Friday, March 31, 2023
डिझेलसाठी बीड बस डेपोकडे पैसेच नाही; ८२ पैकी फक्त २० बसेस सुरु.प्रवाशांची तारांबळ अन् संताप.
शेतकरी कामगार पक्षाने राेखला माजलगाव - पाथरी राष्ट्रीय महामार्ग विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन वाहनांची तीन किलाेमीटर रांग.
बीड (प्रतिनिधी) शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी बीड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजलगाव - पाथरी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन छेडले आहे.
शेतमालाला हमीभाव द्या, शेतकऱ्याला 10 हजार रुपये महिना पेन्शन द्या या व अन्य मागण्यांसाठी बीड येथील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज कार्यकर्त्यांनी माजलगाव - पाथरी रोडवर मोठेवाडी येथे तब्बल दीड तास रास्ता रोको करत शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला
यावेळी रास्ता राेकाे आंदाेलनामुळे महामार्गावर दोन ते तीन किलो मिटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शासनाने शेतकऱ्यांचा बी- बियाणे, खते, औषधे, रोजंदारी, डिझेल, पेट्रोल, व यंत्रसामग्री यांच्या किंमतीत प्रचंड भाववाढ केली आहे. त्यामुळे वास्तव खर्चावर आधारित शेतकऱ्यांच्या शेतीमाला किफायतशीर हमी भाव देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
लोकनेते गोपीनाथमुंडे सांस्कृतिक सभागृह शहराच्या वैभवात भर घालणार.आ.नमिता मुंदडा
अंबाजोगाई (प्रतिनिधी) लोकनेते गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृहासाठी पाच कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्याबद्दल केज शहरातील व तालुक्यातील प्रमुख भाजप कार्यक्रत्यांकडून आमदार नमिता मुंदडा यांचा अंबेजोगाई येथील त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. त्यावेळी आमदार नमिता मुंदडा या बोलत होत्या. केजकरांचा व तालुक्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे भाग्य माझ्या हातून घडत आहे त्याबद्दल मी समाधानी आहे असे मत आमदार नमिता मुंदडा यांनी कार्यक्रत्यांच्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. लोकनेते गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृहाचे काम दर्जेदार होण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष देईल व या कामासाठी निधीची कसलेही कमतरता भासू दिली जाणार नाही असे पुढे बोलताना आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या.या कामासाठी चांगल्यात चांगला आर्किटेक्चर नेमला जाईल व काम सुंदर,दर्जेदार होईल या साठी स्वतः प्रयत्न केला जाईल असे आश्वासन युवा नेते अक्षय मुंदडा यांनी दिले. लोकनेते गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृहासाठी महाराष्ट्र शासनाने डि. वाय. एस. पी. कार्यालयाची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले . या वेळी युवा नेते अक्षय मुंदडा, सुनील आबा गलांडे, डॉ. वासुदेव नेहरकर,भगवान केदार, रामकृष्ण घुले,विष्णु घुले,मुरलीधर ढाकणे,लक्ष्मण तात्या राख, वसंत केदार, बाळासाहेब घुगे, सुरेश केकाण,डॉ.सचीन शेप, अशोक नागरगोजे, अरुण चाटे, दिनकर चाटे,सदाशिव चाटे, महादेव जाधवर, सुनील घोळवे, प्रकाश मुंडे,रघुनाथ बारगजे,शिवाजी चाटे, सुरेश घोळवे,शरद इंगळे,डॉ संभाजी वायबसे ,चंदू मिसाळ, ईश्वर बिक्कड,महादेव घूले,अज्जू तांदळे,विरेंद्र जोगदंड, अविनाश साबळे, श्रीकांत भांगे, विष्णू चाटे, फुलचंद दराडे, विजय वनवे, अशोक सोनवणे,धनंजय घोळवे ,बाबुराव घुले, रणजित बिक्कड,वसंत बिक्कड,उत्तम बिक्कड,भरत बिक्कड,धनराज लाटे, मनोज राख,माणिक शेप सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ वासुदेव नेहरकर यांनी केले तर आभार रामकृष्ण घुले यांनी व्यक्त केले.
खळबळजनक ! नाचण्याच्या कारणावरून वाद विकोपाला. रामनवमी यात्रेत तरुणाची हत्या.
या शोभा यात्रेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर यांच्यासह शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. दरम्यान बडी सडक परिसरातून ही शोभा यात्रा जात असताना दोन तरुणांमध्ये नाचण्याच्या करणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हणामारीत झाले. यात एका तरुणावर धारदार चाकूने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
विष्णू राम सुपारकर या ३० वर्षीय तरुणाचा दुर्दवी मृत्यू झालाय. या घटनेनंतर शहरातील नागरिकांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात एकच गर्दी करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच पोलीस स्टेशनला घेरावा घातला. यामुळे पोलिस्टेशन आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या प्रकरणी सदर बाजर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांच्या पथकाकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
Thursday, March 30, 2023
अंबाजोगाईतील ११८ मूर्तींसह बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा तेरच्या संग्रहालयात.
*तेर येथील संग्रहालयात प्राचीन ऐतिहासिक वस्तूंचा वारसा जतन करण्यात येत आहे.
तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथील रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय वस्तू संग्रहालयात आता बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक वस्तूंचेही जतन व संवर्धन केले जाणार आहे. यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील पुरातन व ऐतिहासिक संकलेश्वर (बाराखांबी) परिसरात पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननातील ११८ मूर्ती, शिलालेख यासह विविध ऐतिहासिक वस्तू तेर येथील संग्रहालयात ठेवण्यासाठी मंगळवारी व बुधवारी दाखल झाल्या. त्यामुळे येथील संग्रहालयात आणखी ऐतिहासिक वारशाची भर पडली आहे.
प्रवाशांनी भरलेल्या रिक्षाला ट्रकने उडविले; भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू
नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड ते मुदखेड मार्गावरील इजळी पाटीजवळ भीषण अपघात झाला आहे. सिमेंटने भरलेल्या ट्रकने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली असून या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. यात एका लहान मुलाचा आणि एका वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे.
नांदेड ते मुदखेड या मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. यात नांदेडकडे प्रवाशांनी भरलेली ॲपरिक्षा जात होती. या वेळी नांदेड कडून भरधाव येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा दूरवर फेकली गेली. या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले असून जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मजुरीसाठी जात होते
रोजच्या नित्यनियमाप्रमाणे नांदेडला रिक्षाने अनेकजण मजुरीसाठी जात होते. यानुसार आज देखील ॲपेरिक्षामध्ये जवळपास १५ प्रवाशी होते. हे सर्व जण वाजेगाव येथे मजुरीसाठी जात होते. परंतु, कामावर पोहचण्यापुर्वीच रिक्षाला अपघात होवून काळाने घाला घातला.
वेताळवाडीत १६ वर्षीय मुलीने संपवले जीवन.आष्टीत तीन दिवसांत २ अल्पवयीन मुलींच्या आत्महत्या दोन्ही मुलींच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट.
आष्टी (प्रतिनिधी) :बीडसांगवी येथे आजोळी राहत असलेल्या एका १३ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री सात वाजेच्या दरम्यान वेताळवाडी येथे देखील अल्पवयीन मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रतिक्षा सुरेश वनवे (१६) असे वेताळवाडी येथील मृत मुलीचे नाव आहे. आष्टी तालुक्यात तीन दिवसांत दोन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
सहायक पोलीस अधीक्षक डॉ धीरजकुमार यांच्या पथकाची कारवाई.परळीत माजी नगरसेवक चालवत असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा.
*बीडसह परभणी, लातूर जिल्ह्यातील २९ जुगारी पकडले : सहायक पोलिस अधीक्षक धीरजकुमार यांच्या पथकाची कारवाई.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी शहरातील हमाल वाडी परिसरात माजी नगरसेवक जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती माजलगाव चे सहायक पोलीस अधीक्षक डॉ धीरजकुमार यांना मिळाली. त्यांनी बुधवारी रात्री ९ वाजता आपल्या पथकासह छापा मारला. यात तब्बल २९ जुगारी पकडले असून त्यांच्याकडून १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्ह्यात सध्या अवैध धंद्याविरोधत मोहीम हाती घेतली आहे. मागील आठवड्यात बीडमध्ये एका जुगार अड्यवर छापा टाकून याच पथकाने एका माजी नगरसेवकच्या क्लब चा पर्दाफाश केला होता. त्यांनतर आता परळीत त्यांनी मोर्चा वळवला. परळी शहरातील हमाल वाडी भागात माजी नगरसेवक जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती धीरजकुमार यांना मिळाली होती. त्यांनी लगेच सापळा लावला. रात्री उशिरा त्यांनी छापा मारून ही कारवाई केली. यामधे २९ लोकांना ताब्यात घेऊन परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दुचाकी, चारचाकी, मोबाईल, रोख रक्कम असा १७ लाख ९३ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक डॉ धीरजकुमार, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड, पोलीस कर्मचारी अशोक नामदास, गणेश नवले, संतराम थापडे, युवराज चव्हाण, तुकाराम कानतोडे आदींनी केली.
गाडी अडविल्यावरून भरचौकात शिवीगाळ करून पोलिसाला मारहाण.
बीड (प्रतिनिधी) : गाडी अडविल्याचा राग मनात धरून पोलिस निरीक्षकांना शिवीगाळ तर पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, सीसीटीव्ही तपासा, आपण मारहाण केलेली नसून पोलिसांनीच आपल्याला धक्काबुक्की केल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.
Wednesday, March 29, 2023
मध्यरात्री उपोषणकर्त्याचे अंथरूण पेटवून जाळण्याचा प्रयत्न?; उपोषणकर्त्याचा गंभीर आरोप.
उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी माध्यमाचे शिक्षक. शिक्षक समायोजन नवीन घोटाळा समोर.
पालकांचे खुले आव्हान
बीडच्या नेकनूर येथील उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत. मात्र त्या ठिकाणी शिक्षकांची रिक्त पदे असल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे मुख्याध्यापक मोमीन मोहम्मद सिद्दीकी यांनी सांगितलं. शिक्षकांनाच उर्दू भाषा येत नसेल तर विद्यार्थ्यांना काय शिकवणार त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ज्या शिक्षकांना नियुक्ती केली आहे. त्या शिक्षकांनी उर्दूमधील एक पाठ शिकवून दाखवावा, असा खुल आवाहन पालकांनी दिला आहे. तसेच या शिक्षकांचे नियुक्ती करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यावर कारवाई केली जावी; अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तर शाळांना कुलूप ठोकणार
उर्दू शाळांवर मराठी शिक्षकांना अनधिकृतपणे पदस्थापना देण्यात आली आहे. उर्दू शाळांवर फक्त उर्दू माध्यमाच्या शिक्षकांनाच पदस्थापना देण्यात यावी, अशी संघटनेची वारंवार मागणी असूनही जाणूनबुजून असे काम केले जात आहे. या संपूर्ण समायोजन घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. नियमबाह्य नियुक्त्या तात्काळ रद्द करा, अशी मागणी उर्दू शिक्षक संघटना यांनी केली आहे. दरम्यान अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या शिक्षण विभागाचा निषेध व्यक्त करतो. ज्या शाळांचा अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना फायदाच होणार नाही, त्या शाळांना कुलूप ठोकण्याचा इशारा एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांनी दिला आहे.
शिक्षणाधिकारी म्हणताय माहित नाही..
दरम्यान बीड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना या संदर्भात विचारले असता नेमकं त्यांचा समायोजन आणि नियुक्ती कशी झाली आहे? हे पहाव लागेल. यासंदर्भात मला माहिती नाही, असं म्हणत बाईट देण्यास नकार दिला. मात्र शिक्षण अधिकाऱ्यांनाच समायोजना संदर्भात माहीत नसेल, तर या प्रकरणातील माहिती कशी दडपण्याचा प्रयत्न केला जातोय? याचा प्रत्यय येत आहे. एकंदरीतच या उर्दू शाळेमधील समायोजन घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे
मा.खा.निलेश राणेंची केज न्यायालयात हजेरी.आक्षेपार्ह पोस्टप्रकरणात जामीन मंजूर.
*वंचित बहजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध केली होती आक्षेपार्ह पोस्ट
केज (प्रतिनिधी): सोशल मीडियात सन 2020 मध्ये आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी खासदार निलेश राणे यांनी आज केज न्यायालयात हजर लावली. यावेळी न्यायाधीश एस.व्ही. पावसकर यांनी त्यांना जामीन मंजूर केला.
सन 2020 मध्ये केज तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की, वंचित बहजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध माजी खासदार निलेश राणे, केज तालुक्यातील विवेक अंबाड ( रा.लाडेगाव ) आणि रोहन चव्हाण ( रा. पळसखेडा) यांनी अपशब्द वापरून दोन समाजामध्ये शत्रुत्व, व्देषभाव व तेढ निर्माण होईल अशा पोस्ट सोशल मिडियावर शेअर केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी. या प्रकरणी केज पोलीस स्टेशनला माजी खासदार निलेश राणे, विवेक अंबाड, आणि विवेक चव्हाण यांच्या विरुद्ध ऑक्टोबर 2020 रोजी गु.र.नं. 432/2020 भा.दं.वि. 505 (2) आणि 34 नुसार गुन्हा दाखल झाला होता.
कापसात गांजाची लागवड. चार महिन्यांपासून फरार गांजा तस्कराच्या आवळल्या मुसक्या.
आष्टी (प्रतिनिधी) - कापसाच्या शेतात गांजाची लागवड करून विक्री केल्याप्रकरणी चार महिन्यांपासून फरार असलेल्या गांजा तस्कराच्या अखेर अंभोरा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान मुसक्या आवळत अटक केली. हनुमंतअर्जुन पठारे (रा.बाळेवाडी ता.आष्टी )असे आरोपीचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील बाळेवाडी येथील हनुमंत अर्जुन पठारे याने स्वतःच्या शेतात कापूस पिकात १३० गांजाची झाडे लावल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा, अंभोरा पोलिसांना मिळाली. यावरून ९ डिसेंबर २०२२ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ७ लांखाचा गांजा जप्त केला. मात्र, यावेळी हनुमंत पठारे पसार झाला होता. आरोपी ओळख लपवत पोलिसांना गुंगारा देऊन पुणे, शिरूर, अहमदनगर या ठिकाणी फिरत होता. दरम्यान, आरोपी पठारे मंगळवारी राहत्या घरी आल्याची गोपनीय माहिती अंभोरा पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी सापळा रचून सायंकाळी पठारेच्या मुसक्या आवळल्या.
BREKING न्युज ! भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं निधन.
६३ हजार शिक्षकांसाठी आनंदाची बातमी ! ३४२७ शाळांना २० टक्के अनुदान.पगार वाढणार.
राज्य सरकारच कांदाउत्पादक शेतकर्यांना 350 रुपयांचं अनुदान जाहीर. अटी काय, कुठे अर्ज करायचा, वाचा सविस्तर माहिती.
मुंबई (प्रतिनिधी) कांद्याचे दर घसरल्यानं राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. विरोधकांनी राज्य सरकारकडे कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल 500 रुपयांचं अनुदान देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारनं कांदा उत्पादक शेतकर्यांना 350 रुपयांचं अनुदान जाहीर केलं होतं. राज्य सरकारनं कांदा उत्पादकांना 350 रुपयांचं अनुदान देण्यासाठी प्रक्रिया जाहीर केली आहे. 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत कांदा विक्री करणार्या एका शेतकर्याला 200 क्विंटल कांद्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
अटी काय ?
कांदा उत्पादक शेतकर्यांना रुपये 350 प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. ज्या शेतकर्यांनी लेट खरीप हंगामातील लाल कांदा दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार समितीमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडून लेट खरीप कांदा खरेदीकरीता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रांमध्ये विक्री केली असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. परराज्यातून आवक झालेल्या आणि व्यापार्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू राहणार नाही. 350 रुपयांचं अनुदान थेट बँक हस्तांतरणद्वारे शेतकर्यांच्या बचत बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. कांद्यासाठी देण्यात येणारं अनुदान आयसीआयसीआय बँकेमार्फत वितरित करण्यात येणार आहे.
अर्ज कुठं करायचा ?
कांदा उत्पादक शेतकर्यांनी या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी कांदा विक्री पट्टी/ विक्री पावती, 7/12 चा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांक इ. सह साध्या कागदावर ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केलेली आहे तेथे अर्ज करावा.
बाजार समित्यांवर जबाबदारी
शेतकर्यांना अनुदान प्राप्त करुन देण्याचे प्रस्ताव हे संबंधित बाजार समितीने तयार करावेत. प्रस्ताव तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीवर असेल. हे प्रस्ताव तालुका सहाय्यक निबंधक यांनी तपासून ते जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेकडे सादर करावेत. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी योग्य प्रस्तावांना मंजूरी दिल्यानंतर, ती यादी पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना मान्यतेसाठी सादर करण्यात येतील. त्यांनी तपासून अंतिम केलेल्या यादीला पणन विभागामार्फत थेट लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यावर निधी वितरीत करण्यात येणार आहे.
यांना मिळणार मदत ?
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार समित्यांमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकर्यांना रुपये 350 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंकेंच्या पीएला अटक. भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला प्रकरण.
*महादेव सोळुंके याच्या अटकेमुळे आ. सोळंके यांच्या अडचणीत वाढ झाली असून ते आता पोलिसांच्या रडारवर आहेत.
माजलगाव (प्रतिनिधी): येथील भाजपाचे कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणात येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहाय्यक महादेव सोळंके यास पोलिसांनी केज येथे चौकशीला बोलावून अटक करून माजलगाव पोलीस ठाण्यात आनण्यात आले. या अटकेमुळे आता आ. प्रकाश सोळंके पोलिसांच्या रडारवर येऊ शकतात.
येथील भाजपाचे कार्यकर्ते अशोक शेजुळ यांनी आ. प्रकाश सोळुंके , त्यांच्या पत्नी मंगला प्रकाश सोळंके , उद्योगपती रामेश्वर टवाणी यांच्या विरोधात विविध संस्थेत केलेल्या भ्रष्टाचारा विरोधात न्यायालयात ३ मार्च रोजी जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर ७ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी अशोक शेजुळ यांच्यावर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात पाच जणांनी हल्ला केला होता. यात शेजुळ गंभीर जखमी झाले होते. शेजुळ यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात आ. सोळंके पती-पत्नीवर ३०७ चा गुन्हा दाखल झाला होता.
यातील पाच आरोपींना पोलिसांनी चार ते पाच दिवसात अटक केली होती. त्यानंतर पोलीस सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांनी आमदार सोळंके पती-पत्नी सह १० ते १२ जणांची कसून चौकशी केली होती. यात आमदार प्रकाश सोळंके यांचे स्विय सहाय्यक महादेव सोळंके यास मंगळवार रोजी दुपारी तपास कामी बोलावले असता या मारहाण प्रकरणात महादेव सोळंके यांनी कबूल केल्याचे उघड होताच त्यास ५ वाजता केज येथे अटक करून माजलगाव शहर पोलिसात रात्री उशिरा आणण्यात आले. महादेव सोळुंके याच्या अटकेमुळे आ. सोळंके यांच्या अडचणीत वाढ झाली असून ते आता पोलिसांच्या रडारवर आहेत.