Thursday, September 24, 2026

हिंद नगर-भवानी नगरमधील अवैध दारू विक्री बंद करा.नवीन दारू दुकानास स्थलांतरास परवानगी देऊ नये. नागरिकांचे प्रशासनाला निवेदन - प्रशांत कराड

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील हिंद नगर व भवानी नगर परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत दारू विक्रीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने ही अवैध दारू विक्री तातडीने बंद करावी, तसेच परिसरात नवीन दारू दुकानास परवानगी देऊ नये अथवा विद्यमान दुकानाचे स्थलांतर करू नये, अशी मागणी करणारे निवेदन नागरिकांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले.
याबाबत मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, पशुसंवर्धन व पर्यावरण व हवामान बदल मंत्री, जिल्हाधिकारी बीड, पोलीस अधीक्षक बीड आणि अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग बीड यांना निवेदन देण्यात आले. भाजपाचे परळी शहर उपाध्यक्ष प्रशांत केशवराव कराड तसेच हिंद नगर व भवानी नगर परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, परिसरात अधिकृत तसेच अनधिकृत दारू विक्रीच्या ठिकाणांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. दारू सेवन करून सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणे, भांडणे, हाणामारी, शिवीगाळ करणे, रस्त्यावर पडून राहणे, नागरिकांच्या घरांसमोर लघुशंका करणे तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्रास देणे, अशा प्रकारांमुळे महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः अनधिकृत दारू विक्रीवर केवळ कागदोपत्री कारवाई न करता राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे प्रत्यक्ष पाहणी करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच ड्राय डेच्या दिवशीही अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारींची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, शासनाच्या नशामुक्ती व व्यसनमुक्ती अभियानाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीलाही आळा घालणे आवश्यक आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी अमली पदार्थांविरोधात कारवाईसोबतच अवैध दारू विक्रीवरही प्रभावी नियंत्रण आवश्यक असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
हिंद नगर व भवानी नगर परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरण मिळावे, यासाठी प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून अवैध दारू विक्री बंद करावी. तसेच या परिसरात नवीन दारू दुकानास परवानगी देऊ नये किंवा विद्यमान दुकानाचे स्थलांतर करू नये, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलन अथवा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment