Thursday, September 24, 2026

जमात-ए-इस्लामी हिंद परळीच्या वतीने MBBS साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यां चा भव्य सत्कार.

 *डॉक्टर बनून करणार मानवतेची सेवा" – GMC मध्ये निवड झाल्यावर परळीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संकल्प

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेल्या परळी शहरातील दोन गुणवंत विद्यार्थ्यांनी NEET परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (GMC) आपले स्थान पक्के केले आहे.
विद्यार्थी शेख मोहम्मद झैद मोईन अहमद याला GMC नागपूर आणि सय्यद हुझैफा सय्यद जावेद याला GMC नाशिक येथे MBBS अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. या गौरवपूर्ण ऐतिहासिक यशाबद्दल जमात-ए-इस्लामी हिंद (JIH), परळी यांच्या वतीने एका विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करून दोन्ही विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.या गरिमापूर्ण सोहळ्यात दोन्ही भावी डॉक्टरांना शाल आणि फुलांचा हार घालून सन्मानित करण्यात आले. 
या भावुक प्रसंगी दोन्ही विद्यार्थ्यांनी समाजासमोर एक आदर्श वस्तुपाठ ठेवला. त्यांनी उपस्थित जनसमुदायासमोर संकल्प करत वचन दिले की –
"आम्ही भविष्यात एक डॉक्टर म्हणून पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणे समाजातील गरीब व गरजू लोकांवर उपचार करून मानवतेची सेवा करू."
सोहळ्याला संबोधित करताना जमातचे ज्येष्ठ पदाधिकारी सय्यद अन्वर सर यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना भविष्यासाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, "विद्यार्थ्यांनी नेहमी आपल्या मुख्य ध्येयावर लक्ष केंद्रित (फोकस) ठेवावे. आता एक डॉक्टर म्हणून त्यांच्यावर जी मोठी जबाबदारी आली आहे, ती पूर्ण निष्ठेने पार पाडावी. जनकल्याण आणि समाजाची सेवा करणे हेच एका डॉक्टरचे परम कर्तव्य आहे."

जमात-ए-इस्लामी हिंद, परळीचे अध्यक्ष सय्यद इफ्तेखार सर यांनीही दोन्ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले की, जर इरादे पक्के असतील तर मर्यादित साधनांमध्येही मोठे यश मिळवता येते, हे या मुलांनी सिद्ध करून दाखवले आहे.या प्रसंगी जमात-ए-इस्लामी हिंदचे सर्व सन्माननीय अरकान (सदस्य) आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांच्या पालकांचे त्याग आणि मुलांच्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले. हे यश संपूर्ण परळी शहरासाठी एक मोठी प्रेरणा आहे

No comments:

Post a Comment