वरोरा (प्रतिनिधी):महावितरण कंपनीकडून काही दिवसांपूर्वीच बसवण्यात आलेले नवीन 'स्मार्ट मीटर' तांत्रिक बिघाडामुळे जळाल्याची घटना उखर्डा (ता. वरोरा, जि. चंद्रपूर) येथे घडली आहे. यामुळे बाधित ग्राहक प्रभाकरराव वामन कुडे यांचे कुटुंब गेल्या ४ दिवसांपासून पूर्णपणे अंधारात दिवस काढत आहे. महावितरणच्या चुकीमुळे आणि उपकरणातील दोषामुळे मीटर जळाले असताना, नवीन मीटर बसवण्यासाठी कंपनीचे अधिकारी पैसे मागून ग्राहकाची अडवणूक करत असल्याचा गंभीर आरोप ग्राहकाने केला आहे.
काय घडला नेमका प्रकार?
उखर्डा येथील रहिवासी आणि महावितरणचे अधिकृत वीज ग्राहक प्रभाकरराव कुडे (ग्राहक क्र. ४५९०९००००५२४६) यांच्या घरी महावितरणने जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवले होते. मात्र, बसवल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तांत्रिक त्रुटी किंवा व्होल्टेजमधील चढ-उतारामुळे हे मीटर अचानक जळाले. यात ग्राहकाची कोणतीही चूक किंवा फेरफार (Tampering) झालेली नाही.
कायद्याचा आणि नियमांचा भंग:
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) नियम २०२० (Standards of Performance) आणि 'विद्युत कायदा २००३' च्या कलम ५५ नुसार, जर तांत्रिक दोषाने किंवा उपकरणातील दोषाने मीटर जळाले असेल, तर ग्राहकाला कोणताही अतिरिक्त खर्च किंवा दंड न लावता त्वरित नवीन मीटर देणे आणि वीज पुरवठा सुरळीत करणे ही परवानाधारक महावितरण कंपनीची कायदेशीर जबाबदारी आहे.
ग्राहकाची आक्रमक भूमिका - "पैसे भरणार नाही!"
कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या स्मार्ट मीटरमुळे ही समस्या निर्माण झाली असताना, महावितरणचे अधिकारी नवीन मीटरसाठी पैसे भरण्यास सांगत आहेत. "आमची कोणतीही चूक नसताना आम्ही पैसे का भरावे?" असा सवाल करत प्रभाकरराव कुडे यांनी आज सहाय्यक अभियंता / उपकार्यकारी अभियंता, नागरी उपविभाग, महावितरण वरोरा यांना लेखी अर्ज देऊन विनामूल्य नवीन मीटर त्वरित बसवून देण्याची मागणी केली आहे.
तसेच, जर महावितरणने त्वरित व मोफत वीज पुरवठा पूर्ववत केला नाही, तर MERC कडे तक्रार दाखल करून महावितरणविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्राहकाने दिला आहे.
No comments:
Post a Comment