Monday, September 28, 2026
महावितरणचा भोंगळ कारभार: वरोरा येथे उखर्डा गावात नवीन 'स्मार्ट मीटर' जळाले नवीन मीटरसाठी पैसे मागितल्याने ग्राहकाचा तीव्र संताप!
वीज मीटर बदलण्यासाठी महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ.ला 13 हजारांची लाच, ACBने रंगेहात पकडले.
तक्रारीची पडताळणी करण्यासाठी तक्रारदार पंचासह महावितरणच्या परळी कार्यालयात गेले. परंतु त्या ठिकाणी अरुण गीते हे उपस्थित नव्हते. त्यानंतर तक्रारदारांनी गीते यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी तक्रारदारास शहरातील माऊलीनगर येथे बोलावून घेतले. त्या ठिकाणी झालेल्या चर्चेदरम्यान गीते यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर १३ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. रविवारी दुपारी १.१० वाजता जिरगेनगर येथील डीपीजवळ तक्रारदाराकडून १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वरिष्ठ तंत्रज्ञ अरुण गीते यांना पथकाने रंगेहाथ पकडले. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार गजानन घायवट, पोलिस अंमलदार मनोहर भुतेकर, गजानन कांबळे, शिवलिंग खुळे, गणेश चेके, पोलिस नाईक कापसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी रात्री सुरू होती. दरम्यान, परळीतील जलालपूर भागात भाड्याने राहत असलेल्या गीते यांच्या घराची झडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बीड येथील अधिकारी समाधान कवडे यांच्या पथकाने घेतल्याचे वृत्त आहे.
Thursday, September 24, 2026
कुटुंब अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनात इकडे चोरट्यांनी घर केले साफ!कपाटातील सोने अन् रोकड लंपास.
आष्टी (प्रतिनिधी): गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनासाठी कुटुंब घराला कुलूप लावून गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दार उचकटून आत प्रवेश करत कपाटातील दीड तोळे सोने आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. ही घरफोडी आष्टी तालुक्यातील सुर्डी येथे बुधवारी रात्री घडली असून, कीर्तन संपवून कुटुंब घरी परतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
सप्ताहात कीर्तनाला गेले अन् घडला अनर्थ
सुर्डी येथे सध्या अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. गावातील रहिवासी शेतकरी जालिंदर अर्जुन गर्जे हे बुधवारी रात्री घराला कुलूप लावून सहकुटुंब सप्ताहातील कीर्तन ऐकण्यासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात भामट्यांनी घराच्या दरवाजा एका बाजूने उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील साहित्याची उचकापाचक करत कपाटात ठेवलेले सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केला.
कीर्तन संपवून घरी आल्यावर प्रकार उघड
रात्री उशिरा कीर्तन संपल्यानंतर गर्जे कुटुंब घरी परतले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा आणि सामानाची दाणादाण उडाल्याचे दिसले. कपाटातील दागिने व रोख रक्कम गायब असल्याचे लक्षात येताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या चोरीच्या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हिंद नगर-भवानी नगरमधील अवैध दारू विक्री बंद करा.नवीन दारू दुकानास स्थलांतरास परवानगी देऊ नये. नागरिकांचे प्रशासनाला निवेदन - प्रशांत कराड
अहिल्यानगर-पाथर्डी मार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स रस्त्यावर उलटली. २० प्रवासी थोडक्यात बचावले
आष्टी (प्रतिनिधी) : पुण्याहून नांदेडकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्स अहिल्यानगर-पाथर्डी मार्गावर अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने रस्त्यावर पलटी झाल्याची घटना घडली. हा भीषण अपघात आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथील हॉटेल सम्राटसमोर पहाटे ३:२५ वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, गाडीतील सर्व २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
गाढ झोपेत असतानाच उलटली बस
'स्वामी टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स'ची बस (क्रमांक ए.आर. ०६, बी. ६७००) पुण्यावरून अहिल्यानगर-पाथर्डी मार्गे नांदेडच्या दिशेने २० प्रवाशांना घेऊन जात होती. पहाटेच्या वेळी बहुतांश प्रवासी गाढ झोपेत असताना आष्टी तालुक्यातील मराठवाडी शिवारात ट्रॅव्हल्समध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्यावर उलटली. अचानक झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट उडाली; मात्र नशीब बलवत्तर असल्याने सर्व प्रवासी मोठ्या अनर्थातून बचावले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंभोरा पोलिसांकडून अवघ्या ३० मिनिटांत मदतकार्य
पहाटे ३:२५ च्या सुमारास अपघाताची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तत्परता दाखवली. पोलीस अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ, कृष्णा नरवडे, प्रकाश पडवळ, सोपान येवले आणि होमगार्ड धुमाळ यांनी अवघ्या ३० मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवून सर्व जखमी प्रवाशांना खासगी रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवले.
चालकाला मारहाण करून कार पळवणारे दोन भामटे गजाआड; 'डायल ११२' मुळे अवघ्या १०५ मिनिटांत कारवाई.
बीड (प्रतिनिधी) मूळचे कोळगाव (ता. गेवराई) येथील रहिवासी व सध्या शांतीनिकेतन शाळेजवळ राहणारे अशोक दत्तात्रय करांडे (वय ४२) हे १९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास घरासमोर मित्राची कार (एमएच २३ एडी १४२४) घेऊन थांबले होते. त्यावेळी आलेल्या दोन भामट्यांनी "आम्हाला तुझी गाडी दे" अशी दमदाटी करत करांडे यांना कारमधून बाहेर ओढून मारहाण केली आणि गाडी घेऊन पसार झाले.
घटनेनंतर करांडे यांनी तात्काळ 'डायल ११२' वर संपर्क साधला. माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस पथकाने शहरात नाकाबंदी करून पाठलाग सुरू केला आणि रात्री ३:४५ वाजता अंबिका चौक परिसरातून पळवून नेलेली कार जप्त केली. या प्रकरणात सुधीर हनुमान वाघमारे (वय २५) व प्रीतम गणेश हनवते (वय १९, दोघे रा. शाहूनगर, बीड) यांना अटक करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, अंमलदार भास्कर केंद्र, संतोष राऊत व सचिन आगलावे यांनी केली.
‘डायल ११२’ ची तत्परता ठरली गेमचेंजर
नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या 'डायल ११२' प्रणालीवर कॉल प्राप्त होताच शिवाजीनगर पोलिस पथकाने दाखवलेले प्रसंगावधान व अवघ्या १०५ मिनिटांत आरोपींना बेड्या ठोकून केलेली यशस्वी कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.
अटक करण्यात आलेले सुधीर वाघमारे आणि प्रीतम हनवते हे दोघेही शहरातील शाहूनगर भागातील रहिवासी असून, मध्यरात्री रस्त्यावर दादागिरी करत वाहन हिसकावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न पोलिसांनी त्वरित उधळून लावला आहे.
हालगे गल्ली ३३ वर्षांची परंपरा!मिरवणुकी ऐवजी नवचैतन्य गणेश मंडळाचा भव्य महाप्रसाद.
जमात-ए-इस्लामी हिंद परळीच्या वतीने MBBS साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यां चा भव्य सत्कार.
Tuesday, September 22, 2026
शिवनाम जपातून शरीरशुद्धी; शांततेसाठी सामूहिक प्रयत्न करा. मुला-मुलींना संस्कारांची शिदोरी द्या लिंगपूजा भस्म धारणेची शिकवण द्या.:- सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज.
Saturday, September 19, 2026
लालपरी' प्रवाशांचा जीव टांगणीला! हेड लाइट बंद, बॅटरीच्या उजेडात बस २० किलोमीटर धावली.
आष्टी (प्रतिनिधी) आष्टी ते सावरगाव अशी धावणारी बस शुक्रवारी रात्री सात वाजेनंतर चक्क बॅटरीच्या उजेडात २० किलोमीटर धावली. रात्रीच्या अंधारात धोकादायक रीतीने हा प्रवास करण्यात आला. प्रवाशांनीही जीव मुठीत धरूनच सावरगावपर्यंत प्रवास केला. या प्रकारामुळे आष्टी आगाराच्या बसेस आणि कार्यक्षमता यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
याबाबतची प्रवाशांकडून मिळालेली माहिती अशी की, सावरगावला मुक्कामी निघालेली एसटी बस (एमएच २० बीएल २०५५) कडा येथून सायंकाळी ६ वाजता निघाली. साबलखेड, धानोरा, पिंपरखेड, हिवरा मार्गे बस सुलेमान देवळा येथे पोहोचली. तेथे अंधार पडल्याने चालकाने बसचे मुख्य हेडलाइट लावले मात्र तांत्रिक बिघाडामुळे बसचे लाइट न लागल्याने काही वेळ बस तिथेच थांबली. या परिस्थितीत भर रस्त्यात अंधारात बस उभी ठेवण्याऐवजी चालकाने बसमध्ये असलेल्या बॅटरीवर गाडी पुढे नेण्याची तयारी केली. काही प्रवाशांनीही नेहमीचाच रस्ता आहे, असे सांगत बॅटरीच्या उजेडात बस नेण्यास संमती दर्शविली.
वाहकाने धरली बॅटरी
त्यानंतर वाहकाने चालकाच्या शेजारी उभे राहात रस्त्याच्या दिशेने प्रकाश जाईल, अशा पद्धतीने बॅटरी धरली. बस चालविताना चालकाची कसरत झाली. चालकाने नेहमीच्या वेगापेक्षा कमी वेग ठेवत म्हसोबाची वाडी, गहूखेल, तागडखेल, वेलतुरी आणि गंगादेवी मार्गे साडेसात वाजता सावरगाव येथे बस पोहोचविली. दहा प्रवाशांनी गावी पोहोचल्यावर सुटकेचा निश्वास टाकला.
दरम्यान, या प्रकारामुळे रात्रीच्या वेळी धावणाऱ्या बसेसच्या दिव्यांची तपासणी केली जात नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. यापुढे नादुरुस्त गाड्या मुक्कामी न पाठवता सुस्थितीतील बस द्याव्यात, अशी मागणी कडा येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल साळवे यांनी केली आहे.
माहिती घेतो...
बस बॅटरीच्या उजेडात चालल्यासंदर्भात चालक आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडे चौकशी करून योग्य ती माहिती घेतो.
- अनिल निकाळजे, आगार प्रमुख, आष्टी
Web Summary : An ST bus ran 20 km in darkness using only battery light after its headlights failed. Passengers held their breath during the dangerous journey from Ashti to Savargaon. This incident raises serious questions about the maintenance and operational efficiency of the Ashti depot's buses.
परळीत संत गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सवास भव्य सुरुवात भाविकांची लक्षणीय उपस्थिती.
परळी उपजिल्हा रुग्णालयात ५७ वर्षीय महिलेची लूट.एक्स-रे काढताना सोन्याचे दागिने गायब.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) आजारपणावर उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एका रुग्णाच्या हतबलतेचा गैरफायदा घेत चोरट्याने हातसाफ केल्याचा संतापजनक प्रकार परळी उपजिल्हा रुग्णालयात उघडकीस आला आहे. हाताचा एक्स-रे काढण्यासाठी आलेल्या ५७ वर्षीय महिलेच्या पर्समधून तब्बल ६७ हजार २०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात भामट्याने लंपास केले. ही घटना १० ऑगस्ट रोजी सकाळी घडली असून, तब्बल महिनाभरानंतर १६ सप्टेंबर रोजी संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्मला शंकर चव्हाण (वय ५७, मूळ रा. सायखेडा, ता. सोनपेठ, सध्या रा. साईनगर, परळी) या हात दुखत असल्याने उपचारासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात आल्या होत्या. डॉक्टरांनी एक्स-रे काढण्याचा सल्ला दिल्याने त्यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून गळ्यातील सोन्याचे सरपाळे, कानातील फुलझोड, कानातील साखळी-जोड आणि सोन्याचे मंगळसूत्र काढून स्वतःच्या पर्समध्ये सुरक्षित ठेवले होते. मात्र, तपासणीच्या गडबडीत अज्ञात चोरट्याने ती पर्सच लांबवली.
पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेला धक्का बसला. पर्समध्ये ६७ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने होते. घटनेनंतर महिला गंभीर आजारी असल्याने त्यांना तातडीने पोलिसांत धाव घेता आली नाही. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रभारी पोलिस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बाळासाहेब चव्हाण पुढील तपास करत आहेत.
Wednesday, September 16, 2026
महावितरणच्या भोंगळा.निष्काळजी कारभारामुळे निष्पाप शेतकऱ्याचा बळी.
केज (प्रतिनिधी) : महावितरणच्या भोंगळ आणि निष्काळजी कारभारामुळे केज तालुक्यातील जीवाचीवाडी शिवारात आणखी एका निष्पाप शेतकऱ्याचा नाहक बळी गेला आहे. खातेदरा वस्ती येथे घराबाहेरील उघड्या विद्युत तारेचा जोरदार धक्का लागल्याने रामकिशन उर्फ अण्णा लक्ष्मण चौरे यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी (दि. १६) सकाळी सातच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या १५ दिवसांपूर्वीच याच गावात विजेच्या धक्क्याने एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता.
गणेशोत्सवाचा कार्यक्रम संपवून घरी गेले अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, रामकिशन चौरे हे मंगळवारी रात्री उशिरा १२.३० वाजेपर्यंत गावातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रम संपवून ते जीवाचीवाडी शिवारातील खातेदरा वस्तीवरील आपल्या घरी परतले. यावेळी अंधारात त्यांचा अचानक उघड्या विजेच्या तारेला स्पर्श झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने ते जागीच कोसळले. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यांना तातडीने विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदनादरम्यान त्यांच्या डाव्या हाताच्या तळव्याला विजेचा तीव्र धक्का बसल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक थोरात यांनी दिली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन विवाहित बहिणी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
१५ दिवसांत गावात दुसरा बळी; महावितरण कधी सुधारणार?
२८ ऑगस्टची दुर्घटना : श्रावण महिन्यात नारदस्वामी मंदिरात गंगेचे पाणी अर्पण करण्यासाठी गेलेल्या युवराज आसाराम चौरे (वय २२ वर्षे) या भाविकाचा तुटलेल्या उघड्या वायरचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला होता.
१६ सप्टेंबरची घटना : या घटनेला अवघे १५ दिवस उलटत नाहीत तोच रामकिशन चौरे यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
परळीत पिसाळलेल्या.कुत्र्यांचे नागरीकांना वर हल्ले.दिवसभरात ४७ जणांना चावा, नागरिकांत दहशत.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी शहरात मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी बुधवारी अक्षरशः हैदोस घातला. शहरातील प्रमुख रस्ते, गल्लीबोळ आणि अगदी सरकारी रुग्णालयात घुसून मोकाट कुत्र्यांनी दिवसभरात तब्बल ४७ नागरिकांचे लचके तोडले. जखमींमध्ये लहान मुले, महिला, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. या भीषण घटनेमुळे शहरभरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून नगर परिषदेच्या कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वैद्यनाथ मंदिर रोड, भोईगल्ली, ४० फुटी रोड, बरकत नगर, साठे नगर, आंबेवेस, जमजम पार्क, आझाद नगर आणि गणेशपार या भागांत कुत्र्यांनी नागरिकांवर अचानक हल्ले केले. विशेष म्हणजे, गणेशपार येथील नागरी रुग्णालयात थेट आत घुसून एका पिसाळलेल्या कुत्र्याने तेथील कर्मचाऱ्याला चावा घेतला. जखमी झालेल्या नागरिकांनुसार, एका सोनेरी (गोल्डन) रंगाच्या आणि वैजनाथ मंदिर भागात एका काळ्या रंगाच्या मोकाट कुत्र्याने सर्वाधिक हल्ले केले.
१९ गंभीर जखमी अंबाजोगाईला रेफर
हल्ल्यानंतर परळी उपजिल्हा रुग्णालयात एकाच वेळी ४६ जखमी दाखल झाल्याने धावपळ उडाली. यातील २७ जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले, तर गंभीर जखमी झालेल्या १९ जणांना पुढील उपचारांसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुट्टे यांनी दिली.
परळी शहरात तब्बल ६ हजार मोकाट कुत्रे असल्याचा अंदाज आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी नगर परिषदेने शहरात निर्बीजीकरण मोहीम राबवली होती. तरीही शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या आणि हल्ले वाढल्याने 'ती मोहीम केवळ कागदावरच होती का?' असा सवाल नागरिक करत आहेत. तरी मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, उपमुख्याधिकारी संतोष रोडे यांनी संबंधित श्वानांचा शोध सुरू असल्याचे सांगत दोन दिवसांत विशेष मोहीम हाती घेतली जाईल असे स्पष्ट केले. नगराध्यक्षा यांनीही तातडीने निर्बीजीकरण मोहीम नव्याने सुरू करण्याचे आदेश दिले असून पाळीव कुत्र्यांची नोंदणी व लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.
नशामुक्त भारत अभियानाला मिळणार नवी गती.DJJSच्या ‘बोध–नशा उन्मूलन कार्यक्रम’चा केंद्र सरकारसोबत दोन वर्षांचा सामंजस्य करार.
Monday, September 14, 2026
धक्कादायक घटना! शेतातील झाडाला गळफास लावून शेतकऱ्याने संपवले जीवन.
कडा (प्रतिनिधी) : आष्टी तालुक्यातील कडा परिसरातील शेरी शिवारात सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका ५३ वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तांबोळी हाजी मुस्ताक नूर मोहम्मद (वय ५३ वर्षे, रा. कडा) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तांबोळी हाजी मुस्ताक हे सोमवारी सायंकाळी शेरी येथील आपल्या शेतात गेले होते. तेथे त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास लावून जीवन संपवले. ही घटना निदर्शनास येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांकडून पंचनामा; शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात
घटनेची माहिती मिळताच कडा पोलीस चौकीचे पोलीस हवालदार नंदकिशोर सवासे, प्रभाकर खोले आणि अमोल नवले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कडा पोलीस करत आहेत.
शेगाव-पंढरपूर महामार्गावर थरार.रिक्षा अंगावर उलटल्याने २२ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू.
केज (प्रतिनिधी) : शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील माळेगाव (ता. केज) शिवारात रविवारी सायंकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात २२ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. कडबा कुटी घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रिक्षा दुभाजकावर (डिव्हायडर) आदळून थेट अंगावर उलटल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. उमेश फुलचंद भैरट (वय २२ वर्षे, रा. उमरी, ता. केज) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कळंबहून गावी जाताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, उमरी येथील रहिवासी असलेले उमेश भैरट हे शेतातील जनावरांसाठी कडबा कुटी आणण्याकरिता भाड्याने रिक्षा घेऊन कळंब येथे गेले होते. रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ते कडबा कुटी भरून रिक्षातून आपल्या उमरी गावाकडे परत येत होते. माळेगावजवळ आले असता चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव रिक्षा थेट रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन आदळली आणि जोरदार पलटी झाली. या अपघातात रिक्षामध्ये कडबा कुटीसोबत बसलेले उमेश हे थेट रिक्षाखाली दबले गेले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
उमरी गावावर शोककळा
सोमवारी दुपारी ३ वाजता उमरी येथे शोकाकुल वातावरणात उमेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या बाविसाव्या वर्षी उमेशचा असा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.