Friday, March 24, 2023

संतापजनक घटना ! शेतजमिनीचा वाद विकोपाला, मोठ्या भावाने चक्क लहान भावालाच संपवलं.

अंबड (प्रतिनिधी) ; जालना जिल्ह्यातून एक भयानक घटना उघडकीस आली. शेतजमिनीच्या वादातून एका १८ वर्षीय सावत्र भावाने आपल्या ८ वर्षीय भावाची गळा आवळून हत्या केली. नराधम भावाने आधी लहान भावाचा रुमालाने गळा आवळला. त्यानंतर त्याच्या तोंडात चिखत कोंबून त्याची निर्दयीपणे हत्या केली. जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या भार्डी गावात ही संतापजनक घटना घडली. या घटनेनं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

विराज तुकाराम कुढेकर (वय ८ वर्ष) असं झालेल्या मुलाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश तुकाराम कुढेकर (वय १८) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील भार्डी गावात तुकाराम कुढेकर हे राहतात. तुकाराम यांचे पहिले लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा देखील झाला.

मात्र, पतीसोबत पटत नसल्याने तुकाराम यांची पहिली पत्नी घर सोडून माहेरी गेली. अनेक वर्ष होऊन सुद्धा ती परत न आल्याने तुकाराम यांनी दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीपासून तुकाराम यांना विराज (वय ८ वर्ष) वर्षाचा मुलगा झाला. काही दिवसानंतर तुकाराम यांच्या पहिल्या पत्नीने पोटगी मिळण्यासाठी त्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली. तेव्हापासून दोघांमध्ये जमिनीचे वाद सुरू होते.

दरम्यान, तुकाराम यांचा मोठा मुलगा ऋषिकेश हा अधूनमधून गावाकडे येऊन जमिन वाटपावरून वाद घालत होता. गुरूवारी सुद्धा तो गावाकडे आला. दुपारी ऋषिकेशने आपल्या ८ वर्षीय सावत्र भावाला गोडबोलून गावातील डाव्या कालव्याच्या शेजारी असलेल्या शेतात नेले. तिथे त्याची गळा आवळून हत्या केली. संतापजनक बाब म्हणजे लवकर जीव जावा म्हणून त्याने विराजच्या तोंडात चिखल देखील कोंबला.

विराजच्या मृत्युची खात्री पटल्यानंतर ऋषिकेश हा गावात आला. आपण आपल्या सावत्र भावाला मारून टाकल्याचे सांगत त्याने सायकलवरून पळ काढला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी पाठलाग करत ऋषिकेशला पकडलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ऋषिकेशला ताब्यात घेतले.

दरम्यान, मृत विराज याच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून सावत्र मुलगा ऋषिकेश आणि त्याच्या आईविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. जमिनीच्या वादातून सावत्र भावाने आपल्याच भावाची हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment