९, १८८ महाराष्ट्र पोलीस कायदा १३५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार रामधन डोईफोडे हे तपास करीत आहेत.

Friday, March 29, 2024

तुमचे पैसे दुप्पट करून देतो असे खोटं सांगुन महिलेची 32 लाखांची फसवणूक.


बीड(प्रतिनिधी)  बीडच्या परळीमधून चोरीची मोठी घटना समोर आली आहे. कमी कालावधीमध्ये जास्त पैसे मिळवून देतो, असे आमिष दाखवून 32 लाख 69 हजार 514 रूपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आलाय. या प्रकरणात बीडच्या सायबर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, परळी शहरातील विद्या वैजीनाथ मुंडे या महिलेस 9004811291 या क्रमांकावरून फोन आला होता. तुम्ही ऑनलाईन रक्कम गुंतवल्यानंतर तुम्हाला त्याचा जास्तीचा फायदा करून देतो, असे संबंधितांनी सांगितले होते. त्यानंतर मुंडे यांनी या आमिषापोटी 32 लाख 69 हजार 514 रूपयांची गुंतवणूक केली.

गुंतवणूक टेलीग्राम लिंकच्या आधारे पाठवण्यात आली होती. बरेच दिवस झाले मात्र या गुंतवणुकीवर त्यांना कोणताही मोबदला मिळला नाही. तसेच त्यांनी जी रक्कम गुंतवलीये ती देखील परत मिळाली नाही. वारंवार पैसे परत मागून मिळत नव्हते. त्यावर आपली यात फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत सायबर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा फरार पोलिस शिपाई अखेर अटकेत.दीड महिन्यांपासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता.


आष्टी (प्रतिनिधी) : नवप्रविष्ट पोलिस शिपायाने मुंबईवरून गावी येऊन नातेसंबंधातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना  फेब्रुवारी महिन्यातील 'प्राॅमिस 'डे' च्या दिवशी घडली होती. याप्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीस पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले.

आष्टी तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेसंबंधातील एका नवप्रविष्ट पोलिस शिपायाने मुंबई येथे क्कार्टरला असताना ११ फेब्रुवारी रोजी गावी येऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता.याकामी त्याच्याच गावातील दोन मित्रांनी त्याला मदत केली होती. आष्टी पोलिस ठाण्यात १५ फेब्रुवारी रोजी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी फरार होते. 

दरम्यान, १५ दिवसांपूर्वी पिंक पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक धरनीधर कोळेकर यांच्या पथकाने वेशांतर करत थेट उसाचा फड गाठला. टॅक्टरवर चालक म्हणून काम करत असलेला समीर खेडकर व जवळच गॅरेजवर काम करत असलेला हरिओम खेडकर या गुन्ह्यात मदत करणाऱ्या दोघाजणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर आष्टी तालुक्यातील एका गावात मुख्य आरोपी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी त्याच्या गुरूवारी रात्रीमुसक्या आवळल्या. ही कारवाई पिंक पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक धरनीधर कोळेकर, पोलीस हवालदार शरद टेकाळे,मुद्दशर शेख,नितीन साप्ते यांनी केली. फरार कालावधीत मुख्य आरोपी पोलिस शिपायाना बीड न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण न्यायायलयाने तो जामीन अर्ज फेटाळला होता.

बीड लोकसभेचे उमेदवार? मा.मंत्री जयदत्त क्षीरसागर शरद पवारांच्या राष्ट्रवादी परतणार !


बीड (प्रतिनिधी) माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी त्यांच्या माध्यमातून शरद पवार भाजप समोर तगड आव्हान निर्माण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्या अनुषंगाने जयदत्त क्षीरसागर यांनी मतदारांच्या भेटी गाठीला सुरुवात केली आहे.

बीडमध्ये भाजपाने पंकजा मुंडे यांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करून आठ ते दहा दिवसाचा कालावधी उलटून गेला आहे.दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्यांसह महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणं पूर्ण बदलली आहेत.अशावेळी शरद पवार आपले एक एक पत्ते खेळत नव्याने डाव मांडत आहेत. धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे बजरंग सोनवणे यांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले.शिवसंग्रामच्या नेत्या ज्योतीताई मेटे यांच्याशी भेट घेऊन चर्चा करताना मराठा चेहरा भाजपला चितपट करण्यात कितपत यशस्वी होईल का ?याची चाचपणी पवारांनी केली.सोबतच आपल्यापासून दुरावले गेलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांचा ओबीसी चेहरा मास्टर स्ट्रोक ठरेल का? याची पडताळणी केली गेली आहे.जयदत्त क्षीरसागर बीडच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणातील बडं प्रस्थ मानलं जातं. संस्थांचं असलेलं जाळ, राजकारणाचा प्रचंड अनुभव, सोबतच निवडणूक लढण्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ, प्रत्येक मतदाराची जोडली गेलेली नाळ, त्यांच्याशी असलेले जवळीकतेचे नाते. यासारख्या अनेक जमेच्या बाजू जयदत्त क्षीरसागर यांच्या आहेत. याच्या विरुद्ध परिस्थिती भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांची आहे. त्यांना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा वारसा मिळालेला असला तरी गेल्या दहा वर्षात त्यांची जनतेशी असलेली नाळ पूर्ण तुटली गेलेली आहे. स्तुती पाठकांच्या कोंडाळ्यात अडकलेल्या पंकजा मुंडे यांना भेटून काम करायची म्हटलं तर येणाऱ्या अडचणी त्यांच्या माणसांकडून होणारी माणहानी, त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांनी मतदारांकडे निवडून आल्यानंतर फिरवलेली पाठ यासारख्या अनेक अनुभवांची गाठोडी मतदारांकडे आहे.यामुळे त्यांच्याबद्दल फारसं स्वारस्य मतदारांमध्ये नाही.जयदत्त क्षीरसागर ओबीसी चेहऱ्यासोबतच सर्व समावेशक जाती धर्मांना घेऊन चालणार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या रूपाने बीड जिल्ह्यात हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद कैकपटीने वाढणार आहे. या अनुषंगाने जयदत्त क्षीरसागर यांना आपल्या तंबूत पुन्हा परत आणून अनुभवी विकासाची दृष्टी असलेलं नेतृत्व बीड जिल्ह्याला देण्याची तयारी शरद पवारांनी चालवली आहे. याच अनुषंगाने जयदत्त क्षीरसागर यांनी काल माजलगाव मतदार संघ पिंजून काढला. आज शिरूर तालुक्याच्या काही भागात त्यांनी दौरा केला. या दौऱ्यामध्ये जवळच्या कार्यकर्त्यांची मतं ते आजमावत आहेत. आखाड्यात उतरण्यापूर्वी तयारीला त्यांनी सुरुवात केली आहे.त्यामुळे बीड जिल्ह्यातील समीकरणं नवं वळण घेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यापुढे तगड आव्हान उभं करण्याचा मास्टर स्ट्रोक शरद पवार खेळत आहेत.

Thursday, March 28, 2024

बीड- लातूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना धावत्या कारचे टायर निखळल्याने २ कार चा भीषण अपघात ५ जण गंभीर जखमी.

बीड (प्रतिनिधी) भरधाव वेगाने जात असलेल्या गाडीचे टायर निखळल्याने दोन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील ५ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात बीडच्या मस्साजोग गावाजवळ सायंकाळच्या सुमारास घडली. 
बीड- लातूर राष्ट्रीय महामार्गावर वेगाने जात असलेल्या कारचे पाठीमागचे चाक रॉड तुटल्याने बाहेर निघाले. यामुळे हे चाक समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारवर आदळल्याने दोन्ही गाड्या रस्त्याच्या बाजूला पलटी झाल्या. यामुळे गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून कारमधील ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. कारमध्ये अडकलेल्याना बाहेर काढण्यात आले. दरम्यान जखमींवर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुदैवाने जीवितहानी टळली 

भरधाव वेगाने असलेल्या कारचे चाक फुटून व निघाल्याने अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी अनेक घडल्या आहेत. मात्र बी- लातूर महामार्गावर झालेल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दोन्ही कार पलटी होऊन यात कारमधील प्रवाशी जखमी झाले आहेत. 

जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीने सामाजिक बांधिलकी जोपासून शिवजयंती केली साजरी.परळीतील रानबा महाराज मंदिराचे अपूर्ण काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प.

*छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श राज्य निर्माण केले-माऊली फड. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  जगाच्या पाठीवर आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत की ज्यांनी आपल्या राज्यातील शेवटच्या घटकापर्यंतच्या नागरिकांच्या प्रगती आणि सुरक्षेचा विचार केला आहे. छ.शिवाजी महाराज हे आदर्श राजे असून त्यांच्या सुराज्याचे विचार आजही तेवढेच अनुकलनीय असून राजांच्या सुराज्य धोरणावर जर आपण काम केले तर महाराष्ट्र नेहमीच जनतेचे राज्य म्हणून ओळखले जाईल असे मत विविध व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानोबा माऊली फड यांनी व्यक्त केले. परळी शहरातील मलिकपुरा, पंचायत समितीसमोरील संतश्री रानबा महाराज यांच्या मंदिराचे अपूर्ण काम गुढीपाडव्यापर्यंत पूर्णत्वास नेण्याचा संकल्प करण्यात आला.  वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध मंदिरांची केलेली स्वच्छता मोहीम लक्षात घेवून त्यांना विविध प्रकारचे साहित्य प्रदान करण्यात आले. दरम्यान जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या या सामाजिक कार्याचे परळी शहरातील नागरिक, व्यापारी बांधवांनी कौतुक केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज गुरूवार दिनांक 28 मार्च रोजी परळी येथे जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोंढा मैदानावर साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आई तुळजाभवानी, जिजाऊ माँसाहेब, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन परळी विविध व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आले. तर परळी शहरातील विविध वृत्तपत्रांच्या संपादक महादेयांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. 

 जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक परळी वैद्यनाथ  नगरीचे माजी नगराध्यक्ष अभयकुमार(पप्पु )ठक्कर यांचा मार्गदर्शनाखाली  आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सव समितीच्या  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विविध व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानोबा माऊली फड, दै.परळी प्रहारचे संपादक राजेश साबणे, दै.जगमित्रचे संपादक बालासाहेब कडबाने पाटील, दै.दिव्य अग्नीचे संपादक प्रकाश सुर्यकर, पत्रकार संतोष जुजगर, अनंत कुलकर्णी, व्यापारी गुलाब अप्पाराव शेटे, बंडू गरूड, ब्रिजलालजी मुंदडा, विष्णुदासजी बियाणी, फडकरी अप्पा, सुरेश ठक्कर, ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे, वृद्ध कलावंत संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास काटे,यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज शिवजयंतीचे वातावरण अधिक भगवेमय व उत्साहवर्धक झालेले होते. कार्यक्रमाचे संचलन जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीचे प्राचार्य अतुल दुबे तर आभार प्रदर्शन श्रीनिवास उर्फ मुन्ना सावजी यांनी केले. याच कार्यक्रमात  परळी शहररातील मलिकपुरा, पंचायत समितीसमोरील असलेले संतश्री रानबा महाराज यांचे मंदिर असून या मंदिराचे अपूर्ण राहिलेले काम गुढीपाडव्यापर्यंत पुर्णत्वास नेण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध मंदिरांची केलेली स्वच्छता मोहीम लक्षात घेवून त्यांना विविध प्रकारचे साहित्य प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात ध्येय मंत्र  व प्रेरणामंत्राने तर सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमास शहर व पंचक्रोशीतील शिवप्रेमी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मोहन परदेशी, कार्याध्यक्ष बबन ढेंबरे,श्रीनिवास सावजी, रमेशअण्णा चौंडे, सोमाने , प्रकाश देवकर, सचिन मुंडे, दिनेश लोंढे,माऊली मुंडे, नवनाथ वरवटकर, किशन बुंदिले ,संस्कार पालीमकर, योगेश जाधव मनीष जोशी,अमित कचरे, दीपक जोशी, अजय आघाव,गोपीनाथ मुंडे, ईश्वर गायके,नवल वर्मा सिद्धार्थ गायकवाड शिवम मोहिते, वरद कुलकर्णी  लक्ष्मण मुंडे, योगेश घेवारे, अनिल घोबाळे,योगेश जाधव, जगदीश पवार, नरेश मैड, सोमनाथ गायकवाड, अभिजित पवार,करण कुसळे, विनित वानरे, रवी देवकर, मोहित जोशी, बालाजी सातपुते, हनुमान जाधव, नागनाथ तूपसौंदर, कैलास तूपसौंदर, जालिंदर फड यांनी प्रयत्न केले.

बसमध्ये चढत असतानाच गर्दीचा फायदा घेत मिनीगंठन लंपास. लेकीचे मिनीगंठन आईच्या गळ्यातून चोरी, परत मिळताच बीड पोलिसांचा केला सत्कार.


बीड (प्रतिनिधी): येथील बसस्थानकातून वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मिनीगंठन चोरी झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून महिला चोरट्याला बेड्या ठाेकत ते परत मिळवले. गुरूवारी ते संबंधित वृद्धेला पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते परत केले. यावेळी वृद्धेला भावना अनावर झाल्या. या महिलेसह त्यांच्या नातेवाईकांनी एसपी ठाकूर यांच्यासह एलसीबीच्या पथकाचा सत्कार केला.

सुलभा मनोज गाडे (वय ४५, रा. वाघोली, पुणे) या संजय धोंगडे (रा. गयानगर, बीड) या भावाच्या मुलीचे लग्न असल्याने २ फेब्रुवारी रोजी पुण्यावरून बीडला आल्या होत्या. येताना त्यांनी मुलीचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र गळ्यात घातले होते. लग्न उरकल्यानंतर त्या ५ मार्च रोजी दुपारी पुण्याला परत जाण्यासाठी बीड बसस्थानकात आल्या. बसमध्ये चढत असतानाच गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला गती दिली. यात त्यांना गवळण पांडुरंग गायकवाड (वय ४०, रा. माउलीनगर, पेठ बीड) या महिलेने गंठन चोरल्याची माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून तिला मागील आठवड्यात बेड्या ठोकत तिच्याकडून दोन तोळ्याचे गंठन परत मिळवले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ते गुरूवारी गाडे यांना पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते परत करण्यात आले.

एसपींसह एलसीबीच्या पथकाचा सत्कार.

मिनीगंठन परत मिळताच सुलभा गाडे व त्यांच्या नातेवाईकांनी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह एलसीबीचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, हवालदार मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, नारायण कोरडे, सुशीला हजारे, स्वाती मुंडे, सचिन आंधळे, चालक सुनील राठोड आदींचा सत्कार केला.

मराठवाड्यात जमिनीखाली दडलाय पुरातन इतिहास ? छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ आता आंबेजोगाईत उत्खनन.


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)  मराठवाड्यातील ऐतिहासिक स्थळांच्या परिसरात अजूनही ‘इतिहास’ जमिनीखालीच दडलेला आहे. छत्रपती संभाजीनगरात जगप्रसिद्ध बीबी का मकबरा परिसरातील उत्खननात जुने अवशेष उघडे पडले. छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ आता आंबेजोगाईतील सकलेश्वर मंदिर परिसरात उत्खनन सुरू करण्यात आले आहे. यापूर्वीही मराठवाड्यात ठिकठिकाणी जमिनीखालून इतिहासाचा उलगडा झालेला आहे.

जगप्रसिद्ध ‘दख्खनचा ताज’ म्हणजे बीबी का मकबरा परिसरात गेल्या महिनाभरात झालेल्या उत्खननात अनेक पुरातन वस्तू आणि रचना सापडल्या. यापाठोपाठ आंबेजोगाई (जि. बीड) येथील सकलेश्वर मंदिर (बाराखांबी) परिसरात १५ मार्चपासून उत्खनन (सायंटिफिक क्लिअरन्स) सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी येथे २०१८ मध्ये उत्खनन करण्यात आले होते. तेव्हा तीन पुरातन मंदिरांचे अवशेष आढळून आले होते. आता गेल्या १० दिवसांच्या उत्खननात आणखी दोन मंदिरांचा पाया आढळून आला आहे. राज्य पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक जया वाहणे, उत्खनन संचालक अमोल गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास ५० जणांचे पथक सकलेश्वर मंदिर परिसरात उत्खननाचे काम करीत आहे.

औसा किल्ला परिसरात तोफगोळे, हत्यारे...

औसा किल्ला परिसरात जतन व दुरुस्तीच्या कामादरम्यान खोदकाम करताना तोफगोळे, दगडी, धातूची हत्यारे सापडली होती. त्यामुळे या परिसरात शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन करणे गरजेचे असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी उत्खननासाठी १.१० कोटींचा निधी मंजूर झाला.

यापूर्वी मराठवाड्यात कुठे उत्खनन?

जगप्रसिद्ध वेरुळ या ठिकाणी इतिहासाची साक्ष देणाऱ्या श्री. मालोजीराजे भोसले गढी येथे २००५ ते २००६ मध्ये उत्खननात काही अवशेष आढळले होते. या उत्खननात जवळपास ६९ दुर्मीळ पुरातन वस्तू सापडल्या. त्यामध्ये लाल दगडात घडवलेली गणेशमूर्ती, भाग्य रत्ने, मातीचे दिवे, बांगड्या, कांस्य नाणी, चांदीच्या अंगठ्या, घराचा पाया इत्यादींचा समावेश होता. उत्खननात सापडलेल्या वस्तूंचा सखोल अभ्यास करून या वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आल्या. भोकरदन व तेर येथील उत्खननात इ. स. पूर्व ३०० ते २०० दरम्यानचे अवशेष सापडले. मौल्यवान दगड, मणी, भाजलेल्या मातीची भांडी, मूर्ती, दैनंदिन वापराच्या वस्तू, हस्तिदंती शिल्पांचा यात समावेश होता. दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी केलेल्या उत्खननात मध्ययुगीन काळातील अवजारे, बाणाचे टोक, चाकू, खिळे, कुलपाची चावी आदी वस्तू सापडल्या. त्याबरोबरच लातूर, पैठण येथेही उत्खनन करण्यात आले होते.

Wednesday, March 27, 2024

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने बीड जिल्ह्यात पाणी टंचाईची दाहकता; १४० गावातून टँकर मागणीचे प्रस्ताव.


बीड (प्रतिनिधी): उन्हाळ्यातील मार्च महिना सुरू असतानाच बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाचे चित्र अधिक गडद बनत चालले आहे.मार्च महिन्यातच पाणी टंचाईची दाहकता वाढल्याने जिल्ह्यातून तब्बल १४० गावांमधून टँकर मागणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. जिल्ह्यात बीड, गेवराई, शिरूर आणि आष्टी  तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईची दाहकता वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणी टंचाईची भीषणता आतापासून जाणविण्यास सुरवात झाली आहे. बीड जिल्ह्यात देखील याची दाहकता अधिक जाणवत आहे. अनेक गावांमध्ये ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. बीड तालुक्यातील जवळपास 60 गावांचे टँकर प्रस्ताव प्रशासनाकडे आतापर्यंत आले असून, गेवराई तालुक्यातील 40 गावांचे प्रस्ताव येण्याच अंदाज आहे. तर माजलगाव तालुक्यातून अन अंबाजोगाई 5, परळी 5, केज 4, धारूर 3, शिरूर कासार 10, आष्टी 5 व पाटोदा तालुक्यातून 8 प्रस्ताव येण्याचा अंदाज आहे.
बीड जिल्ह्यात पाणी टंचाई जनविण्यास सुरवात झाली असून ही दाहकता अधिक वाढण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. यात पुढील महिन्याच्या शेवटी वाढ होण्याचा अनुमान आहे. त्यानुसार पाहणी करून परिस्थितीनुसार टँकर मंजुरीबाबत निर्णयाची कार्यवाही होणार आहे; अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.