*परळीत संत श्री गुरूलिंग स्वामींच्या १२५ व्या पुण्यतिथी महोत्सवाची उत्साहात सांगता*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वैद्यनाथनगरी परळी येथे वीरशैव लिंगायत समाज परळी व श्री गुरूलिंग स्वामी देवस्थानच्या वतीने दि. १५ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या संतश्रेष्ठ श्री गुरूलिंग स्वामी यांच्या १२५ व्या पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहाची मंगळवार, दि. २२ सप्टेंबर रोजी उत्साहात सांगता झाली. यानिमित्त श्री गुरूलिंग स्वामी महाराजांच्या पालखीचा भव्य सोहळा काढण्यात आला. शिवनामाचा अखंड गजर, ‘ॐ नमः शिवाय’ गुरुराज माऊलीचा जयघोष, आणि ठिकठिकाणी भाविकांकडून पालखीवर करण्यात आलेली पुष्पवृष्टी यामुळे संपूर्ण परळी शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.
यावेळी सद्गुरू ष.ब्र.१०८ श्री सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांनी उपस्थित भाविकांना आशीर्वचन देताना सामाजिक व सार्वजनिक शांततेसाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत तसेच शरीरशुद्धीसाठी शिवनामाचा जप करावा, असे आवाहन केले. सिद्ध चैतन्य महाराज म्हणाले की, वीरशैव लिंगायत समाज मोठा आहे. या समाजाच्या पुढील पिढीला चांगले संस्कार देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. समाजातील मुला-मुलींना लहानपणापासून लिंगपूजा, भस्मधारणेसह आपल्या धार्मिक परंपरा आणि संस्कारांची शिकवण दिली पाहिजे. संस्कारक्षम पिढी घडली तरच समाजाची प्रगती अधिक भक्कमपणे होईल. प्रत्येक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. हीच खरी स्त्रीशक्ती आहे. महिलांप्रमाणेच पुरुषांनीही हिरिरीने प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन समाजापुढे आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केले.
परळी ही ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथाची पावन नगरी आहे. श्रावण मासानिमित्त येथे प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासोबतच शिवाचार्यांचे अनुष्ठान होत असते. अशा पवित्र नगरीत शिवाचार्यांचे दर्शन व आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभणे ही मोठी गोष्ट आहे, असे सांगत महाराजांनी परळीच्या धार्मिक महत्त्वावर प्रकाश टाकला. मनुष्य जीवन अनमोल आहे. प्रत्येकाने शिवनामाचा जप करावा, भक्तीच्या मार्गाने चालावे; तरच जीवनाचे सार्थक होईल, असा संदेशही त्यांनी दिला.
*शिवनामाच्या गजरात पालखी सोहळा*
मंगळवारी सकाळी ९ वाजता श्री वैद्यनाथ मंदिर येथून संतश्रेष्ठ श्री गुरूलिंग स्वामी महाराजांच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. वैद्यनाथ मंदिर, देशमुखपार, अंबेवेस, गणेशपार, नांदूरवेस, गोपनपाळे गल्ली, आंबेवेस, भोई गल्ली मार्गे पालखी बेलवाडी येथे पोहोचली. पालखी मार्गावर जागोजागी भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले आणि पालखीवर पुष्पवृष्टी केली. ‘ॐ नमः शिवाय’, ‘मन्मथस्वामी महाराज की जय’ आणि ‘गुरूलिंग स्वामी महाराज की जय’ अशा जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
*सात दिवस अखंड शिवनामाचा गजर*
मागील सात दिवसांपासून बेलवाडी मंदिर परिसरात अखंड शिवनाम सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पारायण प्रमुख म्हणून श्री दयानंद चौधरी होते. दररोज आरती, शिवनाम जप, धार्मिक प्रवचन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होता. मंगळवारी पालखी बेलवाडी येथे पोहोचल्यानंतर प्रवचन, आरती व महाप्रसादाने महोत्सवाची सांगता झाली. या पालखी सोहळ्यात वीरशैव लिंगायत समाजातील महिला-पुरुषांसह शहरातील शिवभक्त व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. पालखी सोहळ्यामुळे परळी शहरातील प्रमुख मार्गांवर भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरूलिंग स्वामी देवस्थानचे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरूजी, सचिव अॅड. गिरीषअप्पा चौधरी, प्रा. रामलिंगप्पा काटकर, सोमनाथअप्पा हालगे, विजयकुमार मेनकुदळे, शिवकुमारअप्पा व्यवहारे, शंकरअप्पा उदरगीरकर, शिवशंकरअप्पा निर्मळे, अक्षय मेनकुदळे, अॅड. मंदार नरवणे, सौ. मीरा धनंजय कोरे, चंद्रकांतअप्पा उदगीरकर यांच्यासह समस्त वीरशैव लिंगायत समाजबांधव व भगिनींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment